घरमुंबईसोमवारपासून सर्वांसाठी लोकल

सोमवारपासून सर्वांसाठी लोकल

Subscribe

वेळ पाळावी लागणार

कोरोना संसर्गामुळे गेल्या दहा महिन्यांपासून सर्वसामान्य मुंबईकरांना लोकल प्रवासाला बंदी करण्यात आली होती. जीवनवाहिनी असलेली लोकल कधी सुरू होणार यासाठी मुंबईकर डोळ्यात प्राण आणून वाट पाहत होते, आता ती प्रतीक्षा संपली आहे. सोमवारी 1 फेब्रुवारीपासून वेळेचे पालन करून सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याची घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शुक्रवारी केली आहे. राज्य सरकारने यासंबंधीचे पत्र रेल्वेला पाठवले होते. या मागणीला केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी ट्विट करीत मंजुरी दिली आहे. त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

१ फेब्रुवारीपासून गर्दी होणार नाही अशा वेळा आखून सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय लोकल सेवा सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिले आहे. मात्र सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवासाकरीता वेळेचे पालन करावे लागणार आहे. सर्व प्रवाशांना पहाटेच्या पहिल्या लोकलपासून सकाळी ७ वाजेपर्यंत तसेच दुपारी १२ पासून दुपारी ४ पर्यंत आणि रात्री ९ पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येणार आहे. तर सकाळी ७ ते दुपारी १२ व दुपारी ४ ते रात्री ९ या कालावधीत उपनगरीय रेल्वे सेवांत प्रवास करता येणार नाही. या वेळात फक्त यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या विशिष्ट 20 प्रवर्गातील प्रवासी प्रवास करू शकतील.

- Advertisement -

यासंबंधीत गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा येथे बैठक झाली होती. यात वरिष्ठ रेल्वे अधिकारी उपस्थित होते. सर्व प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरू करण्यासाठी गर्दी होणार नाही, आरोग्याचे नियम पाळले जातील याची काळजी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या होत्या. त्यानुसार शुक्रवारी राज्य सरकारने मध्य आणि पश्चिम रेल्वेला 1 फेब्रुवारीपासून ठराविक वेळेत सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवासाला परवागी देण्यासंबंधीचे पत्र लिहिले होते. त्यानुसार रेल्वे बॉर्डाकडून याला परवागी देण्यात आली आहे. तसेच रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी लोकलमधून प्रवास करताना कोविडच्या नियमाचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

भाजपकडून टीका
राज्य सरकारने सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय पाच महिन्यांपूर्वीच घेतला असता तर लाखो लोकांचा त्रास वाचला असता. हजारो लोकांच्या नोकर्‍या वाचल्या असत्या. पण सरकारने तसे केले नाही. तसेच मंदिर उघडण्याआधी बार सुरू करणार्‍या या सरकारने सामान्यांना रात्री साडेनऊनंतर लोकल प्रवास करण्यास परवानगी दिली. याचा फायदा नक्की कोणाला होणार आहे? या सरकारला नक्की चिंता कोणाची आहे? सामान्य जनतेची की बारवाल्यांची, असा थेट सवाल भाजपचे नेते राम कदम यांनी केला आहे.

- Advertisement -

कधी प्रवास करता येईल
* पहिल्या लोकलपासून सकाळी ७ वाजेपर्यंत
*दुपारी १२ पासून दुपारी ४ पर्यंत
* रात्री ९ पासून शेवटच्या लोकलपर्यंत

कधी प्रवास करता येणार नाही
*सकाळी ७ ते दुपारी १२ पर्यंत
* दुपारी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत

टाळेबंदीआधीच्या फेर्‍या आणि प्रवासी संख्या

मध्य रेल्वे- लोकल फेर्‍या १७७४ ( मेन लाईन ८५८, हार्बर ६१२, ट्रान्स हार्बर २६४, सीवुड-उरण-४०), प्रवासी संख्या ४५ लाख

पश्चिम रेल्वे- लोकल फेर्‍या १३६७, प्रवासी संख्या ३५ लाख

सध्याची स्थिती-

मध्य रेल्वे- लोकल फेर्‍या- १६८५, प्रवासी संख्या सुमारे ९ लाख

पश्चिम रेल्वे – लोकल फेर्‍या- १३००, प्रवासी संख्या ११ लाख ५० हजार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -