घरमुंबईनॅशनल पार्कमध्ये घुमणार गुजराती सिंहांची डरकाळी

नॅशनल पार्कमध्ये घुमणार गुजराती सिंहांची डरकाळी

Subscribe

सिंहाची जोडी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिवासात मुक्त

गुजरात येथून आणलेली सिंहांची जोडी मंगळवारी बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिवासात मुक्त करण्यात आली. सोबतच वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते नॅशनल पार्कमधील वन ग्रंथालयाचे भूमिपूजन आणि सर्वांत लहान दुर्मीळ प्रजातीच्या वाघाटी मांजर (रस्टी स्पॉटेड कॅट) संवर्धन केंद्राचे उद्घाटनदेखील करण्यात आले.

यावेळी बोलताना भारताचा राष्ट्रीय प्रतीक असलेला सिंह आमचा अभिमान आहे. अशोक स्तंभावर सिंह आहे. पराक्रमाचे प्रतीक सिंह आहे. जंगलाचा हा राजा राज्यातील वनांच्या सान्निध्यात राहावा यासाठी पुढाकार घेतला असून सिंहांची जोडी उद्यानात सोडताना अतिशय आनंद होत असल्याचे उद्गार सुधीर मुनगंटीवार यांनी काढले.

- Advertisement -

मुनगंटीवार पुढे म्हणाले की, संजय गांधी उद्यानात मुक्त करण्यात आलेल्या सिंहांना भारतीय स्टेट बँकेने दत्तक घेतले याचे मनापासून कौतुक करावेसे वाटते. वनांचे काम मनापासून करा. हे ईश्वरीय कार्य आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ईश्वराची देण आहे. वसुंधरा म्हणजे पृथ्वीच्या जडणघडणीत देवाने आर्किटेक्ट म्हणून भूमिका निभावली. त्या अमूल्य वसुंधरेच्या संवर्धनाची जबाबदारी सारे मिळून सांभाळूया, असे भावनिक आवाहन त्यांनी केले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील सर्वांत लहान दुर्मीळ प्रजातीच्या वाघाटी मांजराचे संवर्धन केंद्र हे देशातील एकमेव संवर्धन केंद्र आहे.तेदेखील आपण जपूया, असे ते म्हणाले.

यावेळी बोलताना आमदार प्रवीण दरेकर यांनी वन ग्रंथालय संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वैभवात भर घालेल, असे मत व्यक्त केले. सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याचे कौतुक करताना ते म्हणाले की, सुधीर मुनगंटीवार दूरदृष्टी असणारे महाराष्ट्रातील नेते आहेत. त्यांच्या पूर्वीच्या आणि आताच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात महाराष्ट्र चौफेर प्रगती करीत आहे.

- Advertisement -

टॉकिंग ट्रीचा उपक्रम राबवा
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ट्रेन चालवण्यात येते. ही ट्रेन केवळ पर्यटन आणि मनोरंजनापुरती मर्यादित राहू नये, तर ती ज्ञानदानाचे केंद्र बनावी, अशी अपेक्षा मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. चंद्रपुरात अलीकडेच टॉकिंग ट्रीचा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे असेच आधुनिक उपक्रम संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राबविले जावे, असेही ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -