घरमुंबईआग विझवण्यासाठी ९२ लाखांचा रोबोट

आग विझवण्यासाठी ९२ लाखांचा रोबोट

Subscribe

मुंबई : मुंबईत उंच उभ्या राहिलेल्या इमारती, मॉल आदी ठिकाणी आगी लागतात. अशा आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला जोखीम उचलावी लागते. यामुळे अशा भीषण आगीच्या प्रसंगी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा विचार अग्निशमन दलाने केला आहे. त्यासाठी ९२ लाख रुपये खर्च करून फायर रोबोट घेतला जाणार आहे.

मुंबईत गेल्या काही वर्षात टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. ठिकठिकाणी मॉल आणि मल्टिप्लेक्स उभी राहिली आहेत. गेल्या काही कालावधीत अशा इमारतींना आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत. त्या आगी विझवताना अग्निशमन दलाचे अधिकारी कर्मचारी जखमी झाले आहेत. अंधेरी येथील लोटस पार्क आगीमध्ये एका अग्निशमन जवानाचा तर काळबादेवी येथील आगीमध्ये अग्निशमन दलातील चार वरिष्ठ अधिकार्‍यांचा मृत्यू झाला होता. मुंबईत २६ नोव्हेंबरला झालेल्या अतिरेकी हल्ल्याप्रसंगी ताजमहल हॉटेलमध्ये भीषण आग लागली होती. त्यावेळी अत्यंत कठीण परिस्थितीत अग्निशमन दलाच्या जवानांना काम करावे लागले होते. तसेच मुंबईत पेट्रोकेमिकल कारखाने किंवा अणुऊर्जा संशोधन केंद्र या ठिकाणी आगीच्या दुर्घटना घडल्यास अग्निशमनाचे कार्य करणे फारच धोकादायक असते.

- Advertisement -

म्हणून या आगीला सामोरे जाताना अग्निशमन दलातील अधिकारी आणि कर्मचारी यांचा जीव जाऊ नये याकरता आग विझवणारा रोबोट अग्निशमन दलात आणला जाणार आहे. मे. श्री ललिता या कंत्राटदाराकडून ९१ लाख ७२ हजार ८०० रुपयांत रोबोटची खरेदी केली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर पुढील सहा महिन्यात हा रोबोट अग्निशमन दलात सामील होणार आहे.

असा असेल रोबोट

हा फायर रोबोट सीआयटीआयसी, आरएक्सआर – एम ८० जेडी नमुन्याचा असणार आहे. या रोबोटची ने – आण करण्यासाठी टाटा एस सुपरमिंट बनावटीचे १ टन वजन उचलण्याची क्षमता असलेले सुसज्ज वाहन खरेदी करण्यात येणार आहे. या वाहनात दोन व्यक्ती बसू शकतील. या रोबोटला वाहनावर चढवणे व उतरवणे यासाठी एक हैड्रोलीक लिफ्ट असणार आहे. कंत्राटदाराकडून पुढील १० वर्षे रोबोटचे सुटे भाग पुरविले जाणार असून, ५ वर्षे देखभाल केली जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -