घरमुंबईचमचाभर पाण्यात डेंग्यूच्या शेकडो अळ्या, मुंबईकरांनो काळजी घ्या!

चमचाभर पाण्यात डेंग्यूच्या शेकडो अळ्या, मुंबईकरांनो काळजी घ्या!

Subscribe

पावसाळ्याच्या दिवसांत डेंग्यू-मलेरियाचा प्रादुर्भाव होणं सहाजिक आहे. दरवर्षी राज्यात नेक लोक डेंग्यू-मलेरियाच्या कचाट्यात सापडतात. डेंग्यू-मलेरियाच्या प्रतिबंधासाठी आता महापालिका कंबर कसून कामाला लागली आहे. डेंग्यू-मलेरियाची अंडी साठलेल्या पाण्यामध्ये वाढतात. त्यामुळे महापालिकेने १ जानेवारी ते ३० जून या ६ महिन्यांच्या कालावधीत जास्तीत जास्त पाण्याचे साठे हटवले आहेत. सहा महिन्यांच्या या कालावधीत पालिकेने  १० हजार ८७० टायर्स हटविले आहेत. तर ३ लाख ८४ हजार ९७७ अन्य पाणी साचू शकणा-या छोट्या-मोठ्या वस्तूही शहरातून हटविल्या आहेत. दरम्यान महापालिकेने मुंबईतील नागरिकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. नागरिकांनी डेंग्यू- मलेरियाच्या डास प्रतिबंधाबाबत आवश्यक काळजी घ्यावी असे आवाहन पालिकेच्या कीटकनाशक विभागाने केले आहे.

या वस्तूंमध्ये पाणी साचू देऊ नका

बाटलीचे झाकण, टायर, थर्माकोल, नारळाच्या करवंट्या, वातानुकुलित यंत्रणा, रेफ्रिजरेटरचा डिफ्रॉस्ट ट्रे, रिकामी शहाळी, रोप कुंड्यांखालील ताटल्या यासारख्या विविध वस्तूंमध्ये पाणी हमखास साचतं किंवा राहून जातं. या पाण्यामध्ये डेंग्यू- मलेरियाचे डास अंडी घालतात. त्यामुळे ‘पाणी साचू शकेल अशा वस्तू सातत्याने हटविणे व त्यात साचलेले पाणी नष्ट करणे गरजेचं आहे’, असं प्रशासनाने म्हटलं आहे. महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणादरम्यान घरात व घराशेजारील परिसरात साचलेल्या चमचाभर पाण्यातही डेंग्यू व मलेरियाचा प्रसार करणा-या डासांची उत्पत्ती स्थाने आढळून येतात. त्यामुळे ‘आपल्या घराच्या व कार्यालयाच्या परिसरात पाणी साचू  न देता नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे’, असे आवाहन कीटकनाशक विभागाचे अधिकारी राजन नारिंग्रेकर यांनी केले आहे.

- Advertisement -
dengue and malaria precaution
प्रातिनिधिक फोटो

अशी घ्या खबरदारी

साचलेल्या पाण्यात डासांची मादी एकावेळी सुमारे १०० ते १५० अंडी घालते. या अंड्यांमधून डास उत्पन्न होण्यास साधारणपणे आठवड्याभराचा कालावधी लागतो. त्यामुळे आठवड्यात किमान एकदा तरी आपल्या सोसायटीच्या व कार्यालयाच्या परिसराची तपासणी करणे आवश्यक आहे. या अंतर्गत आपल्या सोसायटीचा परिसर, सोसायटीतील बंद घरे, लिफ्टचे डक्ट, इमारतीची गच्ची इत्यादी विविध ठिकाणांची आठवड्यातून एकदा नियमितपणे तपासणी करुन तिथे पाणी साचलेले नसल्याची खात्री करा, पाणी साचलेले आढळून आल्यास ते काढून टाकणे किंवा नष्ट करावे.

एक कोरडा दिवस पाळा

पिंप व इतर पाणी साठवण्याची भांडी आठवड्यातून एक दिवस पूर्णपणे कोरडी ठेवत, एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. निश्चित केलेल्या या कोरड्या दिवशी पाण्याचे पिंप वा पाणी साठवण्याची इतर भांडी प्रथम पूर्णपणे रिकामी करावीत.  त्यानंतर काहीवेळाने ही भांडी कोरड्या व स्वच्छ कापडाने आतून पुसावीत. भांडी पुसत असताना ती दाब देऊन पुसावीत, जेणेकरुन पिंपाच्या आतील बाजूला चिकटलेली डासांची अंडी नष्ट होतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -