घरमुंबईमाघी गणेशोत्सवानिमित्त भाविक बाप्पाच्या दर्शनाला

माघी गणेशोत्सवानिमित्त भाविक बाप्पाच्या दर्शनाला

Subscribe

आज राज्यभरात माघी गणेश जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जात आहे. सिद्धीविनायक मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे.

आज माघी गणेश जयंती म्हणेच आपल्या लाडक्या बाप्पाचा वाढदिवस. प्रत्येकाच्या मनात बाप्पाबद्दल आपुलकीची भावना असते. राज्यात सर्वत्र माघी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अनेक भाविकांनी राज्यातील मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळीच पुण्यातील दगडू शेठ हलवाई मंदिरात महाआरतीचा सोहळा पार पडला असून उत्सवाला सुरुवात झाली. तर श्रीमंतांच्या दरबारात सांगितीक मानवंदना दिली जात आहे. तसेच प्रभादेवी येथील सिद्धीविनायक मंदिरात भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. काल, गुरुवारी रात्रीपासूनच भाविकांनी सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली आहे. तसेच माघी जयंतीच्या निमित्ताने सिद्धिविनायकाची रथयात्राही काढण्यात येणार असून त्यानंतर बाप्पाला पालण्यात घालून बाप्पाचा जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे.

सिद्धिविनायकाला रोषणाईची झालर 

माघी गणेशोत्सवानिमित्त प्रभादेवीतील सिद्धिविनायक मंदिराला सुबक अशी रोषणाई करण्यात आली आहे. ही रोषणाई सहा दिवस ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांना देवाच्या दर्शनासह सौंदर्यतेचा अनुभवही घेता येणार आहे. तसेच नेहमीप्रमाणे बाप्पाचा गाभाऱ्याला फुलांची आरास करण्यात आली आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक सिद्धिविनायकाला दर्शनासाठी येतात. यंदाही सकाळपासूनच भाविकांची मंदिरात अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे, पुण्याचे श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरातही विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाय बाप्पाच्या एका भक्ताने तब्बल ७२० किलोचा मोदक बाप्पाला नैवेद्य म्हणून अर्पण केला आहे. दिवसभर राज्यातील विविध मंदिरांमध्ये भाविकांची रेलचेल पाहायला मिळणार आहे.

- Advertisement -

कशी करतात गणेश जंयतीची पूजा

मराठी महिन्यातील माघ महिन्यात शुक्ल चतुर्थी दिवशी गणेश जयंती साजरी केली जाते, म्हणून त्याला माघी गणेश जयंती असे म्हणतात. यानिमित्ताने गणपती मंदिरामध्ये दुधाचा अभिषेक घालून गणेश जयंतीला सुरुवात करतात. गणेश जयंती दिवशी हळद किंवा शेंदुर याने गणपतीची मूर्ती बनवण्याची प्रथा आहे. उत्तर प्रदेशमध्ये गणेश जयंतीला तिलकुंद चतुर्थी म्हटले जाते. या जयंतीला तिलकुंद चतुर्थी, वरद चतुर्थी आणि विनायक चतुर्थी म्हणूनही ओळखली जाते. या दिवशी गणपतीला तिळापासून बनवलेल्या पदार्थाचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच तिळाच्या कूटाने अभिषेक करण्याचीही प्रथा आहे. तसेच मोदकाचा प्रसाददेखील दाखवला जातो. काही घरांमध्ये भाद्रपद महिन्याप्रमाणेच माघी गणेशोत्सवामध्ये गणपतीची मूर्ती घरी आणली जाते. त्याची मनोभावे सेवा केली जाते. घरी आलेले गणपती त्याच दिवशी विसर्जित केले जातात. गणपतीपुळेचा गणराय आणि अष्टविनायकापैकी पहिले देवस्थान असलेले मोरगावचे मोरेश्वर येथील गणेश मंदिरात खास उत्सव तसेच पालखी सोहळा आयोजित केला जातो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -