घरमुंबईफसवणुकीच्या गुन्ह्यात सायन रुग्णालयाच्या उपअधिष्ठातांना अटक

फसवणुकीच्या गुन्ह्यात सायन रुग्णालयाच्या उपअधिष्ठातांना अटक

Subscribe

मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयाचे उपअधिष्ठाता डॉ. राकेशकुमार वर्मा यांना फसवणुकीच्या गुन्ह्यात मंगळवारी रात्री सायन पोलिसांनी अटक केली. दरम्यान, त्यांचा रक्तदाब वाढल्यामुळे त्यांना सायन रुग्णालयातच उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती परिमंडळ-४ चे पोलीस उपायुक्त विजय पाटील यांनी दिली. पुण्यातील एका डॉक्टर तरुणीला पदव्युत्तर प्रवेश मिळवून देतो, असे सांगून पैसे घेतल्याचा आरोप डॉक्टर वर्मा यांच्यावर आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या सायन रुग्णालयाच्या वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर प्रवेश देण्याच्या नावाखाली रुग्णालयाचे उपअधिष्ठाता डॉक्टर राकेश कुमार वर्मा यांनी पुण्यातील महिला डॉ. अलिशा शेख यांच्या वडिलांकडून २१ लाख १० हजार रुपये बँक खात्यावर आणि इतर रोखीने असे एकूण ५० लाख रुपये घेतले होते. एवढी मोठी रक्कम घेऊनही प्रवेश मिळाला नसल्यामुळे डॉ.अलिशा शेख यांनी मंगळवारी सायन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून सायन पोलीस ठाण्यात डॉ.वर्मा यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

- Advertisement -

मंगळवारी रात्री सायन पोलिसांनी डॉ.वर्मा यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन फसवणुकीच्या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली. या दरम्यान अचानक डॉक्टर वर्मा यांची प्रकृती बिघडली आणि त्याचा रक्तदाब वाढल्यामुळे पोलिसांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल केले असल्याची माहिती परिमंडळ ४चे पोलीस उपायुक्त विजय पाटील यांनी ‘दै.आपलं महानगर’शी बोलताना दिली. डॉक्टर वर्मा यांनी प्रकारे अनेक वैद्यकीय प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली अनेक विद्यार्थ्यांची फसवणूक केली असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

डॉक्टर राकेश कुमार वर्मा यांच्याबाबत रुग्णालय प्रशासनाकडे अनेक तक्रारी आलेल्या असून त्यांची विभागीय चौकशी सुरू आहे. सध्या त्यांना निलंबित करण्यात आले असल्याची माहिती अधिष्ठाता डॉक्टर मोहन जोशी यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -