घरमुंबईमच्छीमारांच्या मागण्या मान्य न झाल्यास कोस्टल गुंडाळायला लावू!

मच्छीमारांच्या मागण्या मान्य न झाल्यास कोस्टल गुंडाळायला लावू!

Subscribe

अखिल महाराष्ट् मच्छीमार कृती समितीचा इशारा

मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्पाला (कोस्टल रोड) कोळी बांधवांचा विरोध कायमच आहे. वरळी कोळीवाड्यातील मच्छीमारांचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत कोस्टल रोडचा विरोध राहीलच, असा इशारा अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने दिला. महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्यासह प्रशासनाचे अधिकारी बांधकाम आराखड्यात बदल करायला तयार नाहीत. त्यामुळे पुढील सात दिवसांमध्ये आयुक्तांनी मच्छीमारांच्या मागण्या तसेच सूचनांचा विचार न केल्यास संपूर्ण कोळीवाड्यांमधील मच्छीमार रस्त्यावर उतरवून हा प्रकल्प गुंडाळून ठेवायला भाग पाडू, असा इशारा समितीने दिला.
अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी पत्रकार परिषद घेऊन मच्छीमारांच्या मागण्या मान्य न झाल्यास कोस्टल रोड होऊ देणार नाही, असे जाहीर केले.

याप्रसंगी वरळीतील नाखवा सोसायटीचे हरिश्चंद्र नाखवा, सुरेश आगासकर, दिगंबर वैती, राजाराम पाटील, विल्फ्रेड डिसोझा आदी उपस्थित होते. कोस्टल रोडच्या कामात मच्छीमारांना विश्वासात घेतले नाही. वरळी, चिंबई, वांद्रे, खारदांडा, जुहू कोळीवाडा, जुहू मोरागाव येथील मच्छीमार सहकारी संस्थांकडून तत्कालीन मत्सव्यवसाय आयुक्तांनी अभिप्राय मागवले होते. पण या संस्थांनी मासेमारी व्यवसाय धोक्यात येता कामा नये याची हमी मागितली होती. परंतु, असे असताना मत्स्यव्यवसाय आयुक्तांनी नुकसानभरपाई देण्याच्या अटीवर परवानगी दिली जाईल, असे नमूद केलेे. याचा आपण निषेध करत असल्याचेही समितीने सांगितले.

- Advertisement -

कोस्टल रोड प्रकल्पाची माहिती मच्छीमारांना देण्याची तसदी महापालिका आयुक्तांनी घेतली नाही. कोस्टल रोडला मच्छीमारांचा विरोध नाही. परंतु, मच्छीमारांच्या मासेमारीचा व्यवसाय नष्ट होणार असेल तर आम्ही वरळी कोळीवाड्यातील मच्छीमारांच्या बाजूने उभे राहू आणि प्रकल्पाचे काम करू देणार नाही.प्रियदर्शनीच्या परिसरातील समुद्रात भराव टाकण्याचे काम सुरू आहे. या समुद्रकिनारी चांगल्याप्रकारचे मासे, कोळंबी, जवळा, खेकडे, शेवंड, घोळ आदी मासे मिळतात. याच भागातील खडकाळ परिसरात माश्यांचे प्रजनन होते. त्यामुळे याठिकाणी भराव टाकल्यास माश्यांच्या प्रजननाची जागा नष्ट होईल, परिणामी मच्छीमारांचा मासेमारीचा व्यवसायच नष्ट होईल, अशी भीती समितीने व्यक्त केली. प्रकल्पाचे काम करताना दोन खांबांचे अंतर फक्त 50 मीटर एवढेच आहे. त्यामुळे खवळलेल्या समुद्रातून येणार्‍या नौका एकमेकांवर आदळतील. यात नौकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. त्यामुळे दोन खांबांमधील अंतर 200 मीटर एवढे करण्याची मागणी वरळी कोळीवाड्यातील मच्छीमारांनी केली आहे. यावर महापालिकेने या सूचनेचा विचार करत तोडगा काढावा, नाहीतर प्रकल्पाचे काम मुंबईचे मच्छीमार होऊ देणार नाहीत, असा पवित्रा सर्वच कोळीवाड्यातील मच्छीमारांनी घेतला असल्याचे समितीने स्पष्ट केले.

अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक, उद्यान, हॉस्पिटल, मत्स्यालय इत्यादी पर्यटन स्थळ निर्माण करण्यास मच्छीमारांचा तीव्र विरोध असल्याचे समितीने स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर ज्यांनी लढाईत पराक्रम गाजवला, त्या मावळ्यांच्या इतिहासाची दालने हवीत. महाराजांचा अश्वारुढ पुतळा नरिमन पॉईंट गिरगाव चौपाटीच्या समुद्रात उभारा किंवा हाजी अलीच्या समुद्रात उभारा आणि तिथे शक्य नसेल तर कार्टर रोड येथील वांद्रे बँड स्टँडच्या परिसरातील खडकाळ भागात उभा करा. तिथेही शक्य नसेल तर रेसकोर्सच्या जागेत उभारा, अशी सूचना समितीने केली.

- Advertisement -

शिवसेनेने रेसकोर्सवर थिमपार्क बसवण्याची मागणी केली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांना हाताशी धरून कफ परेड-नरिमन पॉईंट येथे थिमपार्क बनवण्यासाठी आरक्षण टाकून घेतले. या जागेत 350 मच्छीमारांच्या नौका उभ्या करण्याची ही जागा आहे. त्यामुळे मच्छीमारांचा व्यावसाय नष्ट होणार आहे. या भागात भराव टाकल्यास मुंबई समुद्रात बुडेल, अशी भीती व्यक्त करत यापुढे मुंबईच्या समुद्रात भराव टाकण्यास मच्छीमारांचा विरोध राहील, असा इशारा समितीने दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -