घरमहाराष्ट्रकन्नडिगांचा बेळगावात भ्याड हल्ला

कन्नडिगांचा बेळगावात भ्याड हल्ला

Subscribe

कन्नड रक्षण वेदिकेकडून ६ वाहनांवर दगडफेक,राज्यभर संताप

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगावचा दौरा रद्द केल्याचे शिंदे सरकारकडून सांगण्यात आले. असे असूनही मंगळवारी दुपारी बेळगावच्या हिरेबागवाडी टोल नाक्यावर महाराष्ट्रातून बंगळुरूच्या दिशेने जाणार्‍या ६ वाहनांवर दगडफेक करण्यात आली. महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात येऊ न देण्याची भूमिका घेतलेल्या कन्नड रक्षण वेदिका संघटनेने महाराष्ट्राच्या वाहनांवर हा हल्ला केला. या घटनेचे राज्यात तीव्र प्रतिसाद उमटले.

या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील स्वारगेट बस डेपोत उभ्या असलेल्या कर्नाटक पासिंगच्या गाड्यांच्या नंबर प्लेटवर काळे फासले. या घटनेनंतर दक्षता घेत एसटी महामंडळाने कर्नाटकात जाणार्‍या बसेस थांबवल्या आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर महाराष्ट्र एकीकरण समितीसोबत चर्चा करण्यासाठी चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई हे दोन मंत्री बेळगावात जाणार होते. त्याआधीच हा वाद पेटला आहे.

- Advertisement -

कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी दुपारी बेळगावच्या चौकात रास्ता रोको केला. रस्त्यावर लोळण घेत वाहने अडवली. महाराष्ट्र एकीकरण समिती आणि महाराष्ट्र सरकारविरोधात घोषणाबाजी करीत महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात येऊ देऊ नका, अशी मागणी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावच्या जिल्हाधिकार्‍यांकडे केली. त्यानंतर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हिरेबागवाडी टोल नाका गाठत पुण्याहून बंगळुरूकडे जाणार्‍या वाहनांवर हल्ला केला. महाराष्ट्राच्या ६ वाहनांवर दगडफेक करण्यात आली. वाहनांच्या काचांसह नंबर प्लेट आणि काही वाहनांचे इतर भागही तोडण्यात आले. काही कार्यकर्त्यांनी वाहनांवर चढून घोषणाबाजी केली, तर काही जण वाहनांसमोर आणि वाहनांखाली झोपले. कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रातील वाहने पुढे जाऊ देणार नाही, अशी भूमिका या कार्यकर्त्यांनी घेतली. त्यानंतर कन्नड रक्षण वेदिका संघटनेत्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

या हल्ल्याचे पडसाद पुण्यात उमटले. विश्रांतीसाठी पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात उभ्या केलेल्या कर्नाटक वाहतूक मंडळाच्या बसला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले. बसच्या काचांवर ‘जय महाराष्ट्र’ असेही लिहिण्यात आले. कोल्हापुरातही ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटकच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली.

- Advertisement -

पुण्यात कर्नाटक परिवहनच्या बसला काळे फासले
कन्नडिगांच्या हल्ल्याला प्रत्त्युत्तर म्हणून पुण्यात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी स्वारगेट बस स्थानकात जात कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बसला काळे फासले. तसेच बसवर जय महाराष्ट्र लिहून कर्नाटक सरकारविरोधात घोषणाबाजी करीत तीव्र निषेध केला. हे आंदोलन अधिक चिघळून नये म्हणून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

दोन्ही बाजूच्या एसटी सेवा बंद
या घटनेनंतर महाराष्ट्र आणि कर्नाटक एसटी महामंडळदेखील अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे. महाराष्ट्र एसटी महामंडळाने महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये जाणार्‍या एसटी बसेस बंद ठेवण्याची घोषणा केली आहे, तर कर्नाटक एसटी महामंडळानेही महाराष्ट्रात जाणारी एसटी बससेवा बंद केली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने एसटी बससेवा बंद ठेवण्यात आली आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना अटक
महाराष्ट्रातून येणार्‍या नेत्यांची अडवणूक करू नका, या मागणीचे निवेदन घेऊन बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात गेलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना स्थानिक पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी जिल्हाधिकार्‍यांना भेटू न दिल्याने आता याप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवणार असल्याचे समितीच्या नेत्यांनी सांगितले, तर दुसरीकडे आजपासून सुरू होणार्‍या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्रातील खासदार बेळगावातील हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -