घरमुंबईगुडविनच्या मालकांना लवकर अटक करा

गुडविनच्या मालकांना लवकर अटक करा

Subscribe

गुंतवणूकदारांंनी मांडली आयुक्तांपुढे कैफियत

ठाणे, पालघर जिल्ह्यातील हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांना गंडा घालून फरार झालेल्या गुडविन मालकाचा शोध लावण्यात अजूनही पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे गुडविनच्या गुंतवणूकदार तणावात आहेत. या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर लागावा, यासाठी काँग्रेसचे नेते संतोष केणे यांच्या नेतृत्वाखाली गुंतवणूकदारांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली. गुंतवणूकदारांचे पंचनामे डोंबिवलीत करण्यात यावे अशीही मागणी शिष्टमंडळाने आयुक्तांकडे केली.

जादा व्याज आणि भिसी योजना अशी प्रलोभने दाखवित हजारो ग्राहकांना गुडविन ज्वेलर्सने फसवणूक केली आहे. गुडविनचे मालक सुनील कुमार आणि सुदीश कुमार हे दोघेही गाशा गुंडाळून फरार झाले आहेत. त्यांच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे. कोट्यवधी रुपयांची फसवणूक असल्याने हा तपास ठाणे आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. पोलिसांच्या वेगवेगळया टीम तपासासाठी रवाना झाल्या असून, मालकांचा शोध घेत आहेत. डोंबिवलीत फसवणूक झालेले एकूण 700 ग्राहक आहेत. ठाणे गुन्हे शाखेकडे तपास असल्याने तक्रार व पंचनाम्यासाठी ग्राहकांना ठाणे येथे बोलावले जात आहे. मात्र, ग्राहकांमध्ये अनेकजण वृध्द आहेत. तसेच नोकरीला आहेत. अनेकजण आजारीही आहेत, तर अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

- Advertisement -

त्यामुळे ग्राहकांची अडचण लक्षात घेऊन पोलिसांनी ठाणे येथे न बोलाविता डोंबिवलीतच सुट्टीच्या दिवशी पंचनामे करण्यात यावेत, या मागणीसाठी काँग्रेसचे नेते संतोष केणे यांच्या नेतृत्वाखाली प्रती नायर, राकेश मिश्रा रूपेश चंगन सुनील प्रसाद दीपक सांगलीकर सुनील पाटील नरेंद्र चौधरी आशिष कापाडीया पंकज डुंबरे सुनील नाखये कुमार आणि महेश निंबरे या ग्राहकांनी पोलीस आयुक्त फणसळकर यांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी कथन केल्या. ग्राहकांच्या अडचणी लक्षात घेऊन आयुक्तांनी डोंबिवलीतच पंचनामे करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. गुडविनने कशा प्रकारे आमिष दाखवून लोकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले, त्याचा पाढाही ग्राहकांनी पोलीस आयुक्तांसमोर मांडला. पोलिसांच्या विविध टीम तपास करीत असून, लवकरच मालकांना अटक करण्यात येईल असा विश्वास पोलीस आयुक्तांनी त्यांना दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -