घरमुंबईधोकादायक लोअर परळ रेल्वे पूल २४ जुलैपासून बंद

धोकादायक लोअर परळ रेल्वे पूल २४ जुलैपासून बंद

Subscribe

लोअर परळ पूल वाहतुकीसाठी आणि पादचाऱ्यांसाठी धोकादायक असल्याचं समोर आले आहे. त्यामुळे लोअर परळ रेल्वे पूल दुरुस्ती करणे गरजेचे असल्याने हा पूल येत्या २४ जुलैला बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अंधेरी पुलाच्या दुर्घटनेनंतर पश्चिम आणि मध्य रेल्वेने अनेक पुलांचं ऑडिट केलं. त्यानंतर अजूनही अनेक पूल धोकादायक असल्याचं उघडकीस आलं आहे. त्यानुसार आता पश्चिम रेल्वेने लोअर परळ पूल वाहतुकीसाठी आणि पादचाऱ्यांसाठी धोकादायक असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे वाहतुक पोलिसांनी लोअर परळ रेल्वे पूल २४ जुलैपासून बंद करण्याचा निर्णय घेतला असून सकाळी ६ वाजल्यापासून दुरुस्ती होईपर्यंत बंद करण्यात येणार असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. तसेच, हँकॉक पुलाच्या धर्तीवर लोअर परळचा डेलिस पूल तातडीने पाडून त्याच्यासह पाच आणखी उड्डाण पुलांची पुनर्बांधणी करण्याची मागणी पश्चिम रेल्वे प्रशासनाने मुंबई महानगरपालिकेकडे केली आहे.

आयआयटीच्या अधिकाऱ्यांद्वारे तपासणी केल्यानंतर निर्णय

पश्चिम रेल्वेच्या अंधेरीतील गोखले पुलाचा भाग कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला होता. तर अन्य चार जण जखमी झाल्याच्या घटनेनंतर पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या हद्दीतील ४४५ पुलांची पालिका, रेल्वे आणि आयआयटीच्या अधिकाऱ्यांद्वारे सुरक्षा तपासणी सुरू आहे. लोअर परळच्या डेलिस पुलाबरोबरच ग्रँड रोडचा फेरेर उड्डाण पूल, मुंबई सेंट्रलचा बेलासिस उड्डाण पूल, दादरचा टिळक उड्डाण पूल, प्रभादेवीचा करोल उड्डाण पूल, महालक्ष्मीचा उड्डाण पूल आदि सहा पुलांची पुनर्बांधणी किंवा दुरूस्ती करण्यात यावी, असंही पश्चिम रेल्वेनं म्हटलं आहे. पश्चिम रेल्वेच्या हद्दीत १४५ फुट ओव्हर ब्रिज तर २९ उड्डाण पूल असून त्यांची देखभाल पालिका, एमएमआरडीए आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे आहे.

- Advertisement -

प्राथमिक तपासणी केल्यानंतर पूल बंद करण्याचा निर्णय

पश्चिम रेल्वेचा एक ब्रिज पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ स्थानकाजवळ असून ६४ डिग्रीतून तो रूळांना तिरका क्रॉस करून बांधला आहे. या उड्डाण पुलाचे नाव डेलीस ब्रिज असून त्याची आयआयटी मुंबईच्या तज्ञांनी १७ जुलैला प्राथमिक तपासणी करून हा ब्रिज तातडीने बंद करण्याची सूचना पोलीस, पालिका आणि संबंधित यंत्रणांना केली आहे. वेळ न दवडता पश्चिम रेल्वेने या ब्रिजची पुनर्बांधणी करण्यासाठी स्ट्रक्चरल इंजिनिअर्स आणि कन्सलटन्टचा सल्ला घेतला आहे. २३ जुलैला चर्चगेट मुख्यालयात नव्या पुलाच्या डिझाईनचे सादरीकरण करण्यात येणार आहे. या डेलीस पुलाची लांबी ६२.७२ मीटर असून रूंदी २३.२० मीटर इतकी आहे. साल १०२१ मध्ये त्याची उभारणी करण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -