घरमुंबईभाजपसहीत मित्रपक्षांना बोलावे लागणार ’देवेंद्रायनम:’

भाजपसहीत मित्रपक्षांना बोलावे लागणार ’देवेंद्रायनम:’

Subscribe

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा २२ जुलै रोजी ४९वा वाढदिवस संपन्न झाला. आपला वाढदिवस अतिशय साधेपणाने साजरा करण्याचे आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले होते. वसंतराव नाईक यांच्यातर पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे पहिले आणि सर्वात कमी वयाचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्वर्र्भूमीवर फडणवीस सज्ज झाले आहेत. पुढचा मुख्यमंत्री म्हणून ‘मीच पुन्हा येईन’ असे ठामपणे सांगत असतानाच आपण भाजपसहीत शिवसेना आणि इतर मित्रपक्षांचेही मुख्यमंत्री आहोत, असे सांगून त्यांनी स्वपक्षात आणि मित्रपक्षात मुख्यमंत्री पदावरून होणार्‍या चर्चांना पुर्णविराम दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुत्सद्दी राजकारणामुळेच मित्र पक्ष आणि स्वकीय आता “देवेंद्रायनम:” म्हणताना दिसत आहेत. या विषयावर आपलं महानगरच्या कार्यालयात फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. भाजपचे निष्ठावान आणि जुने नेते असलेले मुंबई भाजपचे सचिव सुनील राणे आणि भाजपमध्ये नवखे असलेले मात्र अल्पावधीत मुख्यमंत्र्यांच्या गोटात सामील झालेले आमदार प्रसाद लाड यांनी सहभाग घेतला. मुख्यमंत्र्यांची कारकिर्द आणि भाजपच्या वाटचालीबाबत या दोन्ही नेत्यांना राजकीय विश्लेषक राजेश कोचरेकर यांनी बोलते केले.

मुंडे, महाजन, गडकरींपेक्षा फडणवीस उजवे ठरले

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस, स्व. गोपीनाथ मुंडे, स्व. प्रमोद महाजन आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची कार्यशैली वेगळी असली तरी तिघांचेही ध्येय भाजपला तळागाळातून बाहेर काढणे होते आणि आहे. चारही नेते संघाच्या विचारांचे पाईक आहेत. मात्र तरीही वरील चारपैकी तीन नेत्यांना मुख्यमंत्री बनण्याचे भाग्य लाभले नाही. १९९५ ते ९९ या काळात मुंडे उपमुख्यमंत्री होते. त्याआधी त्यांनी कधीही मंत्रीपद भुषविले नव्हते, तरीही त्यांनी चांगले काम केले. त्यानंतर १९९९ ते २०१४ पक्ष विरोधात होता. मात्र १९९५ ते ९९ च्या काळात देवेंद्र फडणवीस हे नागरपूर महानगरपालिकेचे महापौर होते. त्यानंतर विधानसभेत, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी चांगले योगदान दिले. याच अनुभवाचा फायदा त्यांना मुख्यमंत्री म्हणून झाला, अशी भूमिका सुनील राणे यांनी व्यक्त करत मुख्यमंत्री म्हणून फडणवीस सरस ठरले असल्याचे सांगितले.

पाच वर्षात एकही आरोप न झालेला मुख्यमंत्री
महाराष्ट्राच्या ६० वर्षांच्या इतिहासात यशवंतराव चव्हाणांपासून ते पृथ्वीराज चव्हाण या सर्वांवर व्यक्तीगत किंवा व्यावहारिक स्वरुपाचे आरोप झाले. अगदी मनोहर जोशी, नारायण राणे मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर व्यक्तीगत आरोप झाले. देवेंद्र फडणवीस हे पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे दुसरे मुख्यमंत्री ठरले. या काळात त्यांनी कधीही पदाचा गैरवापर केला नाही. कुणालाही झुकते माप दिले नाही. राष्ट्र, राज्य प्रथम आणि त्यानंतर पक्ष या भूमिकेतून त्यांनी काम केले. मराठा आरक्षण देणे असो, छत्रपतींचे स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, जलयुक्त शिवार योजना, शहरातील पायाभूत सोयी सुविधा राबविण्याचे काम त्यांनी केले. एवढी कामे करत असताना त्यांच्यावर कोणत्याही कामातील गैरव्यवहाराचा आरोप झाला नाही. विशिष्ट कंत्राटदाराला झुकते माप दिले असेही कुणी म्हणाले नाही. राज्याचा विकास करण्यासाठी पारदर्शीपद्धतीने काम करण्याकडे फडणवीस यांचा भर राहिला आहे, अशी भूमिका आमदार प्रसाद लाड यांनी मांडली.

- Advertisement -

‘पुढचा मुख्यमंत्री मीच’ यामागची खेळी
देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्री होण्यामध्ये काहीच गैर नाही, असे राणे म्हणाले. मध्य प्रदेशमध्ये सलग तीन वेळा शिवराजसिंह चौहान यांनी मुख्यमंत्रीपद भूषविले. मध्य प्रदेशचा कायापालट केला. त्याप्रमाणे फडणवीस देखील आणखी काही वर्ष मुख्यमंत्री राहतील आणि महाराष्ट्राचा कायापालट करतील, अशी आशा राणे यांनी व्यक्त केली. तर भाजपसहीत शिवसेनेचाही मुख्यमंत्री असल्याचे सांगण्यासाठी आत्मविश्वास लागतो. त्यांचा स्वतःवर आणि मित्र पक्ष शिवसेनेवर विश्वास आहे. मी पुन्हा येईल आणि मुख्यमंत्री होईल. हेच नियतीलाही मान्य असल्याचे लाड म्हणाले.

छत्रपतींच्या स्मारकाचा खर्च योग्यच
आपण स्टॅच्यू ऑफ लिबर्टी बघायला स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून जातो. मग ज्या छत्रपतींनी स्वराज्य स्थापन केले त्याचाही आपण अभिमान बाळगला पाहिजे. मुख्यमंत्री यांनी हजारो कोटींची तरतूद करुन योग्यच केले. याआधी ज्यांनी ’मराठा’ राजकारण केले त्या शरद पवारांनी १५ वर्षांत कधीही स्मारक बांधले नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचेही स्मारक बांधले नाही. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी दोन्ही स्मारकाचे काम सुरु केले, अशी प्रतिक्रिया लाड यांनी दिली. तर ४०० वर्षांपूर्वीचा इतिहास नवीन पिढीला सांगण्यासाठी हे स्मारक गरजेचे आहे. तसेच फडणवीस सरकारने फक्त स्मारकच बांधले नाहीत तर मेट्रोसारखे प्रकल्पही उभारले, असे राणे यांनी सांगितले.

पक्ष वाढण्यासाठी आयात धोरण गरजेचं
भाजप पक्ष स्वपक्षातील नेत्यांना-कार्यकर्त्यांना डावलून राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील नेत्यांसाठी लाल गालिचा अंथरत आहे, असा आरोप भाजपवर सतत होतो आहे. याबाबत राजेश कोचरेकर यांनी दोन्ही नेत्यांना छेडले असता या कृतीचे दोघांनीही समर्थन केले. “काँग्रेसने ज्यापद्धतीने वाटचाल केली, त्याचे अनुकरण भाजप अजिबात करत नाही. मात्र पक्षवाढीसाठी इतर पक्षातील नेत्यांना पक्षात सामावून घ्यावे लागते”, असे राणे यांनी सांगितले. तर पिढ्यानपिढ्या भाजपसोबत एकनिष्ठ राहिलेल्या कुटुंबाचा भाजप पक्ष राहिला नाही, हा दावाही राणे यांनी खोडून काढला. प्रसाद लाड म्हणाले की, पक्षात नेते येत असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यापाठी तरुणाई मोठ्या प्रमाणावर भक्कमपणे उभी आहे.

चंद्रकांत पाटील यांची विकेट काढली?
२०१४ पूर्वी भाजपमध्ये मुंडे आणि गडकरी गट कार्यरत होते. त्यानंतर फडणवीस आणि गडकरी असे गट निर्माण झाले. याबद्दल आपली भूमिका मांडताना पक्षात नवे आलेले प्रसाद लाड म्हणाले की, आमचा एकच गट आहे तो म्हणजे ’कमळ’. केंद्रीय स्तरावर आम्ही नरेंद्र मोदी आणि राज्यात फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत, असेही ते म्हणाले. तसेच चंद्राकांत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष करून त्यांची विकेट पाडलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. चंद्रकांत पाटील यांचे मंत्रीपद कायम ठेवून त्यांना संघटनेचे प्रमुख केले गेले आहे. अमित शाह यांच्याकडेही मंत्रीपद कायम असून ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.

कर्नाटकचे सरकार पाडण्यात भाजपचा हात नाही
कर्नाटकचे सरकार पाडण्यामध्ये भाजपला रस नाही. देशातील अनेक राज्यांमध्ये भाजपचे राज्य आहे. त्यामुळे कुठे सरकार पडले पाहिजे, कुठे सरकार टिकले पाहिजे, याची तमा भाजप बाळगत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकमधील सरकार पाडण्याचे काम माझ्याकडे दिलेले नाही, तसेच कर्नाटकचे आमदार मुंबईत आणण्यात आपला कोणताही हात नसल्याचा खुलासा प्रसाद लाड यांनी केला.

मुंबई ही बहुभाषिक असल्यामुळे अमराठी लोढांना अध्यक्षपद
आशिष शेलार यांना मंत्रीपद दिल्यानंतर भाजपने मुंबई अध्यक्षपद मंगलप्रभात लोढा यांना दिले आहे. या निर्णयावर टीका झाल्याबद्दलचा प्रश्न कोचरेकर यांनी दोन्ही नेत्यांना विचारून भाजपची भूमिका जाणून घेतली. मागच्या २० वर्षात विनोद तावडे, प्रकाश मेहता, गोपाळ शेट्टी, राज पुरोहित, भाई गिरकर आणि आशिष शेलार यांनी हे पद भुषविलेले आहे. मुबंईची ओळख फक्त मराठी म्हणून नाही तर ती बहुभाषिक आहे. भाजपची मुंबईतील ओळख फक्त मराठी व्यक्तीभोवती केंद्रीत नाही. शिवसेनेची युती असल्यामुळे मराठी मतदारांचा आम्हाला पाठिंबा आहेच. त्याशिवाय इतर भाषिकांचा, परप्रातिंयाचा देखील आपल्याला पाठिंबा मिळाला पाहिजे, याचा अंदाज बांधूनच मंगलप्रभात लोढा यांना अध्यक्षपद दिले असल्याचे राणे यांनी सांगितले. “लोढा यांना एक उद्योजक किंवा विशिष्ट समाजाचा माणूस म्हणून अध्यक्ष केले, असे म्हणणे चुकीचे ठरेल. लोढा यांचे कुटुंब संघाच्या विचारांशी एकनिष्ठ आहेत. त्यामुळे उद्योजक किंवा विशिष्ट समाज म्हणून नाही तर कुशल संघटक म्हणून त्यांना मुंबईचे अध्यक्षपद दिले”, असे लाड यांनी सांगितले.

– शब्दांकन – किशोर गायकवाड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -