घरमुंबईमुंबईच्या रस्त्यांवर सायकल होर्डींग झळकणार

मुंबईच्या रस्त्यांवर सायकल होर्डींग झळकणार

Subscribe

होर्डींग धोरणात सायकलवरील जाहिरातबाजीला प्राधान्य

न्यायालयाने मोबाईल होर्डिंगला बंदी आणल्याने महापालिकेन नव्याने बनवलेल्या होर्डिंग धोरणामध्ये दोन व तीन चाकी सायकलवरील होर्डिंग संकल्पना मुंबईत राबवण्यात येणार आहे. धोरणाचा मसुदा तयार असून याची अंमलबजावणी झाल्यास मुंबईतील अनेक भागांमध्ये यापुढे सायकल होर्डिंग पाहायला मिळणार आहे. मुंबईला स्मार्ट सिटी बनवण्याची स्वप्ने बघितली जात असतानाच दुसरीकडे सायकल होर्डिं लावून अलाहाबादप्रमाणे सायकलची गर्दी रस्त्यावर वाढवली जाणार आहे.

मुंबई महापालिकेच्यावतीने होर्डिंगसंदर्भात मार्गदर्शक धोरण तयार करण्यात आले आहे. या धोरणाचा मसुदा काही महिन्यांपूर्वी महापौरांसह गटनेत्यांसमोर सादर करण्यात आला होता. त्यात इमारतींवर लावण्यात येणारी होर्डिंग किती अंतरावर असतील हे निश्चित करण्यात आले. यामध्ये 100 मीटर अंतरावर होर्डिंग लावण्यात निश्चित करतानाच पुरातन वास्तू इमारत आणि 30 वर्षे जुन्या इमारतींवर होर्डिंग जाहिरातबाजी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र, याशिवाय या धोरणात सायकल होर्डिंगच्या संकल्पनेचाही सामावेश आहे.

- Advertisement -

यामध्ये दोन व तीन चाकी सायकलवर होर्डिंग लावून जाहिरातबाजी करण्यास परवानगी दिली जाणार आहे. त्यामुळे आधीच रस्त्यांवर वाहनांसाठी जागा नाही. त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असताना आता त्यात दोन आणि तीन चाकी सायकलींची भर पडणार आहे. हैद्राबादमध्ये राबवलेल्या सायकल होर्डिंग संकल्पनेच्या आधारे मुंबईत याची सुरुवात होत आहे. परंतु हैद्राबादमध्ये जाहिरातींच्या होर्डिंग सायकलना मॉल्समध्येच उभे करण्याची परवानगी आहे. त्यांना रस्त्यांवर उभे राहता येत नाही. परंतु मुंबईत सर्वच रस्त्यांवर जाहिरातींच्या सायकली उभ्या राहणार आहेत. त्यामुळे नरिमन पॉईंट, मरिन ड्ाईव्ह, गेट वे ऑफ इंडियासह अनेक भागांसह गर्दीच्या ठिकाणी या सायकलींची गर्दी होण्याची शक्यता आहे.

सायकल होर्डींग लावण्यासाठी वाहतूक पोलिसांची परवानगी बंधनकारक असली तरी दोन व तीन सायकलीची नोंदणी होत नाही. त्यांना क्रमांक नसल्याने एका सायकलच्या नावाने परवानगी घेऊन शंभर सायकल उभ्या करून जाहिरातींच्या होर्डींग झळकवल्या जातील, अशीही भीती व्यक्त होत आहे. याशिवाय सायकलला जाहिरात लावल्यास दिवसाला हजार ते दोन हजार रुपये मिळत असल्याने अनेक जण सायकल घेऊन रस्त्यांवर तसेच पदपथांवर उभे राहतील. त्यामुळे या सायकलवरील जाहिराती लोकांना भुरळ पाडणार्‍या असल्या तरी पुढे त्रासदायकच ठरण्याचीही भीती व्यक्त होत आहे.

- Advertisement -

जाहिरात होर्डिंगच्या धोरणाचा मसुदा बनवला आहे. त्याला अद्याप अंतिम मान्यता मिळालेली नाही. मसुद्यामध्ये सायकल होर्डिंगचा समावेश आहे. परंतु यासाठी वाहतूक पोलिसांचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे. जर पोलिसांची परवानगी असेल तरच सायकल होर्डींगना परवानगी दिली जाईल.

– शरद बांडे, अधिक्षक, परवाना विभाग, महापालिका

जाहिरात धोरण ठराविक माणसांना डोळयासमोर ठेऊन बनवला आहे. मुंबईत आधीच वाहनांमुळे वाहतूक कोंडी होते. त्यात जाहिराती झळकवणार्‍या सायकल आल्यास वाहतूक कोंडीत भर पडेल. तसेच सायकल पदपथांवर उभ्या करण्यात येतील. त्यामुळे आधीच पदपथ अपुरे असताना सायकलींमुळे अडचणी उद्भवू शकतात.

– रवी राजा, विरोधी पक्षनेते, महापालिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -