घरमुंबईसत्ताधारी नगरसेवकाच्या मुलांची कळंबोलीत दहशत; त्या पीडितांच्या नातेवाईकांचा आरोप

सत्ताधारी नगरसेवकाच्या मुलांची कळंबोलीत दहशत; त्या पीडितांच्या नातेवाईकांचा आरोप

Subscribe

कळंबोली येथील रोडपाली नजीकच्या गिरीराज रेस्टॉरंट अँड बारसमोर शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास नगरसेवक जगदीश गायकवाड यांच्या तीन मुलांसह एक भाचा, असे चौघा जणांनी विश्वनाथ गणेश गायकवाड या तरुणाच्या डोक्यात बियरच्या ८ बाटल्या फोडून त्यावर न थांबता बेदम मारहाण करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या नगरसेवक पुत्रांना कळंबोली पोलिसांकडून अभय मिळत असल्याचा आरोप पीडितांच्या नातेवाईकांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला. यावेळी पीडित हा मृत्यूशी झुंज देत असतानाही कलम ३०७ न लावल्यामुळे न्यायालयात हे प्रकरण दाखल करणार असून कळंबोली पोलिसांच्या विरोधात आमरण उपोषणास बसण्याचा त्यांनी यावेळी इशारा दिला.

तक्रारदार सिद्धार्थ गायकवाड याला घटनेच्या दोन दिवसापूर्वी जगदीश गायकवाड यांच्या मुलांनी जुजबी कारणावरून मारले होते. यानंतर त्याने कळंबोली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. मात्र आम्ही नगरसेवकाची मुले असल्यामुळे आमच्या विरोधात कोण कशी काय तक्रार करू शकतो?, अशा वल्गना करत जगदीश गायकवाड यांची मुले करत सिध्दार्थला शोधत होती. मात्र तो हाती न लागल्यामुळे त्याचा राग त्यांनी विश्वनाथवर काढला. रोडपाली येथील गिरीराज बार अँड रेस्टॉरंटसमोर चौघांसह अन्य ४ ते ५ जणांनी त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. यावेळी विश्वनाथ याच्या डोक्यावर त्यांनी तब्बल ८ बियारच्या बाटल्या फोडल्या आणि त्याला बेदम मारहाण केली. यामध्ये विश्वनाथ हा गंभीर स्वरूपात जखमी झाला. यानंतर कळंबोली पोलिसांनी रात्री घडलेल्या घटनेचा गुन्हा दाखल करण्यास सकाळ होताच गुन्हा दाखल करण्यापासून ते तपासापर्यंत टाळाटाळ करत असल्याचा आरोप केला आहे. नगरसेवक जगदीश गायकवाड यांच्या चिरंजीवांनी बाप सत्ताधारी पक्षाचा नगरसेवक असल्यामुळे आमचे कोणीही काहीही करू शकत नसल्याचे सांगत गुंडगिरी व दहशत रोडपाली परिसरात वाढवली आहे. याबाबत कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पत्रकारांनाही माहिती देण्यास टाळाटाळ केली.

- Advertisement -

पत्रकारालाही दिली नगरसेवक गायकवाड यांनी धमकी

कळंबोलीमधील घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर कळंबोली पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याची बातमी प्रसिद्ध केल्याचा राग मनात धरून नगरसेवक जगदीश गायकवाड यांनी आपण आत्ता एक मर्डर करणार असल्याची बतावणी करून अप्रत्यक्ष धमकी दिली. याबाबत राज भंडारी यांनी मात्र त्यांच्या या धमकीला थारा न देता तुम्हाला काय करायचे ते करा असे वक्तव्य केल्याने दूरध्वनीवरील ही ऑडिओ क्लिप पनवेलमध्ये चांगलीच व्हायरल झाली. याबाबत जखमी झालेल्या विश्वनाथ गायकवाड यांच्या नातेवाईकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा उलगडा केला. याबाबत पत्रकार राज भंडारी यांना या घटनेबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, सामाजिक कार्य करत असताना अन्यायाविरोधात आवाज उठविणे हे काम पत्रकारांचे आहे आणि मी तेच केले आहे. यामध्ये गुन्हेगारांना गुन्हा करताना वाईट वाटले नाही मग बातम्या प्रसिद्ध झाल्यावर वाईट का वाटावे? जे आहे ते त्यांनी स्वीकारले पाहिजे. याच ठिकाणी जर अन्य कोणी असते तर मात्र त्यांना कायद्याचा हिसका दाखवीत कोठडीत रवानगी केली असती, मात्र पैशाचा जोर काहीही करत असला तरी आमच्यासारखे समाजसेवक जोपर्यंत आहेत तोपर्यंत अन्यायाविरोधात आवाज हा उठवलाच जाणार.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -