घरमुंबईरायगड सहकारी बँकेतील भ्रष्टाचाराविरोधात रान उठविणार

रायगड सहकारी बँकेतील भ्रष्टाचाराविरोधात रान उठविणार

Subscribe

शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील जरा जस्तच बोलत आहेत. त्यांनी आपली बुध्दी गहाण ठेवली आहे. ते भ्रष्टाचाराच्या भस्मासूरला मोठा करत आहेत. त्यामुळे मला त्यांच्याकडे बघावे लागेल. आता रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील (आरडीसीसी) भ्रष्टाचाराविरूद्ध रान उठवून त्यांना धडा शिकवणार, असा इशारा शिवसेना-भाजपा युतीचे रायगड लोकसभा मतदारसंघतील उमेदवार केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी गुरुवारी अलिबाग येथे दिला.

अनंत गीते यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर कुरूळ यथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शन मेळाव्यात गीते बोलत होते. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरणमंत्री रामदास कदम, सिडकोचे अध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर, रायगड लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे प्रभारी आ. प्रवीण दरेकर, आ. भरत गोगावले, आ. निरंजन डावखरे, बाळासाहेब पाटील, विजय कवळे, जिल्हाप्रमुख किशोर जैन, महेंद्र दळवी, सुरेंद्र म्हात्रे आदी यावेळी उपस्थित होते.

- Advertisement -

बॅ. ए. आर. अंतुले यांनी काँग्रेस वाढवली, जगवली. ते राष्ट्रीय नेते होते. ते कोकणचे भाग्यविधाते होते. त्यांच्यामुळे काही लोक मोठे झाले. त्यांनी नंतर बॅ. अंतुले यांच्याशी गद्दारी केली. अशा गद्दारांना रायगडातून हद्दपार करा, असे भावनिक आवाहन गीते यांनी यावेळी केले. सेना-भाजप युती विरूध्द आघाडी अशी लढत आहे. आमची युती नसून मनोमिलन झाले आहे. आघाडी केवळ राष्ट्रवादी व शेकापच्या नेत्यांची झाली आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांची व मतदारांची आघाडी झालेली नाही. त्यामुळे या आघाडीला मी मुळीच घाबरत नाही. ही भ्रष्टाचार विरूध्द सदाचार अशी लढत आहे. सहा वेळा खासदार झालो. तीन वेळा केंद्रात मंत्री होतो. परंतु माझ्या चारित्र्यावर डाग नाही. निष्कलंक खासदार म्हणून मला निवडून द्या, असे आवाहन गीते यांनी केले.

अनंत गीते हे गरिबीतून आलेले आहेत. त्यांना गरिबांची जाण आहे. काम केल्यामुळेच ते सहावेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. यावेळीदेखील तेच निवडून येतील, असा विश्वास पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

अनंत गीते यांनी गेली पाच वर्षे मंत्री म्हणून काम केले आहे. त्यांच्या कालावधीत अनेक योजना या मतदारसंघात यशस्वीपणे राबविल्या गेल्या आहेत. त्यामुळे मत मागण्याचा अधिकार त्यांना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ देण्यासाठी गीते यांना निवडून आणायचे आहे. त्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांच्या खांद्याला खांदा लावून काम करावे, असे आवाहन प्रशांत ठाकूर यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ देण्यासाठी त्यांचा शिलेदार म्हणून काम करण्यासाठी अनंत गीते यांना विजयी करा, असे आ. भरत गोगावले यांनी केले.

ही लढाई भ्रष्टाचार विरूध्द सदाचार अशी आहे. भ्रष्टाचार्‍यांच्या भुलथापांना बळी पडू नका. भ्रष्टाचार्‍यांना गावात थारा देऊ नका. प्रत्येकाने आपले काम चोख बजावल्यास गीते निवडून येण्यात कोणतीच अडचण येणार नाही, असे प्रवीण दरेकर म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -