घरमुंबईबलात्काराच्या गुन्हेगारास ६ वर्षानंतर शिक्षा

बलात्काराच्या गुन्हेगारास ६ वर्षानंतर शिक्षा

Subscribe

जन्मठेप आणि २५ हजार रुपयांचा दंड

६ वर्षांपूर्वी फिल्म इंडस्ट्रीत नोकरी देण्याचे आमिष दाखवून एका विवाहितेवर वारंवार बलात्कार केल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपीला दिंडोशी सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि २५ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. २०१३ साली वनराई पोलिसांनी या आरोपीला अटक केली होती. आरोपीने पीडित मुलीला फिल्मसिटीचे आमिष दाखवून तिच्यावर वांरवार बलात्कार करून तिचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते. याप्रकरणी वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

२५ वर्षीय पीडित विवाहितेला सिनेमात काम करण्याची इच्छा होती. त्यासाठी ती आपल्या परीने प्रयत्न करत असताना तिच्या संपर्कात आरोपी रवींद्रनाथ घोष आला. सिनेसृष्टीत ओळख आहे. अनेक टीव्ही सीरियल प्रोड्युसरांना ओळखत असल्याचे सांगून घोष याने तरुणीला फिल्मसिटीत नोकरीला लावण्याचे आमिष दाखवले. घोष याच्यावर विश्वास ठेवून विवाहित महिला फोटो शूट करण्यासाठी सप्टेंबर २०११ मध्ये गोरेगाव येथील साईप्रसाद हॉटेल येथे गेली. तेथून दोघेही रिक्षाने आरे कॉलनी येथे आले. तेथे निर्जनस्थळी तरुणीचे बिकीनीवरील फोटो काढले. हे फोटो परिचयाच्या प्रोड्युसरला दाखवतो, असे सांगून घोष निघून गेला.

- Advertisement -

दोन दिवसांनंतर घोष याने बहाणा करून विवाहितेला पुन्हा गोरेगावमधील साईप्रसाद हॉटेल येथे भेटायला बोलावले. मोबाईलमध्ये असलेले महिलेचे बिकीनीवरील फोटो दाखवून घोष तिला ब्लॅकमेल करू लागला. हा फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडे शरीरसंबंधाची मागणी केली. बदनामीच्या भीतीपोटी पीडित महिला ही घोष याला भेटायला मालाड पश्चिम येथील महाड जेट्टी येथे गेली असता तिच्यावर अत्याचार करून घोष याने मोबाईलवर तिचे नग्न फोटो काढले.

नग्न फोटो फेसबूकवर अपलोड करून बदनामीची धमकी देऊन घोष वारंवार महिलेवर अत्याचार करू लागला. नेहमीच्या अत्याचाराला वैतागून पीडित महिला घोषला टाळू लागली असता त्याने नग्न फोटो तिच्या पतीला व मित्रांना पोस्ट केले. या प्रकाराने त्रासलेल्या पीडित विवाहितेने २०१३ साली वनराई पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंदवला होता. वनराई पोलीस ठाण्याच्या तत्कालीन पथकाने या गुन्ह्याचा तपास केला होता. अखेर आरोपीला शिक्षा मिळवून देण्यात आली आहे. सरकारी वकील श्रीमती इनामदार यांनी पीडित महिलेची बाजू न्यायालयात मांडली. २७ नोव्हेंबरला आरोपी रवींद्रनाथ घोष याला एकूण २५ हजार रुपये दंड आणि आजीवन कारावास, अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -