घरमुंबईमुंबई पालिका आयुक्तांनी प्रभाग रचनेचा पेनड्राईव्ह बदलला, भाजपचा आरोप

मुंबई पालिका आयुक्तांनी प्रभाग रचनेचा पेनड्राईव्ह बदलला, भाजपचा आरोप

Subscribe

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी राजकीय दबावाखाली अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्रभाग रचनेचा पेनड्राईव्ह बदलून शिवसेनेला अनुकूल होईल अशी प्रभाग रचना तयार केल्याचा गंभीर आरोप भाजपने केला आहे. याचा निषेध म्हणून सोमवारी भाजपच्या नगरसेवकांनी गटनेते प्रभाकर शिंदे यांच्या नेतृत्त्वात गांधीटोपी घालून आयुक्तांना गुलाब पुष्प देत गांधीगिरी आंदोलन केलं.

राज्यात महापालिकांच्या निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या प्रभाग रचनेतील बदलामुळे राजकारण रंगलं आहे. मुंबई महानगरपालिकेची फेूब्रुवारी २०२२ मध्ये निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रभाग पुनर्रचना आराखडा पालिका प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाला सादर केला आहे. या प्रभाग रचनेवर भाजपने आक्षेप घेतला आहे. शिवसेनेने एका बाह्य खाजगी एजन्सीकडून आपल्याला अनुकूल अशी प्रभाग रचना बनवून रातोरात आयुक्तांच्या संगनमताने पेन ड्राइव्ह बदलल्याचा गंभीर आरोप भाजपने केला आहे. राजकिय सोयीसाठी बेकायदेशीररित्या फेरफार करण्यात आला असून या पुनर्रचनेमुळे मुंबईकरांची गैरसोय होणार आहे. पश्चिम उपनगरातील अनेक प्रभागांमध्ये मोठा फेरफार करण्यात आल्याचा दावाही भाजपने केला आहे. भाजपच्या सर्व नगरसेवकांनी आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या दालनाबाहेर जमा होत त्यांनी आयुक्तांची भेट घेत त्यांना गुलाबपुष्प भेट दिली. प्रत्येक नगरसेवकांनी दिलेले पुष्प आयुक्तांनी प्रेमाने स्वीकारले. यावेळी आयुक्तांनी, या सर्व नगरसेवकांना बसून चर्चा करू असं सांगितलं.

- Advertisement -

प्रभागरचना शिवसेनेला अनुकूल करण्यात आयुक्तांचा सिंहाचा वाटा – प्रभाकर शिंदे

मुंबई महानगरपालिकेतील प्रभाग रचना शिवसेनेला अनुकूल अशी करण्यात पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांचा सिंहाचा वाटा आहे, असा आरोप भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपली आहे. पण त्या निवडणुकीच्या बाबतीत कुणालाही कसलीही माहिती न देता किंबहूना नियमांची मोडतोड करुन लोकशाही मुल्य पायदळी तुडवून या मुंबई महानगरपालिकेतील प्रभाग रचना ही शिवसेनेला अनुकूल अशा पद्धतीने करण्याचा घाट हा या मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाचे प्रमुख म्हणून आयुक्तांनी घातला आहे. कोणत्याही अधिकाऱ्याला विश्वासात न घेता किंबहूना अधिकाऱ्यांनी जी प्रभाग रचना तयार केली होता त्याचा पेनड्राईव्ह बदलून राजकीय संगनमताने या मुंबई महानगरपालिकेतील प्रभाग रचना शिवसेनेला अनुकूल अशी केली, असा आरोप भाजपने केला आहे. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना परमेश्वाराने सद्बुद्धी द्यावी, म्हणून प्रार्थना देखील करणार आहोत, असं प्रभाकर शिंदे म्हणाले.

मुंबई शहरामध्ये ५०० चौरस मीटरच्या सदनिकांना करमाफी न देऊन फसवलं गेलं. मुंबई शहरातील रस्त्यांवर खड्डेमुक्त न करता त्या मुंबईकरांना फसवलं गेलं. या मुंबई शहरामध्ये ज्या ज्या वेळी पूर येतो त्यावेळेला थापा मारुन त्या पुरात बुडालेल्या मुंबईकराला फसवलं गेलं. आता तर प्रभाग रचना बदलून मनमानी पद्धतीने एकाच पक्षाला कसं अनुकूल होईल अशा पद्धतीची प्रभाग रचना करुन मुंबई महानगरच्या या आयुक्तांनी मुंबईकरांची घोर फसवणूक केली आहे, असा आरोप भाजपने केला आहे.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -