घरमुंबईतुंबई रोखण्यासाठी टोकीयोच्या धर्तीवर जलबोगदे; जपानचे तज्ज्ञ करणार अभ्यास

तुंबई रोखण्यासाठी टोकीयोच्या धर्तीवर जलबोगदे; जपानचे तज्ज्ञ करणार अभ्यास

Subscribe

मुंबईत मोठ्या प्रमाणात पाणी साचते हे रोखण्यासाठी टोकीयोच्या धर्तीवर जलबोगदे तयार केले जाणार असून याकरता जपानचे तज्ज्ञ मुंबईसह नद्यांच्या परिसरांचा अभ्यास करणार आहेत.

मुंबईत निर्माण झालेल्या सिमेंटच्या जंगलामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यात अनेक अडचणी येतात. परिणामी नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता जमिनीखाली जलबोगदे तयार करून त्याद्वारे हे पाणी समुद्रात सोडण्याची योजना महापालिकेच्यावतीने राबवण्याचा विचार केला जात आहे. यासाठी जपानमधील तज्ज्ञांची मदत घेऊन विहार, तुळशी, पवईसह मिठी नदीच्या परिसरांचा अभ्यास त्यांच्याकडून केला जाणार आहे. हा अभ्यास करण्यासाठी या तज्ज्ञांची निवड करण्यात आली असून याचा अभ्यास अहवाल या तज्ज्ञ मंडळींनी महापालिकेला सादर केल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

नद्यांच्या परिसरांचा जपानचे तज्ज्ञ करणार अभ्यास

महापालिका मुख्यालयातील आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली जपानमधील संबंधित संस्थेचे महाव्यवस्थापक योशिताका तोयोसू, आपत्ती व्यवस्थापन आणि बंदर विकास विभागाचे तंत्रज्ञान व्यवस्थापक ताकेशी यांच्याशी बैठक पार पडली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल, उपायुक्त राजीव कुकनूर, पर्जन्य जलवाहिनी खात्याचे प्रमुख अभियंता संजय दराडे, महापालिकेचे संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि तंत्रज्ञ उपस्थित होते.

- Advertisement -

मुंबईतील वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक परिस्थितीमुळे पावसाळ्याच्या काळात काही परिसरांमध्ये पाण्याचा निचरा होण्यास वेळ लागतो. पावसाच्या पाण्याचा निचरा अधिक जलद गतीने व्हावा, यासाठी महापालिकेच्यावतीने उपाययोजना केल्या जातात. यंदाच्या पावसाळ्यात सातत्याने झालेल्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यास वेळ लागला. परिणामी, नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागले. या पार्श्वभूमीवर जपान मधील टोकियो शहरात जमिनीखाली मोठे मोठे जलबोगदे तयार करुन त्यात पावसाचे साचलेले पाणी साठवून नंतर ते समुद्रात सोडण्याची योजना यशस्वीपणे राबविण्यात आली आहे. याच प्रकारची उपाययोजना मुंबईत राबविता येऊ शकते का? याची चाचपणी करण्याबाबत सोमवारी महापालिका मुख्यालयात जपानमधील संबंधित संस्थेचे अधिकारी आणि तंत्रज्ञ यांनी विशेष सादरीकरण केले. हे तज्ज्ञ मंगळवारी महापालिका अधिकार्‍यांसह तुळशी, विहार, पवईसह मिठी नदीच्या परिसरांचा अभ्यास दौरा करुन नंतर त्याविषयीचा अहवाल सादर करतील, असे आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी स्पष्ट केले.

टोकियो शहराच्या धर्तीवर मुंबईत अशा प्रकारची उपाय योजना राबविता येऊ शकते काय? यासाठीच्या चाचपणीसाठी प्राथमिक चर्चा करण्यात आली. पावसाचे पाणी मोठ-मोठ्या जलबोगद्यांमध्ये साठविण्याचा प्रकल्प मुंबईत राबवावयाचा झाल्यास, त्यासाठी ‘जपान इंटरनॅशनल को-ऑपरेटिव्ह एजन्सी’ (JICA) ची मदत मिळविण्याचाही प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

हेही वाचा – येत्या तीन दिवसात पडणार पाऊस; स्कायमेटचा अंदाज


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -