घरमहाराष्ट्रवेगळा विदर्भ होत नाही तोपर्यंत लग्नगाठ बांधणार नाही

वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यंत लग्नगाठ बांधणार नाही

Subscribe

विदर्भ स्वंतत्र राज्य होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही, अशी प्रतिज्ञा २००४ साली देवेंद्र फडणवीस यांनी ते मुख्यमंत्री नसताना केली होती. आता त्यांचे लग्न होऊन कित्येक वर्षे उलटली, ते पाच वर्षे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मात्र स्वतंत्र विदर्भाबाबत त्यांनी चक्कार शब्दसुद्धा काढला नाही. काँग्रेसप्रमाणे भारतीय जनता पक्षानेसुद्धा विदर्भातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या विधान सभा निवडणुकीत स्वतंत्र विदर्भाच्या मागणीवर विदर्भातील 40 जागा लढवणार आहोत, अशी माहिती विदर्भ राज्य समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी ‘आपलं महानगर’ला दिली.

गेल्या 105 वर्षांपासून स्वतंत्र विदर्भाच्या मागणीवरून लढा सुरु आहे. या आंदोलनाला काँग्रेसच्या काळात यश मिळाले नाही. भाजपने विदर्भातील जनतेच्या भावना लक्षात घेऊन स्वतंत्र विदर्भाला पाठिंबा दिला. स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी अनेक सभेत स्वतंत्र विदर्भाचे आश्वासन दिले. इतकेच नाहीतर वेगळ्या विदर्भ राज्याची घोषणा होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही, अशी घोषणाही त्यांनी काही वर्षांपूर्वी केली होती. त्यानंतर फडवणीसांचे लग्नही झाले. पाच वर्षे सत्तेत राहूनही वेगळ्या विदर्भाच्या विषयावर ते गप्प आहेत.

- Advertisement -

गेल्या लोकसभा आणि विधान सभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आमची सत्ता केंद्रात आली तर आम्ही स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करू असे सांगितले होते. मात्र सत्तेत येताच भाजपच्या विर्दभातील नेत्यांनी राज्य निर्मितीचा मुद्दा गुंडाळून ठेवला आहे. काँग्रेसपेक्षा भाजपने विदर्भाच्या जनतेची मोठी फसवणूक केली आहे, असा आरोपही राम नेवले यांनी केला आहे.

या संघटना लढवणार निवडणुका
1) विदर्भ राज्य आंदोलन समिती 2) विदर्भ राज्य आघाडी 3) शेतकरी संघटना 4) स्वतंत्र भारत पक्ष 5) राष्ट्रीय जनस्वराज्य पार्टी 6) जांबुवंतराव धोटे विचार मंच

- Advertisement -

धडा शिकवण्यासाठी निवडणूक लढवणार
विदर्भातील मतदार नेहमीच काँग्रेस आणि भाजपला आलटून पालटून कौल देतात. कित्येकदा काँग्रेसला विदर्भात भरपूर जागा मिळाल्या आहेत. गेल्या विधान सभा निवडणुकीत विदर्भाने भाजपला 62 पैकी तब्बल 44 जागा दिल्या होत्या. तर काँग्रेसला 10, शिवसेनेला ४, राष्ट्रवादीला अवघी एक जागा मिळाली होती. याही वेळी भाजपची मोठी मदार विदर्भावरच आहे. मात्र भाजप स्वतंत्र विदर्भाचे आश्वासन विसरले आहे. त्यामुळे त्यांना धडा शिकवण्यासाठी विदर्भवादी संघटना आणि काही पक्षांनी यंदा विदर्भातील 40 जागांवर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. या 40 पैकी २२ जागा स्वत: विदर्भ आंदोलन समिती लढवणार असल्याचे समजते.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -