घरमुंबईशाळाशाळांमध्ये शिकवली गांधी तत्त्वे

शाळाशाळांमध्ये शिकवली गांधी तत्त्वे

Subscribe

गांधी जयंतीनिमित्ताने प्रभात फेरी, स्वच्छता मोहिमेद्वारे जनजागृती

मुंबई:महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शहरातील विविध शाळांमध्ये महात्मा गांधी यांच्या विचारधारेवर, तत्वांवर आधारित व्याखाने आयोजित करण्यात आली होती. तसेच काही शाळांनी सकाळी प्रभात फेरीचे आयोजन केले होते, तर काही शाळांनी स्वच्छता मोहीम राबवली.

गांधी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम राबवण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले होते. हे कार्यक्रम राबवण्यासाठी सरकारकडून पुरेसे अनुदान मिळत नसल्याने शाळांकडून हे कार्यक्रम राबवण्यास नापसंती दर्शवण्यात येत होती. परंतु गांधीजींची तत्त्वे, मूल्ये यांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी शाळांनी मंगळवारी विविध कार्यक्रम राबवले. अनेक शाळांनी प्रभात फेरी काढली, तर काही शाळांनी स्वच्छता मोहीम राबवत परिसरातील रस्ते, गल्ल्यांची सफाई करत विद्यार्थ्यांना सफाईचे महत्त्व पटवून दिले. प्रभात फेरी व स्वच्छता मोहिमेनंतर शाळांमध्ये गांधीजींच्या कार्याबाबत निबंध व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले.

- Advertisement -

चेंबूरमधील स्वामी मुक्तानंद हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी घोषणा देत नागरिकांना स्वच्छतेची मोहीम पटवून दिली. तसेच वर्षभर परिसरात सफाईचे काम करणार्‍या कर्मचार्‍यांचाही पुस्तके देऊन सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे स्वच्छता मोहिमेवरील लघूपट विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला. मालाडमधील फातिमा देवी इंग्लिश शाळेतही गांधी जयंतीनिमित्त प्रभात फेरी काढण्यात आली. राजा शिवाजी शाळेतही गांधी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. शाळांमध्ये प्रभात फेरी व स्वच्छता मोहीम राबवण्यात आली असली तरी शिक्षण विभागातर्फे काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार वर्षभर विविध कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. यामध्ये वनस्पती, फळझाडे शाळा परिसरात लावणे, त्यांच्या वाढीसाठी संवर्धन करणे, सायकल, कुकर, मिक्सर यांची देखभाल कशी करणे, स्वयंपाक घरातील कामे, प्रथमोपचार पेटी वापरण्याबाबत प्रात्याक्षिके आदी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.

महाविद्यालयांमध्येही विविध उपक्रम राबवले

मुंबईतील शाळांप्रमाणे महाविद्यालयांमध्ये गांधी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. महाविद्यालयांमध्ये गांधींच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. तसेच महाविद्यालयातील एनएसएसच्या विद्यार्थ्यांकडून परिसरात रॅली काढण्यात आली. या वेळी विद्यार्थ्यांनी परिसराची स्वच्छता करत नागरिकांना स्वच्छतेचा संदेश दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -