घरमुंबईठाणे, कल्याण, डोंबिवलीचा सखल भाग जलमय

ठाणे, कल्याण, डोंबिवलीचा सखल भाग जलमय

Subscribe

मुंबईसह आसपासच्या शहरांमध्ये पावसाने पुन्हा जोरदार आगमन केले आहे. त्यामुळे ठाणे, कल्याण, डोंबिवलीतील सखल भाग जलमय झाले होते.

गेल्या अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर बुधवारी वरूण राजाने मुंबईसह आसपासच्या शहरांमध्ये हजेरी लावली. ठाणे, कल्याण, डोंबिवलीसह आजूबाजूच्या शहराला पावसाने चांगलेच झोडपून काढले. दिवसभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी गुडघाभर पाणी साचले होते. त्यामुळे साचलेल्या पाण्यातूनच नागरिकांना व वाहनांना मार्गक्रमण करावे लागले. पावसामुळे लोकल वाहतुकीवर परिणाम झाल्याने लोकल सेवा १५ ते २० मिनीटे उशिराने धावत होती. त्यामुळे नागरिकांना लेट लोकलसेवेचा फटका सहन करावा लागला.

हेही वाचा – मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग, पुढचे ४८ तास पाऊस कायम

कल्याण, डोंबिवलीत या भागात साचले पाणी

पहाटेपासूनच पावसाची संततधार सुरू होती. सकाळी १० वाजल्यानंतर पावसाने चांगलाच जोर पकडला. ठाण्यासह कल्याण, डोंबिवली परिसरात मुसळधार पाऊस पडल्याने सखल भागात पाणी साचले होते. पावसामुळे रेल्वे सेवा धीम्या गतीने सुरू होती. त्यामुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. ठाण्यातील वंदना टॉकीज परिसरातील रस्त्यावर नेहमी प्रमाणे गुडघाभर पाणी साचले होते. त्या पाण्यातून पादचारी वाट काढीत होते. तसेच समतानगर आणि संभाजीनगर परिसरातील नाला दुथडी भरून वाहत होता. त्यामुळे नाल्याशेजारी घरांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. तसेच कल्याणमधील शिवाजी चौक, महमंद अली चौक, अहिल्याबाई चौक आणि कल्याण पूर्वेतील सखाराम पाटील नगर या सखल भागात पाणी साचले होते. कल्याणमध्ये बाजारपेठेत पाणी साचल्याने अनेक दुकानदारांनी दुकानेही उघडली नाही. डोंबिवलीतील महात्मा फुले रोड व नांदिवली परिसरात पाणी साचले होते. कल्याण शीळ रोडवरील कल्याण फाटा आणि डायघर गावात पाणी शिरले होते. त्यामुळे साचलेल्या पाण्यातून ग्रामस्थांना जावे लागले. तसेच कल्याण ग्रामीण परिसरातील निळजे, आडीवली ढोकळी या २७ गावात पाणी साचल्याने परिसराला तलावाचे स्वरूप आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -