घरमुंबईकोरोनातुनी तेजाकडे ...!

कोरोनातुनी तेजाकडे …!

Subscribe

गेली दीड-पावणेदोन वर्षे कोरोनाच्या महामारीत आणि त्यामुळे उद्भवलेल्या टाळेबंदीत होरपळून निघाल्यानंतरची ही पहिलीच कोरोनोत्तर दिवाळी आहे. राज्य आणि केंद्र सरकारने कोरोना रुग्णांची घसरत जाणारी दैनंदिन रुग्ण संख्या लक्षात घेऊन टाळेबंदीचे निर्बंधही मोठ्या प्रमाणावर शिथिल करायला घेतले आहेत. मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी उपनगरीय लोकल सेवा हीदेखील आता दोन लसवंतांना प्रवासासाठी उपलब्ध झालेली आहे. दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने का होईना मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर येथील बाजारपेठा गर्दीने पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे भरू लागल्या आहेत. त्यामुळे एकंदरीतच मुंबईसह देशातील प्रमुख महानगरे आणि शहरांमधील माहोल हा पूर्णपणे दिवाळी फेस्टिवल मूडमध्ये परिवर्तित झाला आहे. वास्तविक याबाबत भारतीय नागरिकांचे कौतुक करायला हवे. कारण परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी भारतीय नागरिक शिस्त, संयम आणि वेळ मिळाली की उत्साह कायमस्वरूपी जोपासत असतात.

गेले दीड पावणे दोन वर्षे टाळेबंदीमुळे काही काळ वर्क फ्रॉम होम करतानादेखील या देशातील सर्वसामान्य मध्यमवर्गीय हे आहे त्या परिस्थितीत उत्साहाने जमेल त्या पद्धतीने काम करतच होते. तर देशातील निम्न मध्यम वर्गीय गोरगरीब जनता हातावर पोट असलेली जनता यांच्या हातचे काम जरी काही काळापुरते टाळेबंदीमुळे हिरावून घेतले गेले असले तरी कालांतराने ती कामेदेखील हळूहळू सुरू झाली. या तळागाळातील हातावर पोट असलेल्या मंडळींनादेखील थोड्याफार प्रमाणात का होईना, परंतु रोजगार उपलब्ध होऊ लागला. त्यामुळे या देशाची प्रमुख मदार ज्या मध्यमवर्गीय निम्न मध्यमवर्गीय आणि तळागाळातील श्रमिकांच्या श्रमावर आधारित आहे ते दोन्ही वर्ग टाळेबंदीमध्येदेखील कार्यरत होते. त्यामुळेच टाळेबंदीचे निर्बंध जेव्हा शिथिल होऊ लागले आणि दैनंदिन व्यवहार हे सर्वसामान्य जनतेसाठी खुले होऊ लागले तेव्हा याच श्रमिकांना त्यांच्या पूर्वीच्या श्रमामध्ये वाढ करून दिवाळीचा सण अधिक आनंदात साजरा करण्यासाठी अधिक काबाड कष्ट उपसायला सुरुवात आधीपासूनच केली होती.

- Advertisement -

त्यामुळेच आज जो काही उत्साह दीपोत्सवाच्या निमित्ताने महानगरांमधील बाजारपेठांमध्ये ओसंडून वाहत आहे त्याचे नेमके गमक हे मध्यमवर्गीयांनी आणि गोरगरिबांनी टाळेबंदीतही केलेल्या श्रमामध्ये दडलेले आहे. मध्यमवर्गीय लोक हे समाजाचा पाठकणा आहेत. समाजाचा सगळ्या प्रकारचा भार त्याच्या खांद्यावर असतो. कोरोनाच्या महामारीमुळे तो पिचून निघाला होता, पण जगाचा आजवरच इतिहास पाहिला की, असे दिसून येते की, जेव्हा जेव्हा या मध्यमवर्गावर मोठी संकटे आली तेव्हा काही जणांना त्या संघर्षात आपले जीव गमवावे लागले, पण जे मागे राहिले ते त्या संघर्षातून नव्या तेजाने झळाळून निघाले. तसेच कोरोनाने अनेकांच्या नोकर्‍या गेल्या, छोटे व्यवसाय बंद झाले, पण यामुळे खचून न जाता शक्य असलेल्या मार्गाने त्यांनी आपला लढा सुरू ठेवला. आपल्या मनातील आशेचे दिवे पेटते ठेवले. त्यामुळे ही दिवाळी यांना पाहता आली. गेल्या दिवाळीत कोरोना पुन्हा फिरला होता, त्यामुळे सगळ्यांच्या आशा आकांक्षांवर पाणी पडले होते. पण यावर्षी केंद्र आणि राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवली. त्यामुळे आता कोरोनाची लागण होणार्‍यांची संख्या घटत आहे.

दिवाळी असो, दसरा असो, चैत्र पाडवा असो, होळी असो, गणपती उत्सव असो, कोणताही उत्सव असला की त्याच्यामध्ये आनंदाचे क्षण भरण्याचे महत्त्वपूर्ण काम भारतामधील मध्यमवर्गीय, निम्न मध्यम वर्गीय आणि गोरगरीब जनताच मोठ्या उत्साहाने करत असते. सणांच्या निमित्ताने हीच कष्टकरी जनता दोन क्षण कुटुंबीयांसमवेत, मित्रमंडळी बरोबर आनंदात आणि निवांतपणे व्यक्त करता यावेत म्हणून बाजारपेठेत खरेदीसाठी तुफान गर्दी करते. बाजारपेठांमध्ये उसळलेली ही तुफान गर्दी तुडुंब गर्दीने ओसंडून वाहणारे मॉल्स असे चित्र पाहिले की उद्योजक आणि व्यापारी वर्ग याला अक्षरशः आनंदाचे उधाण येते. दिवाळी म्हटली ही कपडे खरेदी दिवाळी म्हटली की सोन्या-चांदीची खरेदी दिवाळी म्हटली की नवीन वाहन खरेदी आणि दिवाळी म्हटली की नवीन वास्तुचीदेखील खरेदी.

- Advertisement -

एकूणच दिवाळीचा सण हा खरेदीचा सण म्हणून प्रामुख्याने ओळखला जातो त्यामुळेच दिवाळीच्या सणांमध्ये सोने-चांदीचे व्यवहार असणारा सराफ बाजार किती उलाढाल करतो. नवीन गाड्यांची खरेदी विक्री किती होते किती नवीन घरांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात. यावर ऑटोमोबाईल इंडस्ट्री, रिअल इस्टेट, गोल्ड मार्केट आणि आता त्याही पेक्षा म्हणजे शेअर मार्केट याचे भवितव्य अवलंबून असते. त्यामुळेच दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने सोने चांदी खरेदी करून गाड्या खरेदी करून घर खरेदी करून अथवा नवीन इलेक्ट्रॉनिक साधने खरेदी करून मध्यम वर्गीय तसेच गोरगरीब जनता केंद्र आणि राज्य सरकारच्या तिजोरीत कर रुपाने भरणा करत असते. मात्र त्याचबरोबर व्यावसायिकांच्या आणि उद्योजकांच्या तिजोर्‍यादेखील भरत असते हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

एकीकडे दिवाळीचा असा उदंड ओसंडून वाहणारा उत्साह सर्वसामान्य जनतेमध्ये असताना दुसरीकडे राजकीय नेते मात्र उखाळ्या-पाखाळ्या काढून एकमेकांना मागे राजकीय फटाकेबाजी करण्यातच मशगुल आहेत. शाहरुख खान पुत्र आर्यन याच्या कथित पार्टीच्या महानाट्यानंतर आता महाराष्ट्राच्या राजकीय पडद्यावर नवाब मलिकविरुद्ध भाजप नेते असा नवीन आणि आक्रमक सामना रंगू लागला आहे. नवाब मलिक यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देता देता भाजप आणि त्यांच्याही नाकी नऊ येऊ लागल्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून राज्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना टार्गेट करण्याचे प्रयत्न पुन्हा सुरू झाले आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांनी सीबीआय, एनसीबी, एनआयए यांच्या माध्यमातून राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांवर कारवाया सुरू केल्या. आता राज्यातील नेतेदेखील भाजपा नेत्यांच्या कुलंगड्या बाहेर काढू लागले आहेत. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांचे महाआघाडीचे सरकार असल्यामुळे राज्यातील तपास यंत्रणा भाजप नेत्यांच्या मागे लावल्या जातात.

त्यामुळे एकूणच तपास यंत्रणा केंद्राच्या असोत की राज्य सरकारच्या असोत राजकीय नेत्यांनी त्यांचा वापर पूर्णपणे आता स्वतःचा राजकारणासाठी सुरू केला आहे. या दोन्हीही स्तरावरील तपास यंत्रणांच्या तपासाचे गांभीर्य पूर्णपणे नष्ट होत चालले आहे. त्यांची विश्वासार्हतादेखील आता रसातळाला जाऊ लागली आहे. हे निश्चितच केंद्र आणि राज्य सरकारसाठी भूषणावह नाही याची नोंद घेण्याची गरज आहे. त्याचबरोबर जनतादेखील आता राजकीय नेत्यांना गांभीर्याने घेत नाही तर ती विनोदी आणि करमणुकीचे दैनंदिन साधन म्हणून पाहू लागली आहे. त्यामुळेच किरीट सोमय्या असोत की नवाब मलिक किंवा अगदी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील आता दिवाळीनंतर फटाके फोडण्याची भाषा करू लागले आहेत. राजकीय नेत्यांनी आता दिवाळीत फटाके फोडावेत की, दिवाळीनंतर फटाके फोडावेत. सर्वसामान्य जनतेला आता राजकीय नेत्यांच्या फटक्यांची काहीही देणे घेणे उरले नाही. महाराष्ट्रातील जनता मात्र सध्या दिन दिन दिवाळीच्या अर्थातच गेल्या दीड-दोन वर्षानंतर आलेल्या दीपोत्सवाच्या आनंदाच्या उत्साहाच्या मूडमध्ये आहे. त्यामुळे त्या सर्वसामान्य जनतेला या तेजोमय दीपोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -