घरमुंबई46 लाख रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल

46 लाख रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल

Subscribe

मुंबईतील गुन्हेविषयक थोडक्यात बातम्या...

सुमारे 46 लाख रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी दोन भामट्यांविरुद्ध पंतनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. या दोघांवर एका वयोवृद्धाकडे फ्लॅटसाठी घेतलेल्या पैशांचा परस्पर अपहार करुन फसवणुक केल्याचा आरोप आहे. याच गुन्ह्यांत दोन्ही आरोपींची लवकरच पोलिसांकडून जबानी नोंदविण्यात येणार असून नंतरच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

तक्रारदार प्रकाश टेलराम कुंडलिया (61) हे घाटकोपर येथील हिंगवाला लेन, शालीभद्रा सहकारी सोसायटीमध्ये राहतात. आठ वर्षांपूर्वी त्यांनी घाटकोपर येथील पंतनगर, इंद्रायणी या निर्माणधीन इमारतीमध्ये एक फ्लॅट बुक केला होता. फ्लॅटसाठी त्यांनी 46 लाख रुपये भरले होते, त्यानंतर त्यांच्यात करार होऊन त्यांना या इमारतीमध्ये फ्लॅट क्रमांक 401 हा अलॉट झाला होता. मात्र रुमचा ताबा घेताना त्यांना दोन्ही आरोपींनी 401 फ्लॅटऐवजी 901 हा फ्लॅट अलोट झाल्याचे सांगून त्यांना व्याज आणि पार्किंग चार्जसह 85 लाख रुपये भरण्यास सांगितले.

- Advertisement -

ही रक्कम भरली नाहीतर त्यांनी 401 फ्लॅटचे बुकींग करताना भरलेली रक्कम जप्त केली जाईल. तसेच त्यांना इमारतीमध्ये कुठलाही फ्लॅट दिला नाही, असे सांगण्यात आले. हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे लक्षात येताच त्यांनी दोन्ही आरोपींविरुद्ध पंतनगर पोलिसांत तक्रार केली होती. फ्लॅटचे संबंधित कागदपत्रे पाहिल्यानंतर या दोघांनी प्रकाश कुंडलिया यांच्याकडून फ्लॅटसाठी घेतलेल्या रक्कमेचा परस्पर अपहार करुन फसवणुक केल्याचे उघडकीस आले. त्यामुळे या दोघांविरुद्ध बुधवारी पंतनगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे.

लक्ष विचलित करुन दोन वयोवृद्ध व्यापार्‍यांची फसवणुक

मुंबई ।दोन दिवसांपूर्वी राजस्थानातील दोन व्यापार्‍याकडील आठ लाख रुपयांची चोरीची घटना ताजी असतानाच दोन वयोवृद्ध व्यापार्‍यांचे लक्ष विचलित करुन सुमारे साडेसतरा लाख रुपयांची कॅश दोघांनी पळविल्याची घटना गोवंडीतील देवनार पशुवधगृहात घडली. सलग दोन दिवसांत चार व्यापार्‍याकडील सुमारे 27 लाख रुपयांची कॅश पळविण्यात आल्याचे तेथील व्यापार्‍यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी देवनार पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद करुन पळून गेलेल्या दोन्ही आरोपींचा शोध सुरु केला आहे. दोन दिवसांपूर्वीच राजस्थानमधील दोन व्यापारी देवनार पशुवधगृहात बकरी ईदनिमित्त बकरे विकण्यासाठी आले होते. बकर्‍यांची विक्रीतून आलेली आठ लाख रुपये घेऊन जाताना त्यांच्या खिशातून ही रक्कम चोरट्यांनी पळवून नेली होती. ही घटना ताजी असताना रामदत्त पाथीदाम खाटीक या वयोवृद्धाकडील सुमारे 9 लाख रुपयांची कॅश चोरट्यांनी पळविली. रामदत्त खाटीक हे उत्तर प्रदेशच्या सुल्तानपूरचे रहिवाशी आहे. मंगळवारी ते बकरे विकण्यासाठी देवनार पशुवधगृहात आले होते. यावेळी तीन भामट्यांनी त्यांचे लक्ष विचलित करुन नऊ लाख रुपयांची कॅश पळवून नेली.

- Advertisement -

त्यापूर्वी सोमवारी अशीच एक घटना घटना घडली. लड्डू बडगुजर खाटीक नावाचे वयोवृद्ध व्यवसायाने व्यापारी आहेत. त्यांचा गोवंडीतील देवनार नशुवधगृहात बकरे विकण्याचा व्यवसाय आहे. सोमवारी रात्री सव्वानऊ वाजता ते बकरी ईदनिमित्त ग्राहकांना बकरे दाखवित होते. यावेळी दोन तरुण तिथे आले. या दोघांनी त्यांच्या अंगावर खाज येणारी पावडर टाकली होती. त्यानंतर त्यांच्या शर्टावर किडा असल्याचे सांगून त्यांचे लक्ष विचलित केले. लड्डू खाटीक हे अंगावरील शर्ट काढत असताना या दोघांनी त्यांच्याकडील आठ लाख साठ हजार रुपयांची कॅश पळवून नेली. काही वेळानंतर त्यांच्या लक्षात हा प्रकार आला होता. त्यानंतर त्यांनी देवनार पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पेालिसांना ही माहिती दिली. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. दोन्ही आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली आहे.

सुट्टे पैसे देण्याचा बहाणा करुन सात लाखांची फसवणुक

मुंबई । जास्त कमिशनचे आमिष दाखवून सुट्टे देण्याचा बहाणा करुन एका तरुणाला सुमारे सात लाख रुपयांना तिघांनी गंडा घातल्याची घटना दहिसर परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पळून गेलेल्या तिघांविरुद्ध दहिसर पोलिसांनी अपहार आणि फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. बबलू मंगलदेव शर्मा या तरुणाची जून महिन्यांत तिन्ही आरोपींशी ओळख झाली होती. या तिघांनी त्याला सात लाख रुपयांच्या पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या मोबदल्यात त्याला सुट्टे पैसे देण्याचे आमिष दाखविले होते. जास्त सुट्टे पैसे घेतल्यास त्याला जास्त कमिशन मिळेल असे आमिष दाखविण्यात आले होते. या आमिषाला बळी पडून त्याने 19 जून ते 11 जुलै या कालावधीत तिन्ही आरोपींना सात लाख रुपये कॅश दिले होते. मात्र या तिघांनी त्याला कमिशनसह सात लाख रुपयांची सुट्टे कॅश दिली नाही. तसेच सात लाख रुपयांचा अपहार करुन त्याची फसवणुक केली होती. हा प्रकार नंतर लक्षात येताच त्याने दहिसर पोलिसांत तिन्ही आरोपींविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर दोन दिवसांपूर्वी पळून गेलेल्या तिघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. या तिघांचा सध्या पोलीस शोध घेत आहेत.

दोन भावांवर हल्ला करणार्‍या वॉण्टेड आरोपीस अटक

मुंबई । रमजान ईदच्या दिवशीच दोन भावांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात वॉण्टेड असलेल्या कन्नम सेल्वम ऊर्फ सेल्वम स्वामी या आरोपीस सहार पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला येथील स्थानिक न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.  जर्रार इसरार खान हा अंधेरीतील मरोळनाका, चिमटपाडा परिसरात राहतो. काही दिवसांपूर्वी याच परिसरात दोन गटात वाद झाला होता. यावेळी भांडणात जर्रार खान याने मध्यस्थी करुन दोन्ही गटातील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर पंधरा ते वीसजणांच्या एका टोळीने 16 जूनला जर्रार खान व त्याचा भाऊ नसीम खान यांच्यावर चॉपरने प्राणघातक हल्ला केला होता.

या हल्ल्यात ते दोघेही गंभीररीत्या जखमी झाले होते. याप्रकरणी सहार पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह अन्य भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच याच गुन्ह्यांत विशाल अरविंद सिंग, मुझफ्फर मुझाहिद मलिक, अर्शद मिस्अल्म खान आणि परवेझ दरवेश खान या चौघांना पोलिसांनी अटक केली होती. सध्या ते सर्वजण न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्या चौकशीत कन्नन सेल्वम याचे नाव समोर आले होते. मात्र तो पळून गेल्याने त्याचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच त्याला मंगळवारी अंधेरी परिसरातून अटक केली. याच गुन्ह्यांत अरबाज, शोएब खान, अल्ताब, शेहबाज आणि इतर आठ ते दहाजण वॉण्टेड आहेत. त्यांचा आता पोलीस शोध घेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -