घरमुंबईगच्चीवरील शेती का? आणि कशी

गच्चीवरील शेती का? आणि कशी

Subscribe

बागकाम केले की मानसिक ताणतणाव कमी होतात. अनेक नैसर्गिक उपचार पद्धतीत बागकामाचा सल्ला दिला जातो. दडपण, दैनंदिन जीवनातील ओढाताण, स्मृतिभ्रंश आणि अनेक प्रकारचे मानसिक आजार यावर बागकाम हे एक चांगली उपाययोजना ठरू शकते. आपल्या घरात असलेल्या एकदोन कुंड्यांमधील तन काढणे, माती ठीकठाक करणे यामधून ताजेतवाने वाटायला लागते. डिजिटल जगात आपण तासनतास मोबाईल, टॅब, लॅपटपवर घालवतो. त्यातून डोळ्यांची जळजळ, डोके दुखी असे प्रकार होतात. मग थोडावेळ ब्रेक घेऊन गच्चीवरील बागेत थोडा फेरफटका, थोडी मशागत केली तर डोळ्यांवरील ताण कमी होतो.

शहरीकरणाच्या वाढत्या रेट्याबरोबर जसा ‘परसबाग’ हा शब्द अडगळीत जात आहे तसा एक नवीन शब्दही वापरत यत आहे तो म्हणजे ‘टेरेस गार्डन किंवा गच्चीवरील बाग.’ टेरेस गार्डन हा शब्द आणि संकल्पना म्हणून आज बर्‍यापैकी सर्वांनाच ओळखीची झाली आहे. प्रत्येक नगर आणि महानगरात गच्चीवरील शेती करणारे काही लोकं, लोकांचे काही गट वेगवेगळ्या नावाने अस्तित्वात आहेत. काही नियमित प्रत्यक्ष भेटतात तर काहींचे समाज माध्यमांवर ग्रुप्स (गट) आहेत. हे गट खूप सक्रियपणे नव्याने टेरेस गार्डन करणार्‍यासाठी मार्गदर्शन करतात. त्यांच्याकडील बियाण्यांची देवाण घेवाण करतात. महाराष्ट्राच्या तुलनेत दक्षिणेकडील राज्यांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. हैद्राबाद आणि चेन्नईमध्ये खूप मोठ्या प्रमाणत टेरेस गार्डन केले जाते. आता पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या शहरांमध्येही गच्चीवरच्या शेतीचे प्रयोग मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहेत.
बागकाम केले की मानसिक ताणतणाव कमी होतात. अनेक नैसर्गिक उपचार पद्धतीत बागकामाचा सल्ला दिला जातो. दडपण, दैनंदिन जीवनातील ओढाताण, स्मृतिभ्रंश आणि अनेक प्रकारचे मानसिक आजार यावर बागकाम हे एक चांगली उपाययोजना ठरू शकते. आपल्या घरात असलेल्या एकदोन कुंड्यांमधील तन काढणे, माती ठीकठाक करणे यामधून ताजेतवाने वाटायला लागते. डिजिटल जगात आपण तासनतास मोबाईल, टॅब, लॅपटपवर घालवतो. त्यातून डोळ्यांची जळजळ, डोके दुखी असे प्रकार होतात. मग थोडावेळ ब्रेक घेऊन गच्चीवरील बागेत थोडा फेरफटका, थोडी मशागत केली तर डोळ्यांवरील ताण कमी होतो. दिवसाची सुरुवात आपण जितकी हिरवळ पाहतो तितका आपला दिवस चांगला, आनंदी जातो हे अनेक संशोधनातून पुढे येत आहे. त्यामुळे घरी गॅलरीत किंवा गच्चीवर फुलझाडे व भाजीपाला यांची बाग करण्याचे प्रमाण वाढत आहे.
टेरेसवर कुंड्यामध्ये किंवा मातीचे बेड करून त्यामध्ये फुलझाडे व रोज लागणारा भाजीपाला पिकविणे याला खर्‍या अर्थाने टेरेस गार्डन म्हणता येईल. याची सुरुवात एकदोन कुंड्यामधील फुलझाडे लावून होते आणि मग हळूहळू गच्चीवरील शेती करणार्‍या व्यक्तींच्या, गटाच्या संपर्कातून गच्चीवरील कुंड्या वाढायला लागतात. फुलझाडांच्या सोबतच एखादे टॉमेटोचे किंवा मिरचीचे झाड वाढायला लागते. मग हळूहळू वांगे, मेथी, पालक, भेंडी अशा भाज्या बहरायला लागतात. गच्चीवरील शेतीचे टेक्नीक एकदा समजले की पेरू, पपई, केळी, सीताफळ ही फळझाडे सुद्धा आपल्या गच्चीवर फळांनी लगडू लागतात. अनेकांना बागकाम करण्याची इच्छा ही तीव्र असते. गच्चीही उपलब्ध असते. पण यातून छताला काही धोका होणार तर नाही ना? वजन पेलवेल का? छत लिकेज तर नाही ना? असे अनेक प्रश्न पडतात. तर काहींना गच्चीवरील बागकाम करण्याचे तंत्र माहिती नसते. तर अशा सर्वांसाठी याबाबत काही प्राथमिक माहिती देण्याचा या लेखाचा प्रयत्न आहे. लेखातील माहिती अनुभव आधारित असल्यामुळे खात्रीशीर आहे.
पहिली गोष्ट डोक्यातून काढून टाकावी की गच्चीवर शेती केल्यास छताला काही धोका होईल का?. बांधकाम जर पिलर घालून केलेले असेल तर ते छत वजन सहज पेलू शकते. आपण एकावर एक अनेक मजली इमारती पाहतो. समजा तीन मजली इमारत आहे. त्या इमारतीच्या टेरेसवर शेती कारायची आहे. दुसर्‍या मजल्यावर राहत्या घरातील साहित्याच्या वजनाचा अंदाज घ्या. या साहित्यापेक्षा काही पटीने कमी वजन गच्चीवरील शेतीसाठी वापरलेल्या मातीचे असते. मग वजन पेलवेल का नाही हा प्रश्न लगेचच निकाली निघतो. दुसरा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे तो म्हणजे गच्चीवर शेती केली तर छत गळेल का? छताला जर व्यवस्थित प्लास्टर केले असेल आणि ते शेती न करताही गळत नसेल तर ते शेती केल्यावरही गळणार नाही. तरीही शेती करताना आपण थोडी काळजी घेऊ शकतो. जसे की, जाहिरातींसाठी वापरलेले फ्लेक्स गच्चीवर अंथरून त्यावर माती टाकता येईल. जेणेकरून माती आणि पाण्याचा क्राँक्रीटशी सरळ संपर्क येणार नाही. गच्चीवर साठलेले पावसाचे पाणी जाण्यासाठी जो मार्ग ठेवलेला असतो त्याला अडथळा होणार नाही अशी जागा निवडून तिथे माती टाकावी. चारही बाजूंनी चालण्यासाठी रस्ता ठेवून चौरसात विटा रचून बेड तयार करावा. दोन ते तीन विटांची उंची हे भाजीपाला शेतीसाठी पुरेसे आहे. दोन विटा असतील तर पालक, मेथी, मोहरी, पुदिना, करडई, तमाटे या भाज्या घेता येतात. मिरची, वांगी, घेवडा, पावटा, सुरण, अळू, या भाज्यांसाठी तीन विटांची उंची घ्यावी लागेल. विटांच्या ऐवजी बांबू किंवा इतर लाकडी किंवा लोखंडी पट्ट्यासुद्धा वापरता येऊ शकतात. मात्र, हे साहित्य कुजणार नाही यासाठी उपाययोजना करावी लागते.
जागा निवडल्यानंतर गच्चीवरील शेतीसाठी माती कुठून आणावी व कोणती माती बागकामाला योग्य हा प्रश्न असतो. शहरात रोपे विक्रेते असतात. त्यांच्याकडे माती सहज उपलब्ध होऊ शकते. त्याच्याकडील माती ही रोपवाटिकेसाठी वापरली जाणारी लाल माती असते. त्या मातीपासून सुरूवात करू शकता. छोट्या गार्डनसाठी अशी माती चांगली असते ज्यात पाणी मिसळून त्याचा सहज गोळा बनवला येतो आणि हा मातीचा गोळा सहज फुटू शकतो. जर माती खूपच घट्ट होत असेल तर त्यामध्ये थोडी राख, शेणखत, गांडूळखत मिसळून घ्यावे. कोकोपीट म्हणजेच नारळ सोलताना जो बारीक भुसा पडतो तो अशा मातीमध्ये मिसळून घ्यावा. घट्ट होणार्‍या मातीमध्ये थोडी रेती सुद्धा मिसळता येऊ शकेल. यामुळे रोपांच्या मुळांना मातीमध्ये सहज जाता येते. रेतीचे प्रमाण जास्तही असू नये. नाही तर पाणी टाकताना रोपे वाहून जातील. मुळे उघडी पडतील. थोडेफार माती हाताळायला लागल्यावर या गोष्टी सहज लक्षात येईल. हे काही खूप मोठे रॉकेट सायन्स नाही.
शहरात शेती करताना बियाणी कुठून आणायची हा प्रश्न असतो. धने, मेथी, मोहरी यांच्या बिया कोणत्याही किराणा दुकानात सहज उपलब्ध होतात. पुदिना लावायचा असेल तर बाजारातून आणलेल्या पुदीन्याच्या जुडीची सर्व पाने तोडून घेतल्यावर त्याच्या उरलेल्या कांड्या कुंडीत लावलात तर त्यालाच पालवी फुटते. अनेकदा घरात ठेवल्याजागी कांद्याला मोड फुटतो. असे पाच सहा कांदे कुंडीत लावल्यास महिन्याभरात कांद्याची पात भाजीसाठी तयार होते. बाजारातून आणलेले टोमॅटो भाजी करण्यापूर्वी कापून एखाद्या कुंडीत पिळल्यास त्यापासून सहज रोपे तयार होतात. भेंडी, पालक, वांगी, चवळी, वाल, कारले, भोपळा, दोडका, आदीचे बियाणे ओळखीतून किंवा जवळपासच्या कृषी केंद्रातून सहज आणता येऊ शकते. एकदा बी विकत आणल्यावर त्यापासून पुढे आपल्याला घरच्या घरी बियाणे तयार करता येईल.
अनेकदा सोसायटीमध्ये, भाड्याच्या खोलीत/घरात अशा गच्चीवरील शेतीत पाणी वापरण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले जातात. यासाठी किचनमध्ये एक बकेट ठेऊन त्यामध्ये भाजीपाला, तांदूळ, डाळ धुतलेले पाणी तसेच साबण न लावता भांडी किंवा हात धुतल्याचे पाणी जमा करून ठेवता येऊ शकते. हे पाणी बागेसाठी वापरता येईल. पावसाळ्यात पाण्याचा विशेष प्रश्न नसतो. हिवाळ्यातही दोन ते तीन दिवसातून एकदा पाणी दिले तरी चालते. मात्र, उन्हाळ्यात रोज संध्याकाळी बागेला पाणी द्यावे लागते. पाणी देताना एक लक्षात घ्यावे की कुड्यांमध्ये किंवा बेड तयार केले असेल तर त्यात पाणी साचू देऊ नका. पाणी साचत असेल तर कुंड्यांच्या खालील छिद्रे मोकळी करून घ्यावीत. पाणी झारीने किंवा स्प्रेने टाकावे. स्प्रे किंवा झारी नसेल तर मोठी पाण्याची बाटली घेऊन त्याच्या झाकणाला वीस-पंचवीस बारीकशी छिद्रे करून घ्यावीत. बाटलीमध्ये पाणी भरून त्याचा झारीसारखा उपयोग करून रोपांना पाणी द्यावे. पाणी टाकण्यासाठी मग वापरत असल्यास अलगद कुंडीच्या जवळून पाणी टाकावे.
गच्चीवरील बागेची मशागत ही एक खूप आनंददायी गोष्ट असते. बागेतील भाजीपाला, फुलझाडे याबरोबर अनेक वनस्पती आपसूक उगवत असतात. यातील काही भाज्या म्हणून खाताही येतात. जे तन आहे ते आपल्याला लहान असताना काढून टाकावे लागते. भाजीपाल्याची पिवळी पडलेली पाने तोडून टाकणे, काही पानांवर भरपूर पांढर्‍या रेषा दिसत असतील तर ती नाग अळी असते. अशी पाने तोडून टाकावीत. पाणी टाकताना उघड्या पडलेल्या मुळावर पुन्हा माती टाकणे. अशी आठवड्यातून एकदा अर्ध्या तासाची मशागत ही बागेच्या आणि आपल्या आरोग्यालाही लाभदायक असते.
घरात लहान मुले असतील तर त्यांना भाजीपाल्याची माहिती होते आणि आपोआपच त्यांच्या ज्ञानात भर पडते. या सर्व वनस्पती हाताळून पाहणे, अनुभवणे, खाणे हे लहान मुलांच्या मेंदूमधील न्युरोन्सच्या जोडण्या होण्यासाठी खूपच उपयुक्त असते. शिवाय कोणतीही रासायनिक कीटकनाशके न वापरलेली, घाण पाण्यात न धुतलेली भाजी घरच्या घरी उपलब्ध होते. या सगळ्याच्या पलीकडे निर्मितीचा आनंद हा अवर्णयीय असतो. गच्चीवरील बागेतून निर्मितीचा आनंद मिळतो. आपण निसर्गाशी जोडले जातो. आपल्यातील परात्मभाव कमी होत जाते. शिवाय हवेतील कार्बनडायऑक्साईड कमी करण्यात आपला हातभार लागतो.


-बसवंत विठाबाई बाबाराव

(लेखक पर्यावरणविषयक अभ्यासक आहेत )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -