घरमुंबईपुरूषांनो सावधान...महिलांच्या डब्यात घुसाल तर स्थानकांवर फोटो झळकणार

पुरूषांनो सावधान…महिलांच्या डब्यात घुसाल तर स्थानकांवर फोटो झळकणार

Subscribe

रेल्वेच्या महिला डब्यात घुसखोरी करणार्‍यांना धडा शिकवण्यासाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रेल्वे सुरक्षा दलाकडून एक अनोखी क्लुप्ती योजण्यात आली आहे. रविवार (आज) पासून रेल्वेच्या महिला आणि दिव्यांग डब्यातून प्रवास करणार्‍या पुरुष प्रवाशांवर कारवाईसहीत त्यांचे रेल्वे स्थानकांवर फोटो झळकणार आहेत. रेल्वेने यापूर्वी ‘ऑपरेशन विश्वास’ सुरू केले होते. मात्र त्याचा फारसा उपयोग होत नसल्याचे दिसल्यावर आता रेल्वेकडून ‘ऑपरेशन गिल्टी’ सुरु करण्यात आले आहे.

इतकेच नव्हेतर एखादा पुरुष प्रवासी महिलांच्या डब्यात दोनदा सापडला तर त्याचा फोटो महिलांच्या डब्यात लावण्याचा विचार सुरू आहे. मात्र, रात्री ११ वाजल्यानंतर सर्वांसाठी खुले होणार्‍या महिला डब्यांचा या नियमाला अपवाद राहील. लोकलने प्रवास करणार्‍या महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे. त्यामध्ये सीसीटीव्ही, टॉकबॅक प्रणालीचादेखील समावेश आहे. तरी महिलांवर होणारे अत्याचार काही कमी होत नाहीत. काही दिवसांपूर्वी मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी) आणि एका खासगी संस्थेने केलेल्या सर्व्हेमध्ये लोकलने प्रवास करणार्‍या सुमारे ४५ टक्के महिला प्रवासी प्रवासा दरम्यान असुरक्षित असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलेला होता.

- Advertisement -

या अहवालानंंतर रेल्वे प्रशासनाने महिलांच्या सुरक्षेसंदर्भात अनेक योजना राबविण्यास सुरुवात केलेली आहे.त्यानुसार महिलांच्या डब्यातून प्रवास करणार्‍या पुरुष प्रवाशांवर मध्य रेल्वे प्रशासनाने ‘ऑपरेशन विश्वास’ हाती घेऊन कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे. मात्र तरी सुध्दा घुसखोर पुरुष प्रवाशांना आळा घालण्यात यश आले नाहीत. गेल्या वर्षीच्या तुलनेत मध्य रेल्वे मार्गावर महिला आणि दिव्यांग डब्यात घुसखोरी करणार्‍या प्रवाशांची संख्या 35 टक्यांनी वाढली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे आता ऑपरेशन गिल्टी सुरू करण्यात आले आहे. या ऑपरेशन अंतर्गत रेल्वेच्या महिला डब्यात आणि दिव्यांग डब्यात घुसखोरी करणार्‍या पुरुष प्रवाशांचा फोटो रेल्वे स्थानकावर, रेल्वे पोलीस ठाण्यात आणि स्टेशन मास्तर यांच्या कार्यालयात चिकटविला जाणार आहे. इतकेच नव्हेतर वारंवार घुसखोरी करण्याविरोधात रेल्वेकडून त्यांच्या कार्यालयात आणि घरी पत्रे पाठविण्यात येणार आहेत.

पुरुष घुुसखोरांची विक्रमी वाढ
बारा डबा लोकलमध्ये महिलांसाठी द्वितीय श्रेणी आणि प्रथम श्रेणीचा डबा राखीव असतो. या डब्यात पुरुष प्रवाशाने घुसखोरी केल्यास त्याला दंड होतो. मात्र अशा घुसखोरांवर कारवाई करूनही परिस्थिती पुन्हा जैसे थे आहे. 2018 मध्ये महिला डब्यात पुरुष प्रवाशांनी घुसखोरी केल्याने 2 हजार 902 जणांना पकडण्यात आले, तर 2019 मध्ये 4 हजार 483 जणांना पकडण्यात आले आहे. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 1 हजार 581 घुसखोर प्रवाशांची संख्या वाढली आहेत. इतकेच नव्हेतर जानेवारी 2020 या एका महिन्यात महिला डब्यात पुरुष प्रवाशांची घुसखोरी 595 वर जाऊन पोहचली आहे. त्यामुळे यावर आळा घालण्यासाठी रेल्वेकडूनही विशेष मोहीम चालविण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे सुरक्षा दलातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.

- Advertisement -

महिला डब्यात व दिव्यांग डब्यात घुसखोरांची संख्या वाढत आहे. यावर आळा घालण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाकडून आता एक योजन आखली आहे. जे पुरुष वारंवार महिला डब्यात घुसखोरी करतील त्यांचे फोटो रेल्वे स्थानकावर लावण्यात येणार आहेत. तसेच त्यांच्या कार्यालयातसुध्दा यासंबंधी पत्र पाठविण्यात येणार आहे.
– अश्रफ के. के., विभागीय वरिष्ठ सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वे

महिला डब्यात पुरुष घुसखोरी
2018 2 हजार 902
2019 5 हजार 78
(जानेवारी 2020)
दिव्यांग डब्यात
2018 18 हजार 480
2019 23 हजार 771

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -