घरमुंबईनियती क्रूरच असते

नियती क्रूरच असते

Subscribe

नियतीला तो एक दिवस मान्यच नव्हता जणू. ते म्हणतात ना LIFE IS unpredictable ! तसाच हा प्रकार. वर्षभरात आजोबा, पप्पा, आजोबा आणि मामा गेल्यानं घराच्यावर मोठा आघात झाला होता. ऐन तिशीच्या उंबरठ्यावर असलेला बाबाचा ’वेगा’च्या ’नशेनं’ बळी घेतला होता. यावरून नियती किती क्रुर होऊ शकते हे मात्र नक्की कळलं !

बाबा (मामाचा मुलगा ) गेला! या दोन शब्दांनी कानात तप्त शिळारस ओतल्याचा भास झाला. नक्की काय बोलू? काहीच कळेना! काही सेकंदासाठी डोळ्यासमोर अंधारी आणि पण त्यातून स्वत:ला सावरत सगळे आवरले. सरांच्या कानावर घालून तडक घाटकोपर गाठले. घाटकोपरला ताईच्या घरी पोहोचलो तर चारू ( बाबाची छोटी बहिण ) शांत होती. तिच्यावर आभाळ कोसळले होते. ताई तिची समजूत काढत होती. पण त्याचा काहीही परिणाम चारूवर होत नव्हता. डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. काही वेळाने मावशीच्या घरी पोहोचलो तर सर्वजण धाय मोकलून रडत होते. पाय कापायला लागले. कारण घरच्यांना बसलेला आजवरचा सर्वात मोठा धक्का होता. केवळ २७ वर्षाचा बाबा ८ महिन्यांच्या दित्याला पोरकं करून गेला होता. क्षणात होत्याचं नव्हतं झालं होतं. अशातच धीर करत नक्की काय आणि कसे झाले याची चौकशी करायचा धीर केला. त्यानंतर कानावर पडलेल्या प्रत्येक शब्द मन सुन्न करत होता. कारण ’वेगाच्या नेशेनं’ बाबाचा बळी घेतला होता.

शुक्रवारी २७ जुलै दिवशी गुरूपौर्णिमा होती. नेहमीप्रमाणे मी ७च्या शिफ्टला ऑफिसमध्ये आलो. पण उशीर झाल्याने ऑफिस गाठण्याच्या गडबडीमध्ये मोबाईल घरीच विसरलो होतो. रिक्षामध्ये बसताना मोबाईल जवळ नसल्याचे लक्षात आले. पण मग एक दिवस मोबाईल शिवाय एकदम मस्त जाईल असा विचार करून रिक्षातून उतरण्याचा कंटाळा केला. ट्रेन पकडून ऑफिस गाठण्याची घाई. त्यात करीरोड – परळ दरम्यान मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वेचा खोळंबा. पटरीतून चालत ऑफिस गाठले. नेहमीप्रमाणे ऑफिसमधल्या मामांनी दिलेली कॉफी घेत वेबसाईट अपडेट केली. थोडावेळ भाग्यश्री आणि प्रज्ञाशी बोलत बसलो. तोच प्रज्ञाच्या मोबाईलवर चारूच्या मोबाईलवरून कॉल आला. समोरून भावोजींच्या आवाज होता म्हणून मी देखील थोडासा सावध झाला. अरे बाबाचा अ‍ॅक्सिडेंट झालाय. तू काय करतोय? मी कुठल्या हॉस्पिटलला आहे म्हणून विचारले आणि त्यानंतर पलिकडून आलेल्या ’बाबा गेला’ या दोन शब्दांनी काळीज चिरून गेलं. भारत – पाकिस्तान संबंधांना लॅपटॉमध्ये बंद करून घाटकोपर गाठले. त्यानंतर प्रत्येक क्षणी मनावर आघात होत होता. बाबाबद्दल नवनवीन अनपेक्षित गोष्टी कानावर येत होत्या. कारण जवळपास ४ वर्ष त्याचा माझ्याशी अबोला होता. ते म्हणतात ना घरोघरी मातीच्या चुली तसाच हा प्रकार! असो!

- Advertisement -

गुरूवारी मध्यरात्री नेहमीप्रमाणे बाबाबा  उशिरापर्यंत बाहेरच होता. दादांनी ( मावशीच्या मुलांनी ) त्याला जाब देखील विचारला तर जातो असे म्हणत त्याने तिथून काढता पाय घेतला होता. मित्र सोबत असल्याने पार्टी झाली होती. शुक्रवार पासून आयुष्याची नवी सुरूवात करण्याचा निर्धार केला होता. जवळपास वर्षभराचा अबोला सोडून तो पप्यादादासोबत (मावशीचा मुलगा ) उरणला हॉटेलच्या कामात त्याला मदत करणार होता. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होते. मैत्रीच्या बाबतीत बाबाला एक उक्ती नक्की लागू पडते तेरी मेरी यारी **त गेली दुनियादारी! पार्टी झाल्यावर बाबा त्याचा ’लंगोटी यार’ राहुलला घेऊन परळमधील एका गणपती मंदिराचं टी- शर्ट आणण्यासाठी निघाला होता. परळच्या मित्रांने सकाळी आणून देतो म्हणून सांगितल्यानंतर देखील ’हट्ट’ करत बाबाने बाईकला ’कीक’ मारली आणि तो भरधाव वेगाने निघाला! पण चुनाभट्टी ब्रीजवर काळ त्याची वाट पाहत होता.

ब्रिजवर असलेल्या लोखंडी पत्र्याला बाईकने धडक दिली आणि या दोन लंगोटी मित्रांना काळाने आपल्या जवळ केले होते. बाबा आणि राहुल गेल्याची बातमी म्हणजे केवळ अफवाच हीच प्रत्येकाची प्रतिक्रिया होती. पण वास्तव बदलणार नव्हतं हे नक्की ! गावी परिस्थिती वेगळीच होती. कुणी कुणाला धीर द्यायचा हेच कळत नव्हतं. पण सत्य बदलणारं नव्हतं. केवळ ८ महिन्यांच्या दित्याला कीर्तीच्या पदरात टाकून बाबा काळाच्या कुशीत चिरनिद्रा घेत होता. बाबाशी अबोला असला तरी एक दिवस सर्व गैरसमज दूर होतील असं मनाला सारखं बजावत होता. पण नियतीला तो एक दिवस मान्यच नव्हता जणू. ते म्हणतात ना LIFE IS unpredictable ! तसाच हा प्रकार. वर्षभरात आजोबा, पप्पा, आजोबा आणि मामा गेल्यानं घराच्यावर मोठा आघात झाला होता. ऐन तिशीच्या उंबरठ्यावर असलेला बाबाचा ’वेगा’च्या ’नशेनं’ बळी घेतला होता. यावरून नियती किती क्रूर होऊ शकते हे मात्र नक्की कळलं !

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -