घरमुंबईपेव्हर ब्लॉक, केबल्सच्या भाराने घाटकोपर पुलाला तडे

पेव्हर ब्लॉक, केबल्सच्या भाराने घाटकोपर पुलाला तडे

Subscribe

घाटकोपर येथील पुलाला तडे गेल्याने पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. रेल्वे आणि पालिका अधिकार्‍यांच्या संयुक्त पाहणीत पुलावर पेव्हर ब्लॉक आणि केबल्सचा जास्त भार झाल्याने पुलाला तडे गेल्याचे उघड झाले.

अंधेरी येथील पूल पडल्याची दुर्घटना, ग्रँटरोड येथील पूलाला तडे गेल्याची घटना ताजी असताना शनिवारी रात्री घाटकोपर येथील पुलाला तडे गेल्याचे निदर्शनास आले आहे. घाटकोपर येथील पुलाला तडे गेल्याने पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. रेल्वे आणि पालिका अधिकार्‍यांच्या संयुक्त पाहणीत पुलावर पेव्हर ब्लॉक आणि केबल्सचा जास्त भार झाल्याने पुलाला तडे गेल्याचे उघड झाले. दरम्यान, रेल्वेने पुलावरील फुटपाथ बंद करण्यास सांगितले होते. असे असताना पालिकेने वाहतूक पोलिसांना सांगून पुलावरील वाहतूक बंद केली. त्यामुळे पालिकेवर टीका होत आहे.
पश्चिम रेल्वेवरील अंधेरी स्थानकाजवळील गोखले पूलाचा काही भाग मागील आठवड्यात कोसळला. या दुर्घटनेत पाच जण जखमी झाले. त्यापैकी अस्मिता काटकर या महिलेचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर पालिकेने आणि रेल्वेने आपली जबाबदारी एकमेकांवर ढकलली. याची दखल घेत उच्च न्यायालयाने पालिका आणि रेल्वे प्रशासनाला झापले. त्यानंतर पालिका आयुक्तांनी दोन्ही यंत्रणांची बैठक घेऊन संयुक्त स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास सांगितले. यानुसार ६ जुलैपासून मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे हद्दीतील आरओबी, एफओबी, स्काय-वॉक आदी ४४५ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास सुरुवात केली. हे ऑडिट सुरु असताना ७ जुलैला घाटकोपर येथील एलबीएस रोड व पूर्व द्रुतगती मार्गाला जोडणार्‍या पुलाला तडे गेल्याचे निदर्शनास आले.

पुलाच्या एका पिलरला गेला तडा 

पुलाला तडे गेल्याचे निदर्शनास आल्यावर मध्ये रेल्वेच्या अभियंत्यांनी पालिकेच्या एन विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात घाटकोपर – अंधेरी लिंक रोडवर असलेल्या पुलावर विक्रोळी बाजूचा फुटपाथ धोकादायक असल्याचे म्हटले आहे. फुटपाथवरील ४०० मिलीमीटर पैकी ३०० मिलीमीटरचा भार कमी करण्यास सांगण्यात आले आहे. फुटपाथवर असलेले पेव्हरब्लॉक, पॉवर, टेलिफोन, ओएफसी केबल्स, पाण्याची पाईप लाईन काढण्यास सांगितले आहे. पुलावरील फुटपाथवर याचा भार आल्याने पुलाच्या एका पिलरला तडा गेला आहे. पिलरला तडा गेल्याने पालिकेच्या सूचनेनुसार शनिवारी रात्री २ वाजून २० मिनिटांनी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती.

- Advertisement -

सुरक्षेच्या कारणास्तव फुटपाथ पादचार्‍यांसाठी बंद 

हा पूल बंद ठेवल्यास पूर्व पश्चिम, शाळा, कॉलेज, ऑफिस तसेच रेल्वे स्थानकाकडे ये जा करणार्‍या नागरिकांना मोठा वळसा मारून जावे लागले असते. आज रविवार असल्याने काही वाटले नाही. सोमवार ते शनिवार यामुळे रहिवाशांना त्रास झाला असता. नागरिकांना त्रास होणार नाही याची दखल घेऊन पुलाची दुरुस्ती करायला हवी असे स्थानिक रहिवासी असलेल्या मनीषा साळुंखे व श्रीकृष्ण पालव यांनी सांगितले. दरम्यान, रविवारी सकाळी स्थानिक खासदार किरीट सोमय्या, नगरसेविका राखी जाधव, पालिकेचे पूल विभागाचे मुख्य अभियंता शितलाप्रसाद कोरी, वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक वत्स, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुंडलिक कैगुडे व रेल्वेच्या अभियंत्यांनी पुलाची पाहणी केली. या पाहणी दरम्यान येथील नागरिकांना पूर्व पश्चिमेला जाण्यास जवळपास इतर पर्यायी रस्ता नसल्याने फुटपाथवरील पेव्हरब्लॉक काढून १२ तासांनी पुलावरील वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव फुटपाथ पादचार्‍यांसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

रेल्वेने फुटपाथ बंद करण्यास सांगितला आहे. पुलाच्या एका पिलरला तडे गेले असले तरी तो पिलर दुरुस्त होऊ शकतो. पुलाला धोका नाही.
– शितलाप्रसाद कोरी, प्रमुख अभियंता, पूल विभाग

- Advertisement -

उशिरा का होईना पण रेल्वे आणि पालिका दोन्ही प्रशासनांना जाग आली. त्वरित कार्यवाही केली जात आहे. साधी दुरुस्ती की मोठ्या दुरुस्तीची गरज आहे याची पाहणी करावी. वाहतूक वळवावी लागल्यास वळवावी. लोकांचा जीव जाऊ नये. जो काही निर्णय घ्यायचा तो त्वरित घ्यावा.
– किरीट सोमय्या, भाजप खासदार.

स्थायी समितीत घाटकोपर पुलाचा प्रश्न उपस्थित केल्यावर प्रशासनाला जाग आली. पालिका आणि रेल्वे दोन्ही यंत्रणांमध्ये संवाद नाही. रेल्वे पालिकेला फुटपाथ बंद करायला सांगते. पालिका पुलावरील वाहतूक बंद करते. वाहतूक सुरु न केल्यास नागरिकांना त्रास होईल.
– राखी जाधव, नगरसेविका व गटनेत्या, राष्ट्र्रवादी काँग्रेस.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -