घरमुंबईरंगपंचमी साजरी करा... पण प्राण्यांवर रंगांची उधळण करू नका

रंगपंचमी साजरी करा… पण प्राण्यांवर रंगांची उधळण करू नका

Subscribe

रंगपंचमी सण साजरा करताना पाळीव प्राण्यांंची काळजी घ्या. पशु-पक्ष्यांवर रंग टाकू नका, कारण त्यांची त्वचा संवेदनशील असते. त्यामुळे रासायनिक रंगांमुळे त्यांना विविध आजार उद्ववतात.

मुंबईसह राज्यात मंगळवारी रंगपंचमी सण असल्यामुळे सर्वजण रंगांची उधळण करण्यासाठी सज्ज झाले आहे. पण रंगांची उधळण करतेवेळी पाळीव प्राण्यांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. काहीजण मौजमजेसाठी आणि काही वेळाच्या आनंदासाठी श्वान, मांजर तसेच इतर पशु-पक्ष्यांवर रंग टाकतात. परंतु या रंगांमुळे प्राण्यांना विविध विकार होतात. त्यामुळे रंगपंचमी साजरी करताना कोणत्याही प्राण्याला त्रास होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आवाहन प्राणीप्रेमी संस्था आणि संघटनांनी केलं आहे.

‘रॉ’ संस्थेचे संस्थापक पवन शर्मा यांनी सांगितले की, पाळीव प्राण्यांवर रंग टाकल्यामुळे त्यांना त्वचेचा संसर्ग होतो. रंगपंचमीमध्ये जे रासायनिक रंग वापरले जातात. ते मानवासाठीही घातक आहेत. रासायनिक रंग हा पाण्यामार्फत समुद्रामध्ये जाऊन मिसळतो. तेच पुन्हा पावसाच्या रूपाने जमिनीवर कोसळून ते पाणी मानव पितो. अशा प्रकारे याचा विपरित परिणाम हा मानवावरच होतो. रासायनिक रंगाचे पाणी प्राणी किंवा पक्ष्यांनी प्यायल्यावर त्यातील रासायनिक घटक पशु-पक्ष्यांच्या पोटात जातात. त्यात त्यांचा मृत्यूही होतो. प्राण्यांची त्वचा ही अतिसंवेदनशील असते. याशिवाय काही रासायनिक रंगांचा मानवालाही त्रास होतो. मानवाला कोणताही त्रास झाला तर तो सांगू शकतो. परंतु, पशु-पक्षी सांगू शकत नाहीत. सध्या बाजारात पर्यावरणपूरक रंग उपलब्ध आहेत. तर या रंगांचा जास्तीत जास्त वापर नागरिकांनी करून रंचपंचमी सण साजरा करायला हवा असं आवाहन प्राणीप्रेमी संस्थांकडून केलं जात आहे.

रंगपंचमीनंतर परिसर स्वच्छ ठेवा

सर्वात पहिले म्हणजे पाळीव प्राण्यांवर रंग टाकू नये. रासायनिक रंगांमुळे त्यांना संसर्ग होतो. तसेच रंग शरीरावर लागल्यावर ते चाटतात. त्यामुळे त्यांच्या पोटात रंग जाऊन विविध आजार त्यांना उद्भवतात. तसेच आजूबाजूच्या परिसरामध्ये रंग पडलेले दिसून येतात. ते देखील प्राण्यांकडून चाटले जातात. म्हणून रंगपंचमी सण साजरा झाल्यावर सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा.

सुनीष कुंजू, सचिव, पॉज (मुंबई)

पर्यावरणपूरक रंगांचा वापर करा

रासायनिक रंगांचा वापर न करता पर्यावरणपूरक रंगांचा जास्त वापर करा. रासायनिक रंगांमुळे श्वसनापासून ते त्वचेपर्यंतचे विकार होऊ शकतात. रासायनिक रंग पोटात गेल्यामुळे विषबाधाही होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे रंगपंचमी साजरी करताना आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.

डॉ. मनीष पिंगळे, पशुवैद्यक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -