घरमुंबईकल्याण - बदला `पूर `

कल्याण – बदला `पूर `

Subscribe

पुरामुळे कल्याणात शेकडो रहिवाशांचे संसार उघड्यावर , पुन्हा 26 जुलैची कटू आठवण

गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पडलेल्या पावसाने कल्याण डोंबिवलीत पूरपरिस्थिती उद्भवली होती. कल्याणातील गोविंदवाडी, रेतीबंदर, घोलपनगर, वालधुनी आदी परिसरातील घरांमध्ये दहा फुटांपर्यंत पाणी शिरल्याने घरातील अन्नधान्य, कपडे. टिव्ही फ्रीज आदी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खराब झाल्या आहेत. तसेच अनेकांची भांडीकुंडी वाहून गेल्याने शेकडो लोकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. शनिवारची रात्री सभागृह अथवा शाळेत काढल्यानंतर रविवारी सकाळी रहिवासी घरी परतल्यानंतर त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. सामान्यांची नासधूस झाल्याने सामानांची सारवासारव करीत आहेत.

शनिवारच्या मुसळधार कोसळणार्‍या पावसाने उल्हास नदीला पूर आला. त्यामुळे नदीचे पाणी शहरात घुसल्याने रस्त्यावर दहा ते वीस फुटांपर्यंत पाणी वाढले होते. बैठ्या चाळी पाण्याखाली गेल्या होत्या. सर्वाधिक फटका कल्याणातील गोविंदवाडी, रेतीबंदर, घोलपनगर, वालधुनी आदी परिसराला बसला होता. दहा ते वीस फुटांपर्यंत पाणी वाढल्याने अग्निशमन दल व स्थानिकांच्या मदतकार्याने अडकलेल्या शेकडो लोकांची सुटका करण्यात आली. शनिवारी दुपारीच या रहिवाशांना हलविण्यात आले होते. त्यामुळे नजीकच्या सभागृह व शाळा आदी ठिकाणी त्यांची व्यवस्था करण्यात आली. रात्रीपर्यंत पाणी न ओसरल्याने लोकांनी शनिवारची रात्र तेथेच काढली. स्थानिक नगरसेवकांनी पुढाकार घेत त्यांच्या जेवणाची व नाश्त्याची व्यवस्था केली. मात्र, शासकीय यंत्रणा अथवा पालिकेचे पथक त्यांची विचारपूस करण्यासाठी फिरकले नाही. त्यामुळे रहिवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला. रविवारी पहाटे पाणी ओसरल्यानंतर रहिवासी सकाळी आपल्या घरी परतले. पुरानंतर शहरात साथीचे आजारांची भीती असल्याने पालिकेने तातडीने जंतुनाशक फवारणी व साफ सफाईचे काम हाती घ्यावे, अशीही मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -