घरमुंबईआम्ही सुरक्षित आहोत का?

आम्ही सुरक्षित आहोत का?

Subscribe

मुंबईत जगायचे असेल तर कुणाला विचार करायला वेळ नाही, जाब विचारायला सवड नाही. कारण ये मुंबई है.... यहाँ सब चलता है! अशी राज्यकर्त्यांची धारणा झाली आहे.

तसे बघितले तर या तीन घटना मुंबईकरांना नवीन नाहीत. कारण दररोज घराबाहेर पडतानाच मरणाच्या दारातूनच मुंबईकर प्रवास करीत असतो. जुलै महिना उजाडला की २६ जुलैची ती काळरात्र, १३ जुलैचे रेल्वेतील बॉम्बस्फोट यासारख्या घटना आणि पावसाळ्याच्या चार महिन्यांत किमान आठवडाभर तरी मुंबई तुंबल्याच्या घटनांनी मुंबईकरांना स्पिरिट दाखवायला वाव मिळतो.

मात्र, मुंबई आणि परिसरातील ठाणे, पालघर, नवी मुंबई आणि रायगडच्या सुमारे साडेतीन कोटी लोकसंख्येला सामावण्यासाठी अपुर्‍या पायाभूत सुविधा हेच मुख्य कारण आहे. चार दिवसांपूर्वी घाटकोपरमध्ये कोसळलेले विमान आणि त्यात गेलेला पाच जणांचा जीव यामुळे तर मुंबईकरांनी जगावे तरी कसे असाच प्रश्न निर्माण झाला आहे. सोशल मीडियाच्या जगात सतत माहिती आपल्यापुढे आदळत असते. कधी ती मोबाईलवर, कधी टीव्हीवर तर कधी कॉम्प्युटरवर. त्यामुळेच कधी स्मार्ट सिटीचे गाजर तर कधी बुलेट ट्रेनचे स्वप्न दाखवत राज्यकर्ते मुंबईकरांना गृहीत धरतात. कारण मुंबईत जगायचे असेल तर कुणाला विचार करायला वेळ नाही, जाब विचारायला सवड नाही. कारण ये मुंबई है…. यहाँ सब चलता है! अशी राज्यकर्त्यांची धारणा झाली आहे.

- Advertisement -

पाणी तुंबले की महापालिका आणि एमएमआरडीए आपापसात भांडणार, रेल्वे पूल कोसळले की पालिका म्हणते आमची जबाबदारी नाही. रेल्वे म्हणते ऑडिट झाले नाही. रेल्वेमंत्री पियूष गोयल सांगतात चौकशीचे आदेश दिलेत. मात्र सामान्य मुंबईकर कोणत्या परिस्थितीत जगतो यावर कुणीही बोलत नाही. आमच्या सुरक्षेचे काय, असा प्रश्न विचारायचा कुणाला. कारण आता सत्तेत बसलेला भाजप आणि १५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर असलेली काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी यातही राजकारण, आरोप प्रत्यारोप आणि चिखलफेक करणार. देशाच्या प्रगतीत कररूपाने सर्वाधिक कर मुंबईतून दिला जात असूनही मुंबईच्या वाट्याला मरणयातना आणि यंत्रणांमधील समन्वयाचा अभाव कारणीभूत असतो. हे वर्षानुवर्षे चाललंय. त्यामुळे मुंबईकरही ‘रात गयी बात गयी’ म्हणत आणि माध्यमही मुंबईकरांचे स्पिरिट अशी बातमी देत आपला दिवस भरतात. मात्र आम्ही सुरक्षित आहोत का, या प्रश्नावर बोलायला कुणालाही वेळ नाही. त्यामुळेच खेदाने म्हणावे लागते की बुलेट ट्रेन नको सुरक्षित प्रवास द्या. आम्हाला जगू द्या!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -