घरमुंबईदुकानांबाहेरील मेनीक्वीनवर पुन्हा कारवाई

दुकानांबाहेरील मेनीक्वीनवर पुन्हा कारवाई

Subscribe

कपडे विक्रेते स्त्री देहाची विटंबना करत असल्याच्या तक्रारी

मुंबईतील महिलांच्या कपड्यांच्या विक्रीकरता जाहिरात करण्यासाठी स्त्री देहाच्या प्रतिकृतीचा(मेनीक्वीन) वापर करण्यात येतो. त्यामुळे एक प्रकारे ही स्त्री देहाची विटंबनाच होत असल्याची तक्रार झाल्यानंतर आता पुन्हा एकदा दुकानांच्या दर्शनी भागात तसेच दुकानाबाहेर पदपथांवर आणि झाडांवर टांगलेल्या मेनीक्वीनवर कारवाई करण्यात येणार आहे. अशा प्रकारची कारवाई करण्याबाबत विभागीय निरीक्षकांना निर्देश देण्यात आले असल्याचे महापालिका परवाना विभागाने स्पष्ट केले आहे.

दुकानांच्या दर्शनी भागात तसेच दुकानांबाहेर पदपथावर उत्पादकांची जाहिरात करण्यासाठी स्त्री देहाच्या प्रतिकृतीसह कोणतेही पुतळे ठेवण्यास अथवा टांगण्यास बंदी घालण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या तत्कालीन नगरसेविका रितू तावडे यांनी मे २०१३मध्ये ठरावाच्या सूचनेद्वारे केली. स्त्रियांची अंतरवस्त्रे विकणारे दुकानदार हे त्यांच्या दुकानाच्या दर्शनी भागात किंवा दुकानाबाहेर पदपथावर स्त्री देहाच्या प्रतिकृती म्हणजे स्त्रीचा पुतळा, अर्धपुतळा, शीर व पाय नसलेलील स्त्रीची विकृत प्रतिकृती अंतरवस्त्र चढवून उभी करून किंवा टांगून ठेवतात. अशा प्रतिकृतीची मांडणी अतिशय बिभत्स पध्दतीने केलेली असते. त्यामुळे ये-जा करणार्‍या स्त्री वर्गाला विकृत नजरांना सामोरे जावे लागते, असे त्यांनी आपल्या ठरावाच्या सूचनेत म्हटले होते.

- Advertisement -

सर्वसाधारणपणे तयार कपडे तसेच साड्या इत्यादींबाबत जाहिरात करताना मेनीक्वीनवर साड्या तसेच ड्रेस परिधान करून ग्राहकांना आकर्षक दिसू शकेल,अशाप्रकारे जाहिरात केली जाते. मुंबईसारख्या शहरात विविध जलतरण स्पर्धा, सौंदर्य स्पर्धा यांचे आयोजन केले जाते. या सर्व बाबींचा विचार करता मेनीक्वीनवर अशा प्रकारे कपड्यांची जाहिरात करणे ही बाब स्त्रियांच्या असभ्य प्रतिरुपण अधिनियम १९८६मधील कलम २ मध्ये येत नाही,असे मत प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

आतापर्यंत मेनीक्वीनवर कारवाई करण्यासाठी दी इंडिसेंट रिप्रेझेंटेशन ऑफ वूमन ऍक्ट १९८६च्या कलम ५(१)नुसार कोणत्या राजपत्रित अधिकार्‍यास नियुक्त केले आहे, याबाबत माहिती कळवण्यासाठी पुन्हा शासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला असल्याचे उत्तरे दिली जात होती. याबाबत कायदेशीर कारवाई करणे ही शासनाच्या अखत्यारितील असल्याने शासनाकडे ९ स्मरणपत्रे पाठवण्यात आली आहे आणि प्रत्यक्ष भेट घेवूनही चर्चा करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. रहदारीस अडथळा ठरणार्‍या मेनीक् वीनवर अतिक्रमण निर्मुलन विभागाच्या निरिक्षकांमार्फत कारवाई करण्यात येते. तरीही दुकानांच्या दर्शनी भागात तसेच दुकानाबाहेर पदपथांवर व झाडांवर टांगलेल्या प्रतिकृतींवर आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश विभागीय निरिक्षकांना देण्यात आले असल्याचे अभिप्रायमध्ये म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -