घरफिचर्सबाल-कलाकार आणि लोकप्रियता

बाल-कलाकार आणि लोकप्रियता

Subscribe

दहाव्या वर्षीच रुपेरी पडद्यावर आलेली छोटी मुलगी, जागतिक कीर्तीची अभिनेत्री बनली. जिने दोन ऑस्करही मिळवली आणि सुरुवातीलाच जगातील सर्वात सुंदर बालिका आणि नंतर जगातील सर्वात सुंदर स्त्री असा लौकिक संपादन केला, त्या एलिझाबेथ टेलरला लहान मोठा वा वृद्ध कोणताही सिनेप्रेमी विसरू शकणार नाही. ज्याने तिला पाहिले त्याच्या स्मरणात ती कायमचं ठाण मांडून बसली आणि त्यामुळंच अफाट लोकप्रियता तिला मिळाली. तब्बल आठ वेळा लग्न करूनही ही लोकप्रियता कणभरही कमी झाली नव्हती. उतारवयात तिच्या आजाराच्या बातम्या येत, तेव्हा चाहते अस्वस्थ होत. अनेकदा, जवळजवळ नऊ वेळा तरी, ती मरणाच्या दारातून परतली होती. आणि निधनानंतरही ती आख्यायिका म्हणून उरली आहेच.

लहानपणी लोकप्रियता मिळवून ती जन्मभर टिकवणारे कलाकार अगदीच थोडे असतील. अनेकांची तर कारकिर्द मोठेपणी संपल्यातच जमा होते. पण याला असलेल्या मोजक्या अपवादांपैकी प्रमुख होती लिझ. तिचा पहिला चित्रपट होता, देअर्स वन बॉर्न एव्हरी मिनिट. त्याच्याच पाठोपाठ मेट्रोचा लॅसी कम होम हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि जगातील सर्वात सुंदर बालिका म्हणून जगभर तिची ओळख झाली. बाराव्या वर्षी तिनं मेट्रोचाच नॅशनल वेलव्हेट केला आणि प्रेक्षकांना एनिड बँगोल्डच्या कादंबरीतील वेल्व्हेट ब्राऊनच जिवंत झाल्यासारखं वाटलं. या चित्रपटानं तिचं अवघं जीवनच बदलून टाकलं.
याबाबत गमतीची वाटणारी अशी एक गोष्ट आहे. सांगीवांगीची नाही, तर प्रत्यक्ष घडलेली. पांड्रो एस. बेर्मन या निर्मात्यानं 1930 च्या दशकामध्येच त्या कादंबरीचे चित्रीकरणाचे हक्क विकत घेतले होते.

त्यावेळी त्याचा बेत कॅथरिन हेेपबर्नला मुख्य भूमिका देण्याचा होता. कदाचित त्यामुळेच असेल, जेव्हा वेल्व्हेट ही मुख्य भूमिका लिझ टेलरला देण्याचा विचार सुरू झाला, त्या वेळी बेर्गमन लिझला घ्यायला तयार नव्हता. तो म्हणाला होता, ती अगदीच लहान आहे. त्याचबरोबर ती अजून आवश्यक तेवढी उंच झालेली नाही, असा आक्षेपही तो घेत होता. तो लिझला म्हणाला, चित्रीकरण सहा महिन्यांतच सुरू होणार आहे, तेवढ्यात तुझी उंची कशी वाढणार? त्यावर कसं कोण जाणे, जिद्दीनं ती त्याला म्हणाली होती, मी उंच होईन. अगदी तुम्हाला हवी आहे, तेवढी उंच होईन!आणि तसंच झालं. तिची शारीरिक उंची तर वाढलीच. पण तिनं आपल्या कामगिरीनं नंतरच्या काळात जी उंची गाठली ती फारच थोड्या कलाकारांना गाठता आली!पण ही झाली नंतरची गोष्ट. आपण बोलत होतो नॅशनल वेल्व्हेटबाबत. तर या उंचीच्या प्रकरणाचा मेट्रो कंपनीनंं चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी मोठ्या चतुराईनं वापर करून घेतला. चित्रपटात तिच्या बरोबर मिकी रूनी हा तेव्हाचा प्रसिद्ध बालनट होता. तोही तसा लहानखुराच (आणि नंतरही तो तसाच राहिला होता.), त्यामुळं तिला उंचीवरून बोलणार्‍या बेर्मननंच म्हटलं, महा मिकी असा बुटबैंगण. लिझनं एवढं उंच व्हायची गरज नव्हती! अर्थात प्रेक्षकांना याच्याशी देणंघेेणं नव्हतं. ते जे काही रुपेरी पडद्यावर बघत होते, ते त्यांना प्रचंड आवडत होतं. त्यामुळं नॅशनल वेल्व्हेट चांगला गाजला आणि लोकप्रियतेची नवनवी शिखरे त्यानं सर केली.

- Advertisement -

या चित्रपटाची कथा तशी साधी. अश्वशर्यतीत भाग घ्यायची तीव्र इच्छा असलेली मुलगी नियमांनुसार स्पर्धेत भाग घेऊ शकत नाही. त्यामुळं वेल्व्हेट एक शक्कल लढवते आणि थेट मुलाचीच वेषभूषा करून स्पर्धेत सहभागी होते आणि जिंकतेही. राष्ट्रीय स्पर्धा म्हणून ती नॅशनल वेल्व्हेट म्हणून ओळखली जाते. चित्रपटातील स्पर्धेचे थरारक प्रसंग प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारे होते. आणि अर्थातच नकळत त्यांना वेल्व्हेटची बाजू घ्यायला भाग पाडत असत. नकळत प्रेक्षक कधी वेल्व्हेटला प्रोत्साहन द्यायला लागत , ते त्यांनाच कळत नसे.ही जादू होती एलिझाबेथ टेलरच्या सौंदर्याची. ते गारूड होतं तिच्या लोभसपणाचं आणि निरागस चेहर्‍याचं पण केवळ एवढंच तिचं भांडवल नव्हतं. तिच्याकडं दर्जेदार अभिनय होता, त्या बालवयातही. अप्रतिम लावण्याला अव्वल अभिनयाची अशी जोड मिळावी, हा खरोखरच दुर्मिळ योग होता. सौंदर्य आणि बुद्धिमत्ता एकत्र नांदत नाहीत असा जो समज आहे, तसाच सौंदर्य आणि अभिनय यांच्याबाबतही आहे.

अनेकदा त्याच्या खरेपणाचा प्रत्ययही येतो. पण तो खोटा ठरवणारे लिझ टेलरसारखे कलाकारही आहेत! उगाच नाही तिनं दोनदा ऑस्कर आणि अनेकदा त्यासाठी नामांकनं मिळवली. पहिलं ऑस्कर तिला बटरफील्ड – 8 या चित्रपटातील भूमिकेसाठी मिळालं होतं, तर दुसरं हू इज अफ्रेड ऑफ व्हर्जिनिया वूल्फ या चित्रपटासाठी. पण तेव्हा तिला स्वतःला ऑस्कर मिळालं म्हणून आनंद होण्याऐवजी रिचर्ड बर्टनला मिळालं नाही, म्हणून वाईट वाटलं होतं. (असंच कॅथरिन हेपबर्न आणि स्पेन्सर ट्रेसी यांच्याबाबतही झालं होतं. गेस हू इज कमिंग टु डिनर हा चित्रपट ट्रेसीचा अखेरचाच चित्रपट. तो पूर्ण झाल्यावर लगेचच ट्रेनीचं निधन झालं. नंतर कॅथ्रिन हेपबर्नला त्या चित्रपटासाठी ऑस्कर मिळालं. तेव्हा तिला ती बातमी देणार्‍याला तिनं आणि ट्रेसीला काय मिळालं, असा प्रश्न केला. पण त्याचं नकारार्थी उत्तर आल्यानंतर ती म्हणाली होती, ठीक आहे. म्हणजे आम्हाला दोघांनाच हे देण्यात आलं आहे तर!)लिझ पडद्यावर आली, तेव्हा हॉलीवूडमध्ये बालकलाकारांची मांदियाळीच होती. जेन विस्दर्स, डेना डिर्बन, जोन पॉवेल आणि ज्यूडी गालँड ही त्यातील प्रमुख नावं. आणि नंतरच्या काळातही कॅथरीन हेपबर्न, मिर्लन मन्रो, डोरिस डे, अ‍ॅव्हा गार्डनर, सोफिया लॉरेन, ऑड्री हेपबर्न अशा अनेक स्पर्धेत होत्या. तरीही लिझनं स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली, खास स्थान मिळवलं, ही काही नशिबाची म्हणून सोडून द्यावी अशी गोष्ट नव्हती. नंतरच्या तिच्या कर्तृत्वानं तिनं हे सिद्धच केलं होतं. म्हणून तर ती आजही रसिकांच्या मनात घर करून राहिली आहे.

- Advertisement -

आ. श्री. केतकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -