घरमुंबईमृत्यूचे क्रॉसिंग

मृत्यूचे क्रॉसिंग

Subscribe

मुंबईची लाइफ लाइन समजल्या जाणार्‍या उपनगरीय रेल्वे वाहतुकीत रेल्वे क्रॉसिंग ही गंभीर समस्या बनलेली आहे. रेल्वे प्रशासनासह रेल्वे पोलीस आणि सामाजिक संस्था ही समस्या सोडवण्यासाठी सातत्याने काम करत आहेत, परंतू हा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. आजही रेल्वे क्रॉसिंग येथे शेकडो बळी जात आहेत. मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे स्थानकाच्या दरम्यान हे अपघात नेमके कुठे घडतात, का घडतात? याबाबत टीम ‘महानगर’ने घेतलेला हा आढावा...

गेल्या वर्षात ६५७ बळी

शहरातील सर्व रेल्वे स्थानकांवर पादचारी पूल बांधण्यात आले आहेत. तरीही प्रवाशांचा सर्रासपणे रेल्वे रूळ ओलांडण्याकडे कल असतो. रेल्वे स्थानकांशिवाय अन्य ठिकाणी असलेल्या रेल्वे पादचारी पुलाचाही वापर आज अल्प प्रमाणात होत आहे. रेल्वे फाटक बंद असतानादेखील नागरिक रेल्वे रूळ ओलांडत असतात. त्यामुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. २०१७ साली सुमारे ३ हजार २००च्या आसपास प्रवाशांचे बळी गेले. त्यातील ६५७ बळी हे रेल्वे रुळ ओलांडताना झाल्याचे आढळून आले आहे. अतिघाईचा हा दुष्परिणाम म्हणावा लागेल. रेल्वे प्रशासन याबाबतीत जनजागृती करते, मात्र रेल्वे रूळ ओलांडणार्‍यांवर कारवाई करत नाही. म्हणूनच रेल्वे रुळ ओलांडणार्‍या प्रवाशांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे. पादचारी पुल चढणे आणि उतरणे हा खटाटोप टाळून पुढच्या स्थानकांवर वेळेत पोहोचण्याच्या घाईसाठी अनेक रेल्वे प्रवासी पादचारी पुलाचा उपयोग न करता थेट रेल्वे रूळ ओलांडून स्वत:चा जीव धोक्यात घालतात. म्हणूनच शहरात प्रतिदिन १० ते १२ रेल्वे प्रवाशांना प्राणास मुकावे लागते. याविषयी जनजागृती करण्यासाठी मध्य रेल्वे स्थानकावरील महत्त्वाच्या अन् गर्दीच्या कुर्ला रेल्वे स्थानकात आर पी एफ् जवानांनी यम देवाचा पेहेराव परिधान करून प्रवाशांना रेल्वे रूळ न ओलांडण्याची शपथ दिली होती. तसेच रेल्वे प्रशासनाने चित्रपटसृष्टीतील कलाकारांनाही निमंत्रित करून याबाबत जनजागृती केली होती. तरीसुद्धा रूळ ओलांडण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. २०१७ साली रेल्वे रूळ ओलांडताना सर्वाधिक मृत्यू कल्याण रेल्वे स्थानकांवर झाले आहेत. कल्याण रेल्वे स्थानकामध्ये १६०, तर त्यापाठोपाठ ठाण्यात १४२ आणि कुर्ला येथे १२४ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

शॉर्टकटसाठी कुर्ल्यात रेल्वेक्रॉसिंग

मध्य आणि हार्बर रेल्वेवरील कुर्ला हे महत्वाचे स्थानक आहे. मध्य किंवा हार्बर मार्गावर प्रवास करताना ट्रेन बदलण्यासाठी या स्थानकाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. यामुळे या स्थानकात प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. या स्टेशनमध्ये 8 प्लॅटफॉर्म आहेत. या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी 5 पूल बांधण्यात आले आहेत. मात्र पुलावर होणार्‍या गर्दीमुळे अनेक प्रवाशी शॉर्टकट म्हणून रेल्वे क्रॉसिंग करत असतात. या स्टेशनमध्ये ठाण्याच्या दिशेने मोठ्या प्रमाणात रेल्वे क्रॉसिंग होते. या ठिकाणी रेल्वे क्रॉसिंग व इतर कारणाने 2017 मध्ये 142 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. रोज या स्टेशनमध्ये 1 किंवा 2 प्रवाशांचा मृत्यु होतो. प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यासाठी रेल्वे पोलिसांनी यमदूत बनून जनजागृती केली होती. त्यानंतरही प्रवाशांमध्ये जागरूकता आलेली नाही.

- Advertisement -

रेल्वे कर्मचार्‍यांकडून नियम धाब्यावर

मध्य रेल्वेच्या माटुंगा स्टेशनमध्ये ठाण्याकडील बाजूला रेल्वे क्रॉसिंग मोठ्या प्रमाणात होते. ट्रॅक क्रॉसिंग केल्यास दंड आणि फौजदारी कारवाई असा नियम आहे. हा नियम सर्वांना लागू आहे. मात्र माटुंगा स्थानकात असलेल्या माटुंगा रेल्वे कारखाना, वरिष्ठ लेखा परीक्षा अधिकारी कार्यालय या कार्यालायमधील कर्मचारी अधिकारी यांना हा नियम लागू नाही. या कर्मचार्‍यांसाठी रेल्वेने खास पूल बांधला आहे. मात्र त्याचा वापर केला जात नाही. या ठिकाणी नॅशनल रेल्वे मजदूर संघ, सेंट्रल रेल्वे मजदूर संघ, नॅशनल रेल्वे मजदूर युनियन, महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेना, रेल कामगार सेना, ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन इत्यादी कर्मचारी युनियनची कार्यालये आहेत. या कार्यालयांमध्ये काम करणारे हजारो कर्मचारी रोज रेल्वे ट्रॅक क्रॉस करत असतात. विशेष म्हणजे आरपीएफ पोलीस ठाण्याच्या समोरच मोठ्या प्रमाणात रेल्वे क्रॉसिंग होते. परंतू आपलेच कर्मचारी असल्याने याकडे दुर्लक्ष केले जाते

उड्डाणपुलाचा वापर नाहीच

आज हार्बर लाईनवरील अनेक स्थानकांवर मोठ्या प्रमाणात रेल्वे क्रॉसिंग होताना दिसते. यात प्रामुख्याने डॉकयार्ड रोड, शिवडी, कुर्ला आणि इतर स्थानकांवर रेल्वे क्रोसिंग होत आहे. मुळात याठिकाणी उड्डाणपुल नसल्याने रेल्वे क्रॉसिंगचा पर्याय वापरला जात होता. मात्र आता उड्डाणपुलांची व्यवस्था केल्यानंतरही स्थानिकांकडून रेल्वे क्रॉसिंग केली जात आहे. हार्बर रेल्वे स्थानकाच्या कॉटनग्रीन स्थानकावरही मोठ्या प्रमाणात रेल्वे क्रॉसिंग होत होती. आता मात्र हे प्रमाण कमी झाले असून याठिकाणी रेल्वे ट्रक दरम्यान लावलेल्या लोखंडी जाळ्यामुळे हे प्रकार कमी झाले आहेत. तर शिवडी, वडाळा आणि इतर ठिकाणी ब्रीजचा पर्याय नसल्यामुळे प्रवासी रेल्वे रुळ ओलांडून दुसर्‍या बाजूला जातात. तर रेल्वे क्रॉसिंग दरम्यान कारवाई करतानाही रेल्वे प्रशासनाला अनेक अडचणी येतात. त्यात आरपीएफ जवानांची कमतरता हे या मागील मुख्य कारण आहे. जरी लोकांना अडवले, तरी त्यांच्याकडून शिवीगाळ केली जाते. वडाळा रेल्वे स्थानकादरम्यान सर्वात जास्त बंदोबस्त असतो. त्यानंतरही याठिकाणी क्रासिंग होत असल्याचे दिसून आले आहे.

- Advertisement -

डॉकयार्ड ओढवून घ्यायचा अपघात

मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गातील सर्वाधित घातक क्रॉसिंग ही डॉकयार्ड रोड स्टेशनची आहे. सॅण्डर्हस्टरोड स्टेशनच्या बाजूकडील या स्टेशनच्या मार्गातील अनधिकृत क्रॉसिंग खूपच गजबजलेली आणि कायम वापरात येणारी क्रॉसिंग मानली जाते. यामुळे अपघात हा पाचवीलाच पुजलेला आहे. सॅण्डर्हस्टरोड स्टेशनच्या हार्बर मार्गावरून मेनलाईनकडे जाण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने पादचारी पूल उभारला आहे. तसाच पादचारी पूल डॉकयार्डरोड स्टेशनवर उभारणे अत्यंत आवश्यक आणि गरजेचे बनले आहे. खरे तर पूल उभारण्यासाठी रेल्वे कोणाची वाट पाहाते तेच कळत नाही. या बेकायदा क्रॉसिंगचा वापर हा माझगाव, डीमेलो रोड, फेरीव्हार्फ येथील रहिवाशी आणि पादचारी मोठ्या संख्येने करतात. स्टेशनवर येण्यासाठी रेल्वेने नवाबटॅन्क मार्गात पादचारी पूलही उभारला आहे. या पुलाचा वापर करून स्टेशनवर जाणे अगदी सोपे आहे. मात्र पनवेल-बांद्रा जायचे असल्यास प्रवाशांना ट्रॅक पार करण्याशिवाय पर्याय नाही. वेगात येणार्‍या रेल्वेचा अंदाज चुकला की प्रवाशी प्राणास मुकला, अशी अवस्था या क्रॉसिंगची आहे. हे स्टेशन गावदेवी मंदिर डोंगर फोडून उभारण्यात आले आहे. या डोंगराचा काही भाग तोडून स्टेशन १२ डब्ब्यांचे करण्यात आले. रहदारी वाढली. पण पुलाची उभारणी झाली नाही.

लोअर परळ ते माहीम दरम्यान होतेय क्रॉसिंग

रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांनी रेल्वे रूळ ओलांडू नये यासाठी अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या असतानाही प्रवाशांकडून असे प्रकार घडत असतात. दिवसभरात अनेक अपघात घडत असूनसुद्धा लोकांकडून याकडे दुर्लक्ष केले जाते, म्हणून रेल्वे रूळ ओलांडणार्‍यांवर रेल्वे कायदा 147 प्रमाणे कारवाई केली जाते. प्रत्येक स्थानकात स्कायवॉक, ब्रिज असूनसुद्धा कित्येकदा रेल्वे रूळ ओलांडण्याचा प्रयत्न केला जातो. पश्चिम रेल्वेवर असणार्‍या लोअर परेल ते माहीम ही हद्द दादर रेल्वे स्थानकातील रेल्वे पोलिसांच्या कार्यक्षेत्रात येतात. त्यामुळे या स्टेशनदरम्यान जानेवारी 2018 ते ऑगस्ट 2018 या चालू वर्षात आतापर्यंत 334 जणांवर रेल्वे रूळ ओलांडल्यामुळे कारवाई करण्यात आलेली आहे. सदर लोकांना कोर्टात हजर केले असून त्यांच्याकडून 100 रुपयांपासून ते 2000 रुपायापर्यंतचा दंड वसूल करण्यात आला आहे. मात्र त्यानंतरही रेल्वे क्रासिंग करण्यात येत असल्याचे दिसून आले आहे.

रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी रेल्वे रुळ ओलांडू नये यासाठी ओव्हरब्रीजचा वापर करणे सुरक्षित असते. पण, त्याचे पालन होत नाही. अशा पद्धतीने धोकादायक रुळ ओलांडणे सुरूच असते. अशा नागरिकांवर कारवाई केली की, रेल्वे रुळ ओलांडण्याचे प्रकार तात्पूरते थांबतात आणि पुन्हा सुरू होतात. नागरिकांनी किमान स्वतःचा तरी विचार करावा.
– हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी ग्रुप

मध्य रेल्वेकडून सातत्याने प्रवाशांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न होत असतो. विविध माध्यमांचा वापर करत मध्य रेल्वेकडून मुंबईकरांमध्ये याबाबतीत जागृत करण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न होत असतो. प्रवाशांनी रेल्वे ओव्हरब्रीज आणि ऍक्सीलेटर (स्वयंचलीत जीना)वापर मोठ्या प्रमाणात करावा, याकरता रेल्वे स्थानकांवर उद्घोषणा केल्या जातात. आज त्याचा सकारात्मक परिणाम सुद्धा दिसून येत आहे.
– ए.के. जैन, वरिष्ठ जसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

रेल्वे रूळ न ओलांडणे, महिला सुरक्षा इत्यादी विषयांवर पश्चिम रेल्वेने वेळोवेळी जनजागृती मोहीम राबवली आहे. तसेच सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांच्या माध्यमातूनही आमचे मोठ्या प्रमाणात जनप्रबोधन सुरु असते. यामध्ये स्वयंसेवी संघटनांचाही समावेश आहे. रेल्वेने सर्व रेल्वे स्थानकात रेल्वे पुलांची संख्या वाढवली आहे, तसेच सरकते जिनेही लावण्याचे काम सुरू आहे. प्रवाशांनी शॉर्टकटचा अवलंब न करता या पुलांचा वापर केला तर अपघात कमी होतील.
– गजानन महतपुरकर – वरिष्ठ जसंपर्कअधिकारी, पश्चिम रेल्वे

रेल्वे रूळ ओलांडू नये म्हणून आम्ही भरपूर प्रयत्न करत असतो. स्टेशनवर वारंवार घोषणा केली जाते की, रेल्वे रूळ ओलांडू नका. यासाठी वेगवेगळे उपक्रमसुद्धा राबवले जातात. पण अशा प्रकारांमध्ये घट होताना दिसत नाही. चालू वर्षात आतापर्यंत 334 प्रवाशांवर आम्ही कारवाई केली आहे.
– विनायक शिंदे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, दादर, पश्चिम रेल्वे

२०१७ साली रेल्वे क्रॉसिंगमुळे झालेले बळी

कुर्ला – १२४ ठार
ठाणे – १४२ ठार
कल्याण – १६० ठार


(सर्व छायाचित्र :प्रवीण काजोळकर,संदीप टक्के, संकेत शिंदे, )
(संकलन – प्रविण पुरो, अजेय कुमार जाधव, नितीन बिनेकर, धवल सोलंकी, कृष्णा सोनारवडेकर)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -