घरमुंबईनिवडणुकीआधी पॅचअपसाठी सेनेला अधिकच्या मंत्रिपदाची भाजपची ऑफर

निवडणुकीआधी पॅचअपसाठी सेनेला अधिकच्या मंत्रिपदाची भाजपची ऑफर

Subscribe

मुंबई:-निवडणुकीपूर्वी शिवसेनेला आपलेसे करण्यासाठी भाजपने पुढचे पाऊल टाकायचे ठरवलेले दिसत आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करताना सेनेला अधिकचे मंत्रिपद देऊन त्या पक्षाची आगामी निवडणुकीपूर्वी चाचपणी करण्याचा प्रयत्न भाजपने चालवला आहे. यासाठी दोन पावले मागे येण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केला आहे. सेनेला अधिकचे मंत्रिपद देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पक्ष नेत्यांची संमतीही घेतल्याचे सांगितले जात आहे.

गेल्या काही महिन्यांपासून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असल्याची चर्चा होती. येऊ घातलेल्या निवडणुकीआधी वातावरण सत्ताधारी भाजपच्या विरोधात जाऊ लागल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार करून नाराजांना संधी देण्याची चाल भाजपने चालली आहे. सत्तेत राहून उघड विरोध करणार्‍या सेनेच्या नाकदुर्‍या काढण्याचा भाजपने अनेकदा प्रयत्न करून पाहिला. पण शिवसेनेने याला दाद दिली नाही. सेनेला निवडणुकीपूर्वी आपलेसे करण्यासाठी भाजपने महामंडळाच्या जागावाटपासून सुरुवात केली. अधिकची महामंडळे देत भाजपने सेनेला गप्प राहण्याचा संदेश दिला.

- Advertisement -

मात्र महामंडळानंतरही शिवसेनेने भाजप आणि त्या पक्षाचे नेते नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यावरील हल्ले सुरूच ठेवले. यामुळे आगामी निवडणुकीत काय होणार असा प्रश्न भाजपला पडला होता. यातून मार्ग काढण्यासाठी आता मंत्रिमंडळ विस्ताराचा डाव भाजपने टाकला आहे. राज्य मंत्रिमंडळात सहा जागा अजून रिक्त आहेत. यातील पाच जागा या भाजपच्या वाट्यातील असून, एक जागा सेनेची आहे. विस्तारात सेनेला अधिकचे मंत्रिपद देण्याचा निर्णंय घेत भाजप सेनेला जवळ करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात आले. इतकेच नव्हे तर महत्वाच्या मंत्रिपदाबरोबरच खातेही महत्वाचे देण्याकडे मुख्यमंत्र्यांचा कल आहे.

विद्यमान आरोग्यमंत्री दीपक सावंत हे उध्दव ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासातील मंत्री म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकडील आरोग्य मंत्रीपद तसेच ठेवून आणखी एक मंत्रिपद सेनेला देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांचा आहे. यातून सेनेचा राग कमी होऊन निवडणुकीत युती निर्माण व्हावी, असा प्रयत्न मुख्यमंत्र्यांचा आहे. मुख्यमंत्र्यांच्या या देकाराला शिवसेना कसे सहकार्य करते हे लवकरच पाहायला मिळेल.

- Advertisement -

सेनेतील काही धुरीणांनीही युतीसाठी हात सैल ठेवा, असे मुख्यमंत्र्यांना सांगितले होते. राज्य मंत्रिमंडळाच्या खांदेपालटाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीश्वरांच्या आशीर्वादाने घेतला आहे. यामुळे मंत्रीपदावरुन कोणाला डच्चू मिळणाऱ आणि मंत्रीपदी नव्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार. यात शिवसेना सहभागी होणार का याबद्दल चर्चेला उधाण आले आहे. भाजपच्या या मंत्रिमंडळ ऑफरबद्दल उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात काय भूमिका घेतात याकडेही राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून राहिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -