घरमुंबईभाजपचा सेनेवर दबाव

भाजपचा सेनेवर दबाव

Subscribe

अन्यथा दोन्ही निवडणुका एकत्र घेऊ

मुंबई:- राज्यात आमच्याबरोबर युती न केल्यास दोन्ही निवडणुका एकत्र घेण्याची धमकी भाजपने शिवसेनेला दिली आहे. भाजपशी युती करण्याबाबत शिवसेनेत प्रचंड विरोध होतो आहे. दुसरीकडे सेनेबरोबर युती न केल्यास राज्यात पक्षाला गंभीर स्थितीला तोंड द्यावे लागणार असल्याचे भाजपच्या पक्षांतर्गत सर्वेक्षणात सांगण्यात आले आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत सेनेने युती करावी, यासाठी भाजपने हा सारा आटापिटा सुरू केला आहे.

राज्यात होत असलेल्या विविध सर्वेक्षणात भाजपसाठी अनुकूल वातावरण नसल्याचे स्पष्ट होत आहे. भाजप-शिवसेना निवडणुकीला स्वतंत्रपणे सामोरे गेल्यास मतांच्या विभागणीचा विपरित परिणाम दोन्ही पक्षांना विशेषत: भाजपला सोसावा लागेल, असे सांगण्यात आले आहे. शिवसेनेने निवडणुकीत युती करावी, म्हणून भाजपने नुकतीच महामंडळांवर नियुक्त्या केल्या असून महत्त्वाची महामंडळे सेनेला देऊ केली आहेत. नव्याने मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी भाजपने सेनेपुढे प्रस्तावही ठेवला होता. यासाठी स्वत: मुख्यमंत्री फडणवीस यांनी पक्षाध्यक्ष अमित शहा यांना सेनेला अधिकची मंत्रिपदे देण्याची सूचना केली. पण सेनेने याला फारसे महत्व दिले नाही. उलट नुकत्याच पार पडलेल्या दसरा मेळाव्यात सेनेने पुन्हा भाजपला टार्गेट केले आणि चार वर्षांच्या कारभाराचा जाब विचारला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीतील कार्यक्रमानंतर उध्दव ठाकरे यांनी तिथे जाऊन शेतकर्‍यांच्या कर्जमाफीवर भाजपला धारेवर धरले.

- Advertisement -

पुण्याच्या दौर्‍यात उध्दव ठाकरे यांनी, चार वर्षे आम्ही किती कळा सोसल्या, असा चिमटा काढत भाजपवर टीका केली. या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीत शिवसेना मदत करणार की नाही यासंबंधी भाजप पुरती साशंक आहे. ही परिस्थिती भाजपला खाईत लोटणारी असल्याने त्या पक्षाचे नेते कासावीस झाले आहेत. इतके होऊनही शिवसेनेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही, असे पाहून भाजपने दोन्ही निवडणुका एकत्र घेण्याचा इशारा दिल्याचे सांगण्यात आले. एकत्र निवडणुका घेण्यात आल्यास भाजप वगळता इतर पक्षांना दोन्ही निवडणुकांना सामोरे जाणे अवघड होईल, असे भाजपला वाटते. विशेषत: शिवसेनेसाठी एकाचवेळच्या दोन्ही निवडणुका या मैलाचा दगड ठरतील, असे भाजपला वाटते. यातून युतीचा निर्णय सेना नेते घेतील, असा कयास भाजप नेत्यांचा आहे.

राज्यात भाजपचे लोकसभेचे २२ खासदार आहेत. तर सेनेच्या खासदारांची संख्या १८ आहे. ही निवडणूक या दोन पक्षांनी स्वतंत्ररित्या लढवल्यास काँग्रेस आघाडीला ३६, भाजप आणि मित्रपक्षांना १६ आणि सेनेला २ जागा मिळतील, असा अंदाज स्टार वाहिनीच्या सर्वेक्षणात नमूद करण्यात आला आहे. मात्र सर्वच पक्ष स्वतंत्ररित्या निवडणुकीला सामोरे गेल्यास भाजपला पूर्वीप्रमाणेच २२ तर सेनेला ७ जागा मिळतील, अशी अपेक्षा आहे. तर काँग्रेस ११ आणि राष्ट्रवादीला ८ जागा मिळतील, असे या सर्वेक्षणात म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -