घरमुंबईताडदेव येथील इंडियाना बारवर पोलिसांची कारवाई

ताडदेव येथील इंडियाना बारवर पोलिसांची कारवाई

Subscribe

47 जणांना अटक, सर्वांना तीन हजाराचा जामीन मंजूर

ताडदेव येथील इंडियाना बारवर शनिवारी रात्री उशिरा ताडदेव पोलिसांच्या एका विशेष पथकाने कारवाई करुन बारमधून 47 जणांना अटक केली. त्यात बारचा मॅनेजरसह वेटर, ऑके्रस्ट्रा कलाकारासह बत्तीस ग्राहकांचा समावेश असून अटकेनंतर या सर्वांना येथील लोकल कोर्टाने प्रत्येकी तीन हजार रुपयांच्या जामिनावर सोडून दिले आहे. विशेष म्हणजे जामिनाची ही रक्कम बदलापूरच्या एका सामाजिक संस्थेत जमा करुन त्याची पावती कोर्टात सादर करण्याचे आदेश महानगर दंडाधिकारी सबीना मलिक यांनी दिले आहेत.

बारवरील कारवाईत जामिनावर सोडून दिलेल्या आरोपींची जामिनाची रक्कम एका सामाजिक संस्थेत जमा करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जाते. या कारवाईचे आरोपींच्या वकिलांनी स्वागत केले होते. ताडदेव येथील हिरापन्ना शॉपिंग सेंटर परिसरात इंडियाना नावाने एक बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंट आहे. या बारच्या पोटमाळ्यावर एक हॉल असून तिथे गायिका तसेच महिला वेटरच्या नावाखाली बारबालांना ठेवून ग्राहकांशी अश्लील चाळे करण्यास प्रवृत्त केले जात असल्याची माहिती ताडदेव पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रशांत राजे, सचिन माने, आनंद देशमुख, गुंडेवाड, पटेल, पाष्टे, सोनावणे, छाया नाईक आणि अन्य पोलीस पथकाने शनिवारी रात्री उशिरा तिथे छापा टाकला होता. यावेळी तिथे आठ बारबाला ऑक्रेस्ट्रा संगीताच्या तालावर तसेच उत्तान कपड्यात तिथे असलेल्या ग्राहकांशी अश्लील वर्तन करताना दिसून आले.

- Advertisement -

त्यानंतर या आठही बारबालांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची चौकशी करुन सोडून देण्यात आले. यावेळी बारमध्ये असलेल्या बार मॅनेजर, कॅशिअर, ऑक्रेस्ट्रा कलाकार, वेटर आणि बत्तीस ग्राहक अशा 47 जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या सर्वांविरुद्ध भादवीसह महाराष्ट्र हॉटेल मद्यपागृहे यातील अश्लील नृत्यास प्रतिबंध घालणारा व स्त्रियांचे प्रतिष्ठेचे संरक्षण करणारा अधिनियम 2016 कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. याच गुन्ह्यांत रविवारी सकाळी सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना रविवारी दुपारी येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.

यावेळी कोर्टाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. न्यायालयीन कोठडीत रवानगी होताच त्यांच्या वतीने कुरेशी एम अस्तव, कमलेश मोरे, सयुक्ता कामत ऊर्फ काशीकर, प्रबंधक दवे यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. या जामिन अर्जावर सुमारे अर्ध्या तास सुनावणी होऊन महानगर दंडाधिकारी सबीना मलिक यांनी आरोपींना जामिन देताना त्यांच्या जामिनाची रक्कम बदलापूर येथील एका सामाजिक संस्थेत जमा करुन जमा केलेल्या रक्कमेची पावती दुसर्‍या दिवशी लोकल कोर्टात सादर करण्याचे आदेश दिले.

- Advertisement -

त्याचे संबंधित चारही वकिलांनी समर्थन केले होते. त्यानंतर या 47 आरोपींना प्रत्येकी तीन हजार रुपयांचा जामिन मंजूर करण्यात आला आहे. या सर्वांची जामिनाची 1 लाख 41 हजार रुपयांची रक्कम सोमवारपर्यंत बदलापूर येथील संबंधित सामाजिक संस्थेत जमा केली जाणार असल्याचे या वकिलांनी बोलताना सांगितले. आतापर्यंत पोलिसांनी अनेक बारवर कारवाई करताना बार मॅनेजरसह बारमधील कर्मचारी आणि ग्राहकांवर अटकेची कारवाई केली आहे. या सर्वांना दुसर्‍या दिवशी कोर्टाने जामिनही मंजूर केला होता, मात्र मुंबई पोलिसांच्या इतिहासात पहिल्यांदा बारमध्ये कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची जामिनाची रक्कम एखाद्या सामाजिक संस्थेत जमा केली जाणार आहे. महानगर दंडाधिकारी सबीना मलिक यांच्या आदेशाचे आरोपींसह त्यांच्या वकिलांनी स्वागत केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -