घरमुंबईपाणीकपातीच्या संक्रांतीतून यंदा मुंबईकरांची सुटका

पाणीकपातीच्या संक्रांतीतून यंदा मुंबईकरांची सुटका

Subscribe

सर्व तलावांमध्ये सुमारे ९९ टक्के पाणीसाठा

मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या तलावांमध्ये यंदा समाधानकारक पाणी साठा जमा झाला आहे. गुरुवारी रात्रीपर्यंत सर्व तलावांमध्ये वार्षिक साठ्याच्या तुलनेत सुमारे ९९ टक्के एवढा पाणीसाठा आहे. मुंबईकरांसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. मुंबईकरांवरील पाणीकपातीची संक्रात यावर्षी तरी टळली आहे.

मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या तलावांमधून दरदिवशी ३८०० दशलक्ष अर्थात ३८० कोटी लिटर एवढा पाणी पुरवठा केला जातो.२६ सप्टेंबर रोजी पहाटे सहावाजेपर्यंत यासर्व तलावांमध्ये १४ लाख ३० हजार २२४ दशलक्ष लिटर्स एवढा पाणी साठा जमा झाला आहे. मुंबईकरांची वार्षिक तहान भागवण्यासाठी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर्स पाण्याची गरज असते. त्या तुलनेत यासर्व तलावांमध्ये ९८.८२ टक्के एवढा साठा जमा झाला आहे.

- Advertisement -

मुंबई महापालिकेच्या नोंदीनुसार ३० सप्टेंबर रोजी असलेल्या उपलब्ध साठ्यानुसार पुढील पाण्याचे नियोजन केले जाते. त्यानुसार आता केवळ चार दिवस शिल्लक राहिलेले असून आतापर्यंत सुमारे ९९ टक्के पाणी साठा आहे. त्यातच नाशिक, ठाणे, शहापूर, पालघर परिसरात पाऊस कायम असल्यामुळे या पाणी साठ्यात अजून वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मागील वर्षी या सर्व तलावांमध्ये ९१ टक्के एवढा पाणी साठा जमा झाला होता. त्यामुळे वर्षभराचे पाण्याचे नियोजन करण्यासाठी मागील दिवाळीनंतर १० टक्के एवढी पाणीकपात जाहीर करण्यात आली होती. ही कपात मागील जुलै महिन्यात मागे घेण्यात आली. त्यामुळे मुंबईकरांना सध्या कपातीच्या काळात ३५०० दशलक्ष लिटर्स पाणी पुरवठ्याच्या तुलनेत सध्या ३८०० दशलक्ष लिटर्स एवढ्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.

- Advertisement -

सध्या तलावांमधील पाणी साठा समाधानकारक असून चार दिवसांमध्ये हा पाणी साठा किती राहिल हे पाहून पुढील आराखडा तयार केला जाईल. परंतु सध्या तरी परिस्थिती चांगली आहे. त्यामुळे ही परिस्थिती पाहता मागील वर्षीप्रमाणे कपात करण्याची गरज भासणार नाही, असे महापालिकेच्या जलअभियंता विभागाने स्पष्ट केले.

मागील तीन वर्षांतील पाण्याच्या साठ्याची एकूण आकडेवारी
२६ सप्टेेंबर २०१९ : १४ लाख ३० हजार २२४ दशलक्ष लिटर्स(९८.८२ टक्के)
२६ सप्टेंबर २०१८ : १३ लाख ४० हजार ९२८ दशलक्ष लिटर्स(९२.६५ टक्के)
२६ सप्टेंबर २०१७ : १४ लाख ३५ हजार ४२२ दशलक्ष लिटर्स(९९.१७ टक्के)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -