घरमुंबईउपायुक्त किरण आचरेकर आणि वसंत प्रभू सेवानिवृत्त

उपायुक्त किरण आचरेकर आणि वसंत प्रभू सेवानिवृत्त

Subscribe

मुंबई महापालिकेचे उपायुक्त किरण आचरेकर तसेच उपायुक्त वसंत प्रभू हे ३१ ऑक्टोबर रोजी सेवा निवृत्त झाले आहेत. मुंबई महापालिकेच्यावतीने या दोन्ही अधिकार्‍यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. मात्र, हे दोन्ही उपायुक्त सेवा निवृत्त झाल्यामुळे या रिक्त जागी सहायक आयुक्त देवेंद्र कुमार जैन आणि रमाकांत बिरादर यांची उपायुक्तपदी वर्णी लागली जाणार आहे.

आचरेकर आणि प्रभू यांना स्मृतिचिन्ह भेट

किरण आचरेकर हे मुंबई महापालिकेच्या परिमंडळ ३चे उपायुक्तपदी कार्यरत होते. त्यापूर्वी त्यांनी उपायुक्त म्हणून सामान्य प्रशासन विभागाचा समर्थपणे कारभार सांभाळत कर्मचार्‍यांच्या अनेक समस्या निकालात काढत त्यांना न्याय दिला होता. तर सहायक आयुक्त म्हणूनही त्यांनी विविध प्रभागांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती. तर उपायुक्त वसंत प्रभू यांची बेस्ट उपक्रमांतून महापालिकेत सहायक आयुक्तपदी निवड झाली होती. मात्र, मुंबईतील हैद्राबाद पॅटर्न योजना ही याच अधिकार्‍याने प्रथम मुंबईत राबवली होती. त्यानंतर मालमत्ता विभागाची जबाबदारी अत्यंत समर्थपणे पार पाडली होती. वॅकेंट लँड टेनन्सीचे पहिले धोरण प्रभू यांच्या कारकिर्दीत बनवण्यात आले. तर ई-निविदा आणि रस्ते विभागाच्या भ्रष्टाचाराची चौकशीही प्रभू यांच्यावर सोपवण्यात आली होती. ई-निविदांच्या भ्रष्टाचारात ६६ कंत्राटदारांना शिक्षा झाली होती. उपायुक्तपदी निवड झाल्यानंतरही त्यांनी बहुतांशी काळ मालमत्ता विभागातच घालवला होता. परंतु त्यानंतर ‘रेरा’मध्ये ते प्रतिनियुक्तीवर गेले होते. प्रतिनियुक्तीवर रेरामध्ये असतानाच ते महापालिका सेवेतून निवृत्त झाले. आचरेकर आणि प्रभू यांना आयुक्त तसेच अतिरिक्त आयुक्तांच्या हस्ते महापालिकेचे स्मृतिचिन्ह भेट देण्यात आली.

- Advertisement -

सहायक आयुक्त आणि उपायुक्तपदी वर्णी कुणाची?

किरण आचरेकर आणि वसंत प्रभू हे सेवानिवृत्त झाल्यामुळे सहायक आयुक्त पदावरील सर्वात वरिष्ठ असलेले एच/पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त देवेंद्र जैन आणि आर/मध्य विभागाचे सहायक आयुक्त रमाकांत बिरादर यांची उपायुक्तपदी वर्णी लागली जाण्याची शक्यता आहे. सेवाज्येष्ठतेनुसार जैन आणि बिरादर यांची नार्वे चर्चेत असून दोघांचीही उपायुक्तपदी नियुक्ती करण्याचा प्रस्ताव सामान्य प्रशासनाच्यावतीने तयार करण्यात येत आहे. याबाबत विधी आणि सभागृहाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर केले जाणार असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -