घरमुंबईउल्हासनगरच्या त्या इमारतीतील बेघर राहिवाश्यांनी २४ दिवसानंतर उपोषण सोडले

उल्हासनगरच्या त्या इमारतीतील बेघर राहिवाश्यांनी २४ दिवसानंतर उपोषण सोडले

Subscribe

उल्हासनगरमधील मेहक इमारत ही ४० दिवसांपूर्वी कोसळली होती. यानंतर बेघर झालेल्या राहिवाश्यांनी पुनर्वसनाची मागणी करून २४ दिवसांपासून साखळी उपोषण सुरू केले होते. मात्र आज, सोमवारी दुपारी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. उल्हासनगर कॅम्प २ मधील फर्नीचर बाजाराच्या लिंकरोडवर असलेल्या मेहक-ए ही इमारत झुकल्याने दरवाजे जाम झाले होते. पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या निर्देशानंतर सहाय्यक आयुक्त भगवान कुमावत, अग्निशमन अधिकारी भास्कर मिरपगार यांनी ३१ कुटुंबातील १५० सदस्यांना बाहेर काढून इमारत खाली केली होती. तसेच मेहक-ए ही बी-विंगच्या दिशेने झुकलेली असल्याने बी-विंग देखील रिकामी केली होती. ही इमारत १३ ऑगस्टच्या सकाळी पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली होती.

दरम्यानच्या काळात महानगरपालिकेच्या सर्वसाधारण महासभेपूर्वी मेहकच्या रहिवाशांनी हातावर काळ्या फिती, तोंडावर मास्क आणि हातात बॅनर घेऊन मूक मोर्चा काढला आणि ‘घर देता का घर’ची हाक दिली होती. इमारत पुन्हा उभारण्यासाठी प्रशासनाकडून पावले उचलली जात नसल्याने २४ दिवसांपूर्वी महेक इमारतीच्या रहिवाश्यांनी साखळी उपोषण सुरू केले होते. विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. मात्र त्यानंतरही उपोषण सुरूच होते. अखेर साई वसनशाह कोअर कमिटीचे राम वाधवा, शशिकांत दायमा, निखिल गोळे आदींनी महेक इमारतीच्या रहिवाश्यांची भेट घेतली होती. त्यानंतर दिपेश हसिजाच्या मध्यस्थीने सोमवारी दुपारी रविंद्र चव्हाण हे उल्हासनगरमध्ये आले. यावेळी आमदार ज्योती कलानी, जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी, स्थायी समिती सभापती राजेश वधारिया, नारायण पंजाबी, नरेंद्रकुमारी ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. धोकादायक आणि अनधिकृत इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी नोटिफिकेशन काढण्यात आले आहे. त्यामुळे उपोषण सोडा, असे राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले आहे. त्यामुळे उपोषण सोडले असल्याचे मेहक इमारतीच्या रहिवाश्यांनी सांगितले. जोपर्यंत आमची इमारत उभी राहत नाही, तोपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -