घरमुंबईमुलुंडच्या 'मॅरेथॉन गॅलॅक्सी' इमारतीत डेंग्यूचे अड्डे उद्धवस्त

मुलुंडच्या ‘मॅरेथॉन गॅलॅक्सी’ इमारतीत डेंग्यूचे अड्डे उद्धवस्त

Subscribe

मुंबई महापालिकेच्या किटक नियंत्रक विभागाने मुलुंडच्या 'मॅरेथॉन गॅलॅक्सी' इमारतीत डेंग्यूचे अड्डे उद्धवस्त केले आहेत.

मुलुंड परिसरात असणाऱ्या ‘मॅरेथॉन गॅलॅक्सी’ या इमारतीत सहाव्या मजल्यावर राहणाऱ्या एका ३२ वर्षीय व्यक्तीचा डेंगीची लागण होऊन दुर्दैवी मृत्यु झाला आहे. तर त्याच व्यक्तीच्या कुटुंबातील दोघांना डेंगीची लागण झाली असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. या अनुषंगाने महापालिकेच्या किटक नियंत्रक खात्याद्वारे सोसायटीची पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान सोसायटीमध्ये ४ ठिकाणी डेंगीच्या विषाणूंचा प्रसार करणाऱ्या ‘एडिस एजिप्टाय’ डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत.

सोसासटीत आढळले डेंगीचा प्रसार करणारे किटक

मुलुंड परिसरातील या सोसायटीमध्ये सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत महापालिकेच्या पथकाने पाहणी केली. या पाहणी दरम्यान सोसायटी परिसरात ४ ठिकाणी साचलेल्या पाण्यामध्ये डेंगीचा प्रसार करणारे एडिस एजिप्टाय डासांच्या अळ्या मोठ्ठ्या प्रमाणात आढळून आल्या. ही उत्पत्तीस्थळे महापालिकेच्या पथकाने तात्काळ नष्ट केली. मुलुंडमधील याच सोसायटीच्या शेजारी असणाऱ्या ‘ओयासिस’ नावाच्या सोसायटीमध्ये महापालिकेच्या कीटक नियंत्रण खात्याचे पथक तपासणी साठी गेले असता, त्यांना सुरुवातीला प्रवेश नाकारण्यात आला होता. मात्र आज महापालिका अधिकाऱ्यांच्या स्तरावर संबंधित सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा विनंती केल्यानंतर महापालिकेच्या पथकाला आज प्रवेश देण्यात आला. त्यानुसार महापालिकेच्या पथकाने आज तपासणीअंती या सोसायटीमध्ये देखील २ ठिकाणी डेंगी प्रसार करणाऱ्या ‘एडिस एजिप्टाय’ डासांची उत्पत्तीस्थळे आढळून आली. ही उत्पत्तीस्थळे महापालिकेच्या पथकाने तात्काळ नष्ट केली आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – स्वाईन फ्लू, लेप्टो, डेंग्यू नियंत्रणासाठी महापालिका स्तरावर लस खरेदी करा

मॅरेथॉन गॅलॅक्सीच्या सहाव्या मजल्यावरील ज्या फ्लॅटमधील व्यक्तींना दुर्दैवाने डेंगीची लागण झाली, त्याचा फ्लॅटच्या खाली असणाऱ्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅटच्या गॅलरीत ठेवलेल्या सामानात साचलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणात डेंगी प्रसार करणा-या एडिस डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत. या सर्व अळ्या महापालिकेच्या पथकाद्वारे तात्काळ नष्ट करण्यात आल्या आहेत, अशी माहिती महापालिकेचे कीटकनाशक अधिकारी राजन नारिंग्रेकर यांनी दिली आहे.

- Advertisement -

सहा महिन्यात सुमारे ६९ लाख घरांची पाहणी

महापालिकेद्वारे जानेवारी ते २० जुलै २०१९ या सुमारे साडे सहा महिन्यांच्या कालावधी दरम्यान महापालिकेच्या चमूंद्वारे ६८ लाख ८१ हजार ६८६ घरांची संयुक्त पद्धतीने तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान इमारतींच्या / सोसायटींच्या परिसरात १८ हजार ४२० ठिकाणी डेंगी विषाणूंचा प्रसार करणाऱ्या ‘एडिस एजिप्टाय’ डासांची उत्पत्तीस्थळे आढळून आली आहेत. तर ३ हजार ७५२ ठिकाणी ‘ऍनाफिलीस’ या मलेरियाचा प्रसार करणाऱ्या डासांची उत्पत्तीस्थळे आढळून आली आहेत.


हेही वाचा – डेंग्यूने मुंब्र्यात दोघांचा बळी; युवक काँग्रेसचे थाळीनाद आंदोलन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -