घरताज्या घडामोडीनिवडणुका येताच त्याच मुस्लिमांशी चुंबाचुंबी; 'सामना'तून भाजपावर हल्लाबोल

निवडणुका येताच त्याच मुस्लिमांशी चुंबाचुंबी; ‘सामना’तून भाजपावर हल्लाबोल

Subscribe

भाजपचे हिंदुत्व तर ढोंगी आहेच, पण मुस्लिम प्रेमदेखील मतलबी आहे. मतलब संपला की, त्यांचे लोक पुन्हा मुस्लिमांचे झुंडबळी घ्यायला मोकळे. भाजपचे नवकव्वाल म्हणजे तात्पुरती व्यवस्था आहे. भाजपला स्वतःचा ‘इझम’ असा नाहीच. तसे असते तर वीर सावरकरांच्या नावाने यात्रांचे ढोंग करताना हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अयोध्या आंदोलनातील योगदान नाकारण्याचे पाप त्यांनी केले नसते.

‘एका बाजूला हिंदुत्वाच्या नावावर मुस्लिम समुदायावर हल्ले करतात तर निवडणुका येताच त्याच मुस्लिमांशी चुंबाचुंबी करून सेक्युलरवादाचा बुरखा पांघरत असतात’, अशा शब्दांत ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपावर हल्लाबोल करण्यात आला आहे. शिवाय, ‘भारतीय जनता पक्षासारखा ढोंगी आणि नौटंकीबाज पक्ष हिंदुस्थानात दुसरा कोणता नसेल. राजकीय स्वार्थासाठी हे लोक कधी काय सोंगेढोंगे करतील याचा भरवसा नाही’, अशी टीकाही भाजपावर करण्यात आली आहे. (saamana editorial on sufi damvad bjp policy and politics on muslims)

अग्रलेखात नेमके काय?

- Advertisement -

भारतीय जनता पक्षासारखा ढोंगी आणि नौटंकीबाज पक्ष हिंदुस्थानात दुसरा कोणता नसेल. राजकीय स्वार्थासाठी हे लोक कधी काय सोंगेढोंगे करतील याचा भरवसा नाही. एका बाजूला हिंदुत्वाच्या नावावर मुस्लिम समुदायावर हल्ले करतात तर निवडणुका येताच त्याच मुस्लिमांशी चुंबाचुंबी करून सेक्युलरवादाचा बुरखा पांघरत असतात. आताही म्हणे ‘भाजप’ची मंडळी मुस्लिम मतदारांशी ‘सुफी संवाद’ साधणार आहेत. भाजपचे मुस्लिम नेते, केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री हे विविध दर्ग्यांना भेटी देणार आहेत आणि तेथे कव्वाली ऐकणार आहेत. संपूर्ण देशभरात ही मोहीम राबविली जाणार आहे. त्यादृष्टीने भाजपच्या अल्पसंख्याक विभागातर्फे ‘सुफी संवाद महाअधिवेशन’ भरविण्याची तयारी सुरू आहे. सुफी दर्ग्यावर जाणाऱ्या मुस्लिमांना कव्वालीच्या माध्यमातून मुस्लिमांबाबत भाजपच्या मनात कसा द्वेष नाही, असे सांगण्यात येणार आहे. भाजपचे हे मुस्लिम प्रेम खरे नसून पुतनामावशीचे आहे. हा उमाळा मुस्लिम समाजाविषयी नाही, तर मुस्लिम मतांसाठीचा आहे.

2024ची लोकसभा निवडणूक आता एक वर्षावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे भाजपला मुस्लिम प्रेमाची उचकी लागली आहे. ही उचकी एक वर्षभर टिकेल आणि निवडणूक संपली की थांबेल. एकीकडे हिंदू-मुस्लिम वाद पेटवून दंगली घडवायच्या आणि त्यावर स्वतःच्या राजकीय पोळय़ा भाजून घ्यायच्या हाच या मंडळींचा ‘हिंदुत्ववाद’ आहे. आता तर या वादात तथाकथित ‘कथावाचकां’च्या प्रक्षोभक भाषणांचे तेल ओतण्याची आणि धार्मिक दंगलींचा मोठा भडका उडविण्याचीच योजना राबवली जात आहे. नुकत्याच झालेल्या रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या दिवशी देशाच्या विविध भागांत झालेल्या दंगली या योजनेचाच एक भाग होता. हिंदू–मुस्लिम ध्रुवीकरणाच्या राजकारणाचे भाजपचे हे परंपरागत तंत्र आहे.

- Advertisement -

निवडणुकांच्या तोंडावर होणाऱ्या हिंदू-मुस्लिम दंगली आणि नंतर होणाऱ्या मतांच्या ध्रुवीकरणावर भाजलेल्या सत्तेच्या पोळ्या हा भाजपचा ‘खरा चेहरा’ आहे. तरीही राजकीय गरज आणि अपरिहार्यता म्हणून अधूनमधून ते त्यावर मुस्लिम प्रेमाचा मुखवटा चढवीत असतात. आताची ‘सुफी संवाद’ मोहीम हा असाच एक मुखवटा आहे. त्यांचे मुस्लिम प्रेम हेही शुद्ध भावना नसून त्यांच्या मतांसाठी आहे. जम्मू-कश्मीरमध्ये भाजपने फुटीरवादी मेहबुबा मुफ्ती यांच्या ‘पीडीपी’ पक्षासोबत सरकार स्थापन केलेच होते. राजकीय स्वार्थ साध्य झाल्यावर या आघाडीची पुंगी मोडून टाकली होती. दुसरे ते ओवेसी हे धर्मांध मुस्लिम नेतेदेखील भाजपची ‘बी’ टीम, ‘सी’ टीम म्हणूनच वागत असतात. भाजपसारख्या पक्षाला असे ‘मुखवटे’ कायम हवे असतात. कारण त्याखाली त्यांना आपले ढोंगी हिंदुत्व आणि बोगस मुस्लिम प्रेम लपविता येणे शक्य होते.

एकीकडे हिंदू-मुस्लिम विसंवाद कसा वाढेल हे पाहायचे आणि दुसरीकडे ‘सुफी संवाद’चे नाटक करून मुस्लिम समाजाला फसवायचे, एकीकडे उत्तर प्रदेशात नवीन मदरशांना सरकारी अनुदान नाकारायचे, अडीच हजारांवर मदरशांची मान्यता रद्द करायची आणि दुसरीकडे त्याच उत्तर प्रदेशात ‘सुफी संवाद’ या नाटकाचा प्रयोगही सादर करायचा, उत्तर प्रदेशमधील मदरशांत पंतप्रधान मोदी यांच्या ‘मन की बात’च्या उर्दू प्रती वाटायच्या. पंतप्रधान आणि इस्लामचे अभ्यासक यांच्यात झालेल्या चर्चेच्या उर्दू प्रतीही मदरशांमध्ये वितरित करायच्या.

मुस्लिम प्रेमाचा हा पान्हा भाजपला आताच का फुटला? सरसंघचालकांनाही ‘मुसलमानांशिवाय हिंदुस्थान अपूर्ण’ किंवा ‘हिंदू-मुस्लिम यांचा डीएनए एकच’ हे साक्षात्कार अलीकडेच का व्हावेत? हैदराबाद येथे गेल्या सप्टेंबरमध्ये झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत ‘मुस्लिमांपर्यंत पोहोचा’ असा पुकारा करण्याची गरज पंतप्रधान मोदी यांना का वाटली? गुलामअली खटना यांच्यासारख्या कश्मिरी नेत्यांना राज्यसभेचे सदस्यत्व देणे किंवा पद्म पुरस्कारप्राप्त मुस्लिम मान्यवरांच्या मनोगताचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर ‘व्हायरल’ करणे, हे प्रकार एका सूत्रबद्ध पद्धतीने आत्ताच का घडावेत? देशातील मुस्लिमांविषयी भाजपला खरोखर प्रेम दाटून आले असेल तर चांगलेच आहे.

पण पूर्वानुभव आणि पूर्वेतिहास वेगळाच आहे, त्याचे काय? ‘हिंदू-मुस्लिम धुवीकरणावर आपल्या राजकीय पोळ्या भाजणारे’ अशीच त्यांची प्रतिमा आहे. तेव्हा दर्ग्यात जाऊन कव्वालीच्या माध्यमातून भाजप प्रेमाचे राग आळविणे, ‘सुफी संवाद’ मोहीम राबविणे यामागे भाजपचे फक्त मुस्लिम प्रेम आहे, मतांचा जोगवा नाही, हा त्यांचा दावा पटणार कसा? एकीकडे अभ्यासक्रमातून मोगल इतिहास हद्दपार करायचा, कर्नाटकात ‘हिजाब’चा वाद पेटवून त्या राज्याला ‘हिंदुत्वाची प्रयोगशाळा’ म्हणून वापरायचे, त्याच राज्य सरकारच्या मुस्लिम आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाचे स्वागत करायचे, तथाकथित कथावाचकांच्या माध्यमातून जागोजागी हिंदू-मुस्लिम तणाव निर्माण करायचा आणि दुसरीकडे सुफी दर्ग्यांमध्ये जाऊन मुस्लिम प्रेमाची ‘कव्वाली’ गायची. हे ढोंग आहे.

भाजपचे हिंदुत्व तर ढोंगी आहेच, पण मुस्लिम प्रेमदेखील मतलबी आहे. मतलब संपला की, त्यांचे लोक पुन्हा मुस्लिमांचे झुंडबळी घ्यायला मोकळे. भाजपचे नवकव्वाल म्हणजे तात्पुरती व्यवस्था आहे. भाजपला स्वतःचा ‘इझम’ असा नाहीच. तसे असते तर वीर सावरकरांच्या नावाने यात्रांचे ढोंग करताना हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अयोध्या आंदोलनातील योगदान नाकारण्याचे पाप त्यांनी केले नसते.


हेही वाचा – शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात ‘बंद दाराआड’ जवळपास सव्वातास चर्चा…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -