घरमुंबईसावधान! लोकलच्या महिला बोगीवर फेकल्या जातायत बिअरच्या बाटल्या

सावधान! लोकलच्या महिला बोगीवर फेकल्या जातायत बिअरच्या बाटल्या

Subscribe

मुंबईत लोकलने प्रवास करणाऱ्या महिला प्रवासी असुरक्षित असल्याचे पुन्हा एकदा एका घटनेवरून समोर आले आहे. रात्रीच्या वेळेस चालत्या लोकलमधील महिलांच्या डब्यावर बिअरची बाटली भिरकावण्याचा प्रकार घडला असून या घटनेत काही महिला जखमी झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून चालत्या लोकलवर दगड भिरकावण्यासह सिग्नल यंत्रणेत बिघाड करणे यासारख्या विकृत मनोवृत्तीच्या घटना समोर येत असून त्यामुळे रोज जाणाऱ्या चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यातही रात्रीच्या वेळेस ही घटना घडल्याने महिला प्रवाशांच्या सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

काल (२१जून) रात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून डोंबिवलीला जाणाऱ्या लोकलमधील महिलांच्या डब्यावर अचानक बिअरची बाटली फेकण्यात आली. त्यामुळे दरवाजात असलेल्या प्रवासी महिला जखमी झाल्या. कळवा ते मुंब्रा स्थानकादरम्यान रात्री साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकारानंतर संबंधित तरुणीने रेल्वे प्रशासनाकडे ट्विटरवरून तक्रार केली आहे. मात्र आम्ही संबंधितांकडे ही तक्रार पाठविली इतकेच उत्तर त्यावर रेल्वेने दिले. कळवा ते मुंब्रा स्थानकादरम्यान रेल्वे लाईनच्या कडेला अनधिकृत झोपडपट्ट्या असून ही मंडळी रेल्वे रूळांचा शौचलयाप्रमाणे वापर करताना दिसतात.

- Advertisement -

याशिवाय रेल्वेच्या लाईनच्या कडेला गुंड, दारूडे आणि गर्दुल्यांचा वाढता वावर चिंतेची बाब ठरत असून त्याचा फटका रेल्वे प्रवाशांसह रेल्वे प्रशासनालाही बसत आहे. त्यातून सिग्नलमध्ये बिघाड करणे, रेल्वेच्या मालमत्तेची नासधूस करणे अशा गोष्टी होत असून मागील दोन आठवडयात सिग्नल यंत्रणेत जो बिघाड झाला, त्यापैकी एक बिघाड अज्ञात गदुर्ल्याने ठेवलेल्या लोखंडी रॉडमुळे झाल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र हे सर्व माहीत असूनही रेल्वे पोलिस आणि रेल्वे प्रशासन या गुंडावर ठोस कारवाई करताना दिसत नसल्याचा प्रवाशांचा आरोप आहे.

- Advertisement -

दरम्यान माय महानगरचे हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर तासाभरातच आरपीएफच्या वतीने त्यावर उत्तर देण्यात आले आहे. आम्ही या संदर्भात सर्व आरपीएफच्या चौक्यांना निर्देश दिले असून कडक कारवाई करण्यात येईल असे त्यात म्हटले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -