घरमुंबईफटका गँग रेल्वे पोलिसांच्या जाळ्यात

फटका गँग रेल्वे पोलिसांच्या जाळ्यात

Subscribe

सात जणांचा अटक, दोन अल्पवयीन n 10 मोबाईल आणि मोटारसायकल जप्त

वसई आणि नालासोपारा रेल्वे स्टेशनदरम्यान इलेक्ट्रिक पोलवर चढून लोकलच्या दरवाजावर उभ्या असलेल्या प्रवाशांच्या हातावर काठीने फटका मारून मोबाईल, लॅपटॉप बॅग चोरणार्‍या पाच जणांच्या टोळीला वसई रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यासोबत चोरीचे मोबाईल विकत घेणार्‍या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. चोरट्यांमध्ये दोन अल्पवयीन मुले आहेत. मौजमजेसाठी ही टोळी रेल्वे प्रवाशांना लुटत असल्याचे तपासात उजेडात आले आहे.

वसई आणि नालासोपारा रेल्वे स्टेशन आणि वसई दिवा फलाट क्रमांक सातवर या टोळीने फटका मारून अनेक चोर्‍या केल्या आहेत. वसई ते नालासोपारा रेल्वे स्टेशन दरम्यान हे टोळके इलेक्ट्रीक पोलवर चढून लोकलच्या डब्यात दरवाजात उभ्या असलेल्या प्रवाशांच्या हातावर फटका मारीत असे. त्यानंतर प्रवाशांचे पडलेलेे मोबाईल, बॅग, लॅपटॉप घेऊन पसार होत असत. वसई ते नालासोपारा दरम्यान रेल्वे रुळालगत असलेल्या एका इमारतीमधील जागृत नागरिकाने हा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये काढून रेल्वे पोलिसांना दिला होता. त्यावरून पोलिसांनी या टोळीला अटक केली.

- Advertisement -

राजू विश्वकर्मा, राहुल रावत, आकाश बटावडे अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे असून त्यांच्यासोबत दोन अल्पवयीन चोरट्यांनाही अटक करण्यात आली आहे. टोळीने चोरलेले मोबाईल विकत घेणार्‍या महेंद्र रवी आणि इंद्रजित पासवान यांनाही अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चोरलेले 10 मोबाईल आणि एक मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

मौजमजा आणि मैत्रीणींसह फिरण्यासाठी या टोळीने चोरीचा मार्ग अवलंबल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे यातील एका अल्पवयीन चोरट्याने चोरीच्या पैशातून मोटारसायकल विकत घेतली आहे. याच मोटारसायकलवरून चोरटे चोरी करून पसार होत असत. त्याच्या घरच्यांनी ही मोटारसायकल त्याने कशी विकत घेतली याचीही चौकशी केली नव्हती, असे आश्चर्य सहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -