घरमुंबईफेरीवाल्यांमुळेच निर्माण होतो कचरा

फेरीवाल्यांमुळेच निर्माण होतो कचरा

Subscribe

कारवाई केल्यास कचर्‍याचे प्रमाण होईल कमी

मुंबईतील कचरा विल्हेवाटीसह स्वच्छतेसाठी विविध योजना आखल्या जात असल्या तरी हा कचरा फेरीवाल्यांमुळेच वाढत असल्याचा सूर नगरसेवकांनी आळवला आहे. फेरीवाल्यांमुळे रस्त्यांवर जास्तीत जास्त कचरा निर्माण होत असून फेरीवाल्यांवर कारवाई केल्यास मुंबईतील कचर्‍याचे प्रमाण कमी होवून स्वच्छताही राखली जाईल,असे नगरसेवकांनी स्पष्ट केले.

इदौर शहराप्रमाणे मुंबईतही कचर्‍याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावून कचर्‍याचे प्रमाण कमी करत स्वच्छता राखण्यासंदर्भात महापालिका सभागृहनेत्या विशाखा राउुत यांनी सभागृहात विशेष सभेदृारे चर्चा घडवून आली. सोमवारी या विशेष सभेमध्ये १७ सदस्यांनी भाग घेतल्यानंतर, ही सभा तहकूब केली. त्यानंतर पुढील चर्चेला मंगळवारी सभागृहात सुरुवात झाली. सोमवारी भाजपच्या नगरसेवकांना चर्चा करू न दिल्यामुळे आक्रमक झालेल्या भाजपामुळे शिवसेनेने ही सभा तहकूब केली होती.त्यामुळे मंगळवारी ही सभा सुरु होताच महापौरांच्या अनुपस्थितीमध्ये पिठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार्‍या उपमहापौर अ‍ॅड.सुहास वाडकर यांनी प्रारंभीच भाजपच्या नगरसेवकांना प्रथम बोलण्याची संधी दिली.

- Advertisement -

यावेळी बोलतांना भाजपच्या नेहल शाह यांनी, हा कचरा फेरीवाल्यांमुळेच होत असल्याचे सांगत, जर फेरीवाल्यांवर कारवाई झाली तरी आपोआपच कचर्‍याचे प्रमाण कमी होईल,असे सांगितले. फेरीवाले व्यवसाय करत असलेल्या ठिकाणी रात्रीच्या ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांसह खाद्यपदार्थांच्या वस्तू तसेच चहाचे कप पडले असतात. तर भाजपच्या हेतल गाला यांनी, वांद्रे पश्चिम परिसरात स्थानिक आमदार आशिष शेलार यांच्या प्रयत्नातून सीएसआर निधीतून कचर्‍यापासून सोलर एनर्जी प्रकल्प राबवण्यात आला आहे. तसे प्रकल्प आपण इतरही विभागात रावबल्यास कचर्‍याची विल्हेवाट लावली जावू शकते. तसेच यांत्रिक झाडूने साफसफाईवर केला जाणारा खर्च अनाठायी असल्याने ती बंद करावी,अशी मागणी त्यांनी केली.

सुका कचर्‍याच्या विल्हेवाटीसाठी नागरिकांवर जबाबदारी टाकताना, तो कचर्‍याची विल्हेवाट महापालिकेने लावल्यास त्यापासून महसूलही वाढेल,अशी सूचना भाजपच्या रजनी केणी यांनी केली. तर भाजपच्या स्वप्ना म्हात्रे यांनी, ज्या इंदौरचे कोडकौतूक महापालिका करत आहे, त्या इंदौरमध्ये काम करणारे कंत्राटदारच मुंबई महापालिकेतील घनकचरा व्यवस्थापन विभागात काम करत आहेत. तर मग असे काय आहे की हे कंत्राटदार इंदौरला चांगले काम करत आहेत आणि आपल्याकडे दुर्लक्ष करत आहेत. तसेच एच/पश्चिम विभागाच्या कचरा पेट्या चक्क पळवून विकल्या जात आहेत. एच/पश्चिममधील कचरा पेट्या जी/उत्तर विभागांमध्ये विकल्या जात असल्याचा आरोप स्वप्ना म्हात्रे यांनी केला.

- Advertisement -

तसेच स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सफाई कामगारांसाठी असलेल्या आश्रय योजना का रखडली आहे,असा सवाल करत सफाई कामगारांना मालकी तत्वावर नको, किमान भाडे आकारुन घर दिले जावे अशी सूचना केली. तसेच सुक्या कचर्‍यावर प्रक्रीया करण्यासाठी इंदौर पॅटर्नचा वापर मुंबईत केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याबरोबरच सफाई कामगारांची होणारी पिळवणुकीकडे लक्ष वेधतच आयुक्त आणि अतिरिक्त जर सत्ताधार्‍यांना गृहीत धरत असतील तर त्यांच्या दालनात घुसून जाब विचारल्याशिवाय राहणार नाही,असाही इशारा त्यांनी दिला

यावेळी झालेल्या चर्चेमध्ये श्रध्दा जाधव, रेणू हंसराज, समिक्षा सक्रे , आदी १७ नगरसेवकांनी भाग घेतला होता. त्यामुळे सोमवारी आणि मंगळवारी तब्बल ३५ सदस्यांनी चर्चेत भाग घेतला आहे. तर अजुनही अनेक सदस्यांनी चर्चेत भाग घेण्यासाठी नावे दिलेली असतानाच, सभागृहातील सदस्य संख्या कमी झाल्यामुळे अखेर ही चर्चा तहकूब करत सभागृहाचेही कामकाजही उपमहापौर सुहास वाडकर यांनी तहकूब केले.

कचर्‍याच्या विषयावरील चर्चा सुरुच..
माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी केलेल्या गुणगौरव सभेचे काम तब्बल दोन दिवस चालवल्यानंतर आता कचर्‍याच्या मुद्दयावरही तब्बल दोन दिवस सलग चर्चा सुरु आहे. त्यामुळे ही चर्चा पुढेही चालू ठेवण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेच्या इतिहासात अर्थसंकल्पाशिवाय अशाप्रकारच्या विषयांवरील चर्चा दोन दिवसांपेक्षा अधिक लांबणीवर सुरु ठेवण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात आहे.

सभागृहातही उंदिर
महापालिका सभागृहात कचर्‍याच्या मुद्यावर चर्चा सुरु असतानाच, एका नगरसेविकेच्या पायावरुन चक्क उंदिर गेल्यामुळे काही क्षण गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे महापालिकेच्या इतर कार्यालयांमध्ये तसेच महापौरांच्या दालनात असलेला हा उंदिर चक्क सभागृहात पोहोचल्याने नगरसेविकांमध्ये भीती पसरलेली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -