घरमुंबईधोकादायक खासगी शाळांचे ओझे पालिका शाळांच्या डोक्यावर

धोकादायक खासगी शाळांचे ओझे पालिका शाळांच्या डोक्यावर

Subscribe

दुरुस्ती होईपर्यंत भाडेतत्वावर , पालिका आयुक्तांचा धोक्याचा इशारा

मुंबईतील अनेक खासगी शाळा मोडकळीस आल्याने धोकादायक ठरवल्या जात आहेत. परंतु पर्यायी जागा उपलब्ध होत नसल्याने अनेक खासगी शाळांच्या दुरुस्तीत व्यत्यय येत आहे. त्यामुळे धोकादायक खासगी शाळांना आता महापालिका आधार देणार आहे. दुरुस्तीच्या कालावधीत या शाळा महापालिकेच्या बंद शाळांमध्ये भरवण्यास परवानगी दिली जाणार आहे. धोकादायक शाळेच्या आसपास असलेल्या पालिकेच्या बंद शाळेतील वर्ग खासगी शाळांना तात्पुरत्या स्वरुपात देण्याचा प्रस्ताव लवकरच गटनेत्यांच्या सभेपुढे मांडला जाणार आहे. असे असले तरी पालिका शाळा खासगी शाळांना दिल्यानंतर काय होते हे आपण पाहिले आहे, असा इशारा पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिला आहे.

मुंबईत मोठ्याप्रमाणात खासगी शाळा सुरू आहेत. त्यातील अनेक खासगी शाळांच्या इमारती या जुन्या झालेल्या आहेत. त्यामुळे अनेक शालेय इमारती मोडकळीस आलेल्या आहेत. तरीही या मोडकळीस आलेल्या शाळांमध्ये वर्ग सुरू असून भविष्यात या शालेय इमारती कोसळून दुघर्टना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या खासगी शाळांचे व्यवस्थापन इमारतींची दुरुस्ती करण्यास तयार आहे. परंतु दुरुस्तीच्या कालावधीत पर्यायी जागा उपलब्ध होत नसल्याने दुरुस्तीची कामे हाती घेता आलेली नाहीत.

- Advertisement -

मुंबई महापालिकेच्या अनेक शाळा पटसंख्येअभावी बंद पडलेल्या आहेत. त्यामुळे ज्या परिसरातील खासगी शाळा धोकादायक ठरली असेल तर दुरुस्तीच्या कालावधीत नजिकच्या बंद पडलेल्या महापालिका शाळेचे वर्ग खासगी शाळेला उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शिवसेनेचे सचिन पडवळ यांनी केली होती. शिक्षण समितीत हरकतीच्या मुद्याद्वारे आवाज उठवल्यानंतर पडवळ यांनी ठरावाच्या सूचनेद्वारेही ही मागणी लावून धरली.

यासंदर्भात अर्थसंकल्पीय भाषणात सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनीही ही मागणी लावून धरली होती. यावर महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी या मागणीचा विचार करता येईल,असे स्पष्ट केले. याबाबतचा निर्णय गटनेत्यांच्या सभेत घेतल्यास त्यावर पुढील कार्यवाही करता येईल. परंतु महापालिकेच्या शाळा खासगी शाळांना दिल्यानंतर काय होते हे यापूर्वी आपण पाहिले आहे, असेही त्यांनी सूचित केले. त्यामुळे लवकरच याबाबतचा प्रस्ताव गटनेत्यांच्या सभेपुढे मांडून यावर धोरणात्मक निर्णय घेतला जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -