घरफिचर्समायमहानगर ब्लॉगशिवसेनेचं सीमोल्लंघन

शिवसेनेचं सीमोल्लंघन

Subscribe

कलाबेन मोहन डेलकर यांनी लोकसभा पोटनिवडणुकीत दादरा नगर हवेलीमधून दणदणीत विजय मिळवला. या विजयामुळे सेनेने स्थापनेनंतर पहिल्यांदा परराज्यात भगवा फडकवला आहे. या विजयामुळे सेनेने राष्ट्रीय पातळीवर चंचूप्रवेश केला आहे. आता त्याचा विस्तार होण्यासाठी आदित्य ठाकरेंना राष्ट्रीय पातळीवर गांभीर्याने वावरावे लागेल. ‘मातोश्री’चे ‘संजय’ असलेल्या राऊतांनी शरद पवार यांच्यानंतर सध्या काँग्रेस नेते राहुल आणि प्रियांका गांधी यांनाही मोहीत केलं आहे. त्याचा फायदा मोदी विरोधकांना किती आणि सेनेसह राऊतांना किती होतो हे अल्पावधीत कळेल. पण दादरा नगर हवेलीच्या विजयातून शिवसेनेने राष्ट्रीय पातळीवर सीमोल्लंघन केले आहे, हे वास्तव आहे.

देशभरात झालेल्या तीन लोकसभेच्या पोटनिवडणुकांमध्ये भाजप पराभूत झाला आहे. भाजपच्या शीर्ष नेतृत्वाला हा पराभव इतका जिव्हारी लागला नसेल तितका दादरा नगर हवेलीचा शिवसेनेचा विजय मोदी आणि शहा यांच्यासाठी वर्मी घाव घालणारा आहे. कारण शिवसेनेच्या स्थापनेपासून आजतागायत शिवसेनेला महाराष्ट्राच्या बाहेर लोकसभेच्या निवडणुकीत आपला उमेदवार विजयी करता आला नव्हता. ती किमया या विजयाने साधता आलेली आहे. याबद्दल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच कौतुक करायला हवं तशीच शाबासकी शिवसेनेचे दिल्लीतले नेते राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनाही द्यायला हवी. मोहन डेलकर यांनी मरीनलाईन्स जवळील एका हॉटेलमध्ये आत्महत्या करताना लिहून ठेवलेल्या पत्रानंतर खासदार संजय राऊत यांनी डेलकर कुटुंबीयांना घेऊन शिवसेनेसाठी जो मौका साधलेला आहे ते कौतुकास्पद आहे.

मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर त्यांचं कुटुंब शरद पवारांना भेटायला गेलं आणि भाजपच्या स्थानिक नेतृत्वाकडून कशा स्वरूपात डेलकर यांचा मानसिक छळ झाला आणि त्यामुळे त्यांना आत्महत्येसारखे टोकाचं पाऊल उचलायला लागलं त्याची कैफियत डेलकर यांच्या विधवा पत्नी कलाबेन यांनी आणि मुलांनी शरद पवारांकडे मांडली. त्याच वेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून पोटनिवडणूक लढविण्यासंदर्भात ही पवारांशी चर्चा केली. मात्र आपल्या पक्षाचा म्हणावा तसा जनाधार या मतदारसंघात नसल्याने पवारांनी या कुटुंबाला शिवसेनेचा पर्याय सुचवला. डेलकर कुटुंबीयांनी शिवसेनेतील वरिष्ठ नेतृत्वाकडे थेट संपर्क आणि संवाद नसल्याची गोष्ट शरद पवारांच्या कानी घातली. त्यानंतर शरद पवार यांनी हा सगळा विषय संजय राऊत यांच्याकडे सोपवून आपलं अंग काढून घेतलं. चाणाक्ष संजय राऊत यांनी राजकीय परिस्थिती त्या भागातील डेलकर कुटुंबियांचं काम, दरारा, सहानुभूती या सगळ्यांचा विचार करून या दुःखी कुटुंबियांना उद्धव ठाकरेंना भेटवलं.

- Advertisement -

शिवसेनेने यापूर्वी काही राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकांमध्ये स्वतःचं नशीब अजमावून पाहिलेलं होतं. त्यामध्ये उत्तर प्रदेश, गोवा, गुजरात यासारख्या राज्यांचा आहे समावेश होता. मात्र लोकसभेसाठी शिवसेनेने कधीही धाडस केलेलं नव्हतं. याचं कारण तितका तोलामोलाचा उमेदवार, जबाबदारी अंगावर घेणारा सेना नेता आणि अचूक मौका साधण्याची दुसर्‍या फळीतल्या नेत्यांची तयारी यामध्ये शिवसेना बॅकफूटवर होती. दादरा नगर हवेली या लोकसभा पोटनिवडणुकीने शिवसेनेसमोर एक संधी चालून आली होती. शिवसेनेने कलाबेन डेलकर यांना पक्षाचं सदस्यत्व देऊन झेंड्यासह एबी फॉर्मसहित पूर्ण सहकार्य केलं. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जाऊन जाहीर सभेला संबोधित केलं. स्वतः संजय राऊत हे निवडणुकीच्या आधी आठवडाभर इथल्या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्याकरता ठाण मांडून बसले होते.

सहाजिकच कलाबेन यांचा जोरदार विजय झाला आणि भाजपला पराभवाची चव चाखावी लागली. या विजयामुळे शिवसेनेनं महाराष्ट्राच्या बाहेर सीमोल्लंघन केलेलं आहे. 2019 च्या राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्याच्या संध्याकाळीच भाजपचा मुख्यमंत्री न बसवता वेगळे समीकरण मांडलं. याचे आडाखे संजय राऊत आणि शरद पवार यांनी बनवले होते. त्यावर अनेकांचा विश्वास नव्हता. अगदी स्वतः उद्धव ठाकरे यांचादेखील कदाचित त्यावर विश्वास बसला नव्हता. पण 28 नोव्हेंबर 2019 ला उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हापासून संजय राऊत यांचा अश्वमेध एकदम सुसाट सुटला आहे.

- Advertisement -

उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री म्हणून राज्याभिषेक होण्याआधी संपादक खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांमध्ये रोज सकाळ-दुपार-संध्याकाळ ‘बाईट’चा रतीब टाकला होता. त्यानंतर मिळालेल्या मुख्यमंत्रीपदामुळे राऊतांच्या मुलाखतीचा रतीब कारणीभूत ठरला असं समजणारा एक मोठा वर्ग राजकीय वर्तुळात आहे. तो पूर्णतः चुकीचा असला तरी संपूर्णपणे बरोबर नाही हे स्वतः राऊत हेही कबूल करतात. त्याच मुलाखतींच्या रतीबाची री राऊत आजही ओढत आहेत. सकाळी दैनिक सामनाच्या कार्यालयात एखाद्या घड्याळबाबांसारखं दहाच्या ठोक्याला भांडुपमधील बंगल्यामधून निघताना ते वाहिन्यांच्या प्रतिनिधींशी न चुकता बोलत असतात. त्यातल्या सगळ्याच गोष्टी ‘न्यूजमेकर’ नसतात, हे त्या प्रतिनिधींना ठाऊक आहे आणि राऊतांनाही ठाऊक आहे. मात्र शिवसेनेभोवती ‘मीडिया’ केंद्रित ठेवण्यासाठी राऊतांनी बजावलेली कामगिरी ही शिवसेनेतल्याच नव्हे तर महाविकास आघाडीचा कुठल्याच नेत्याला नाकारता येणार नाही. शिवसेनेच्या अनेक नेत्यांना माध्यमस्नेह आहे. पण या नेत्यांनी हा माध्यमस्नेह निव्वळ स्वतःच्या प्रतिमा संवर्धनासाठी वापरलेला आहे. सेनेतील अनेकजण पक्षाचा माध्यमसंपर्क आपल्यामुळेच असल्याची बतावणी पक्षप्रमुखांसमोर करत असतात. ती सगळी मंडळी किती फिजूल आहेत हे संजय राऊत यांनी गेल्या काही काळात आपल्या बोलंदाजीतून दाखवून दिलेलं आहे.

व्यक्तीगतरित्या मोदींशी ज्येष्ठतेचा स्नेह राखणार्‍या संजय राऊत यांनी आपल्या लेखणीतून आणि वाणीतून सतत मोदींवर आणि भाजपवर हल्ला केलेला आहे. गेल्या काही काळातला त्यांचा हल्ला हा मोदींपेक्षा भाजपवर प्रकर्षाने होताना जाणवत आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता नरेंद्र मोदी ते भारतीय राजकारणात वातावरणापलीकडचं नेतृत्व म्हणून आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे. त्यामुळे मोदींना विरोध करण्यापेक्षा भाजपवर हल्ला करणं हे राऊतांना श्रेयस्कर वाटत आहे. मात्र मोहन डेलकर यांच्या कुटुंबियांना मदत करताना राऊतांनी याच मोदी आणि शहा यांच्या भाजपला एका वेगळ्या स्वरूपाचं आव्हान दिलेलं आहे. त्यामुळे सेनेच्या अडचणी अधिक वाढू शकतील. गुजरातमध्ये राजकीय मुकाबला प्रामुख्याने रंगतो तो भाजप विरुद्ध काँग्रेस. यातील काँग्रेसची विचारधारा ही सर्वधर्मसमभावाची आणि विशेषत्वाने मुस्लिमांचे तुष्टीकरण करण्याची असते. तर भाजपचा हिंदुत्वावर असलेला भर पाहता त्या वोटबँकेला धक्का पोचवण्यासाठी तशा स्वरूपाचा एखादा गडी गुजरातच्या राजकीय रणधुमाळीत असण्याची गरज होती.

ती गरज भागवण्यासाठी शिवसेनेनं दादरा नगर हवेलीतून केलेला चंचुप्रवेश हा खूपच महत्त्वाचा ठरू शकणार आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मोदी आणि भाजप यांना खुलेपणानं दुखवायचं नाही. त्यामुळेच डेलकरांची बला संजय राऊत आणि पर्यायाने शिवसेनेच्या गळी उतरवून पवारांनी एका तीरातून दोन निशाणे साधले आहेत. मधल्या काळात शिवसेना आणि भाजप पुन्हा एकदा जवळ येतात की काय अशा स्वरूपाचं वातावरण तयार झालं होतं हे वातावरण पूर्णतः कलुषित करण्यासाठी पवारांनी कलाबेन डेलकरांची जबाबदारी संजय राऊतांकडे सोपवून शिवसेना ही पूर्णपणे भाजप हितविरोधी आहे हे मुद्रांकित करून टाकलेलं आहे. तर संजय राऊत हे शिवसेनेत राहून आपल्या निष्ठा आणि श्रद्धा या पवारांच्या प्रति व्यक्त करत असतात असा त्यांच्यावरचा सेनेतल्या नेत्यांसह अनेकांचा आक्षेप आहे. त्या संजय राऊतांना राष्ट्रीय पातळीवर स्थिरस्थावर करण्यात पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे.

शिवसेनेने आतापर्यंत अनेक निमंत्रितांना राज्यसभेवर संधी दिलेली आहे. मात्र लागोपाठ तीन वेळा राज्यसभेवर जाऊन सेनेतला विक्रम प्रस्थापित करणार्‍या संजय राऊत यांनी गेल्या अठरा वर्षांत दिल्ली दरबारातलं राजकारण हे स्वतःभोवती केंद्रित ठेवण्यामध्ये अत्यंत नेत्रदीपक यश मिळवलेला आहे. ‘बालासाहेब ठाकरे का आदमी’ ही दिल्लीतली संजय राऊत यांची ओळख त्यांनी स्वतः भोवती अशी काही फीट बसवून घेतलीय की त्यांच्या आधी गेलेल्या आणि त्यांच्या मागाहून गेलेल्या कुणालाही या ओळखीच्या साच्यात स्वतःला बसवता आलेलं नाही. पक्षनेतृत्वाकडेही ज्येष्ठ आनंदराव अडसूळ असू द्या, उध्दव यांचे खास अनिल देसाई किंवा दक्षिण मुंबईचा गड जिंकणारे अरविंद सावंत सगळ्यांनाच राऊतांनी वेसण घालण्यात यश मिळवलंय. यासाठी संजय राऊत किंवा त्यांच्या काही मोजक्या समर्थकांना त्यांची प्रसारमाध्यमांमधला ‘प्रेझेंस’ कारणीभूत वाटत असला तरी त्यापेक्षा कितीतरी अधिक त्यांचं योगदान आहे. मग ते त्यांच्या सामनाच्या कार्यकारी संपादक पदावरून मांडली जाणारी भूमिकेतील असेल किंवा प्रत्येक मोठ्या राजकीय घटनेमधील त्यांची भूमिका असेल. आपण पक्षाचं अधिकृत म्हणणं मांडतोय हे ठसवणं राऊतांना जितकं जमलं तितकं कुणालाच शक्य झालेलं नाही.

2022 मध्ये संजय राऊत यांच्या तिसर्‍या राज्यसभेच्या मुदतीची सांगता होणार आहे. त्या वेळेला त्यांना चौथ्यांदा राज्यसभेची उमेदवारी मिळणार की नवा शिलेदार तिथे जाणार याकडे काहींचं लक्ष आतापासूनच लागलेलं आहे. संजय राऊत यांचा 15 नोव्हेंबरला वाढदिवस आहे. दोन आठवड्यांनी ते आपल्या वयाची साठी पूर्ण करतील. तीन दशकं सामनाचे कार्यकारी संपादकपद आणि अठरा वर्षं राज्यसभा असा पल्लेदार प्रवास राऊत यांच्या वाट्याला आला असला, तरी तितक्याच मोठ्या प्रमाणात राऊतांनी शिवसेनेला आणि मातोश्रीला परतावा केलेला आहे.( नारायण राणेंसारखे नेते त्यांना पगारी नेते म्हणत असले तरी) सेनेतील अनेकांना असं वाटू शकेल की संजय राऊत यांना स्वतःला ‘इलेक्टोरल मेरिट’ नाही. हे कदाचित खरंही असेल, कारण आतापर्यंत त्यांनी एकही निवडणूक लढवलेली नाही. मात्र ज्यांना इलेक्टोरल मेरिट आहे अशा मंडळींनी पक्षाला योगदानाचा लेखाजोखाही मांडायला हवा. कितीजणं पक्षासाठी मतदारसंघाबाहेर जाऊन काम करतात हेही एकदा बघितलं की, दादरा नगर हवेलीत काय झालं त्याचं महत्त्व लक्षात येईल.

दादरा नगर हवेलीमध्ये मिळालेल्या विजयाचा जल्लोष साजरा करताना शिवसेनेला राष्ट्रीय पातळीवर वावरताना डेलकर यांच्या विजयाचा उपयोग नेमका कसा आणि किती करून घ्यायचा याचे आडाखे आताच बांधावे लागतील. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी घेतलेल्या एका सभेनंतर आणि त्यातून मिळालेल्या विजयामुळे आदित्य यांचाही आत्मविश्वास उंचावण्यासाठी फायदा होऊ शकतो. मात्र गुजरात नंतर आता शिवसेनेला राष्ट्रीय राजकारणात स्थिरावण्यासाठी हीच वेळ योग्य ठरू शकते. शेतकर्‍यांचे आंदोलन आणि इंधनाच्या दरवाढीचा उसळलेला आगडोंब या पार्श्वभूमीवर भाजपला बसलेला हा दणका शिवसेना राष्ट्रीय पातळीवर कशा स्वरूपात मांडू शकते यावर येणार्‍या काळातली बरीच समीकरणं अवलंबून आहेत. अर्थात, या समीकरणांची सूत्रं कौशल्यपूर्वक संजय राऊत यांनी हाती घेतलेली आहेत. सध्या संजय राऊत हे शरद पवारांनंतर राहुल गांधी आणि प्रियांका यांच्याही निकटवर्तीय वर्तुळामध्ये प्रवेश मिळवून बसलेले आहेत. स्वतः राहुल गांधी आणि प्रियांका सातत्यानं त्यांच्याशी राजकीय मुद्यांची देवाणघेवाण करत असतात. या सगळ्या गोष्टी पाहता आगामी काळात संजय राऊत भाजपला आणि मोदी-शहा जोडीला नेमका कसा उपद्रव देऊ शकतात, यावर शिवसेनेचे दिल्लीतले आणि विशेषत: राष्ट्रीय पातळीवरच यशापयश अवलंबून आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -