घरमुंबईयंदाच्या लॉटरीत म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांचा फॉर्म्युला

यंदाच्या लॉटरीत म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांचा फॉर्म्युला

Subscribe

यंदाच्या म्हाडा लॉटरी २०१८ मध्ये सर्वसामान्यांना खऱ्या अर्थाने परवडणारी घरं मिळण्याची शक्यता वाढली आहे. त्यासाठी मुंबई तसेच उर्वरीत राज्यातील म्हाडा घरांच्या किंमतीत कपात करण्यात आल्याची माहिती म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी दिली.

सर्वसामान्यांना परवडणारे घरांचे दर लॉटरीत नसतात, अशी टीका म्हाडाच्या लॉटरीबाबत यापूर्वी झाली आहे. त्यामुळेच सर्वसामान्यांच्या आवाक्यातील घरं उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडाने यंदा पुढाकार घेतला आहे. त्यासाठीच मुंबई तसेच उर्वरीत राज्यातील म्हाडा घरांच्या किंमतीत कपात करण्यात आल्याची माहिती म्हाडाचे नवनिर्वाचित अध्यक्ष उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली. मुंबई मंडळाच्या एकूण ११९४ घरांसाठी लॉटरीची तारीख येत्या दहा दिवसात जाहीर करू, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. म्हाडाने मुंबईतील घरांच्या किंमतीत कपात केली आहे. त्यामुळेच दर कपातीनुसार मुंबई मंडळाची लॉटरीची तारीख ठरण्यासाठी आणखी दहा दिवसाचा कालावधी जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बिल्डरने तयार केलेल्या घरांमध्येही सवलत

मुंबईतील लोअर परेलची घरं महागडी असल्याने अनेक विजेत्यांनी त्यांची घरं म्हाडाला परत केली होती. याचीच दखल घेत म्हाडाने लोअर परेलच्या घराची किंमत आता १ कोटी ४० लाख रूपयांवरून ९९ लाख केली असल्याचे ते यावेळी सांगितले. विक्रोळीतील टागोर नगर येथील आम्रपाली इमारतीतल १ कोटी १७ लाख ३२ हजार रुपयांची घरं आता ८२ लाखात मिळणार आहे. उच्च उत्पन्न गटासाठी रेडी रेकनरच्या ७० टक्के दराने घरांची किंमत ठरणार आहे. त्यामुळे या घरांची किंमत ३० टक्क्यांनी कमी झाली आहे. तर मध्यम उत्पन्न गटामध्ये ६० टक्के रेडिरेकनर दराने घरांची किंमत ठरेल. अल्प उत्पन्न गटासाठी ५० टक्के तर अत्यल्प उत्पन्न गटासाठी ३० टक्के रेडीरेकरनर दराने ही किंमत निश्चित होईल. सरासरी ३० टक्के ते ७० टक्के इतक्या दराने घरांच्या किंमती कमी होणे शक्य होतील. बिल्डरने तयार केलेल्या घरांमध्ये २० टक्के ते ७० टक्के इतकी सवलत देण्यासाठीचा धोरणात्मक निर्णय आजच्या बैठकीत झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

लॉटरी वेगवेगळी काढणार

डेव्हलपरने तयार केलेली घरं आणि म्हाडाने तयार केलेली घरं यासाठी यापुढे स्वतंत्र लॉटरी असेल, असेही सामंत यांनी स्पष्ट केले. आज बोर्डाने या निर्णयाला मान्यता दिली असल्याचे ते म्हणाले. म्हाडाने लॉटरी काढून प्रतिसाद न मिळालेल्या २४४१ घरांसाठीही पुन्हा लॉटरी काढण्यात येणार आहे. या घरांच्या किंमती कमी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. नाशिकची ११५० घरे, औरंगाबादची ९१८ घरे आणि नागपूरची ३३६ घरांचा यामध्ये समावेश आहे. २० टक्के ते ४७ टक्क्यांपर्यंत या घरांची किंमत कमी होणार आहे. बाजारभाव, सरकारी दर आणि विक्रीची किंमत या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन ही सवलत देण्यात आली आहे. या घरांना प्रतिसाद न मिळाल्यास पोलीस वसाहतीसाठी ही घरं उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विकासकाची मक्तेदारी मोडीत

म्हाडा मार्फतच्या घरबांधणीच्या विविध प्रकल्पात एकाच विकासकाची यापुढे मक्तेदारी नसेल. एकाच मोठ्या कामासाठी एकाहून अधिक विकासकांना कामाची संधी देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ठराविक कारणामुळे संपूर्ण प्रकल्प ठप्प होण्यावर परिणाम होणार नाही. यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

सुविधाच सुविधा

म्हाडाच्या घरांसोबतच लिफ्ट, अग्निशमन यंत्रणा, व्यायामशाळा, ग्रंथालय, पार्किंग, चिल्ड्रन पार्क आणि जेष्ठ नागरिकांसाठी सुविधा आदी गोष्टीही सोसायटीमध्ये देण्यासाठी आजच्या बैठकीत तत्वतः मान्यता देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

म्हाडाच्या कर्मचाऱ्यांनाही घरांची योजना

संपूर्ण मुंबईतील नागरिकांकरता घरांच्या सोडतीसाठी काम करणाऱ्या म्हाडातील कर्मचारी वर्गासाठी घरांची सुविधा करून देण्याचा म्हाडाचा विचार आहे. त्यासाठी नुकतीच बैठक कर्मचारी संघटनांसोबत झाली आहे. आगामी कालावधीत याबाबत ठोस उपाययोजना करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. म्हाडाच्या कर्मचाऱ्यांना यंदा १७ हजार दिवाळी बोनस देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘विक्री खत’ही मिळणार

म्हाडा आजवर विजेत्यांना केवळ घराच्या ताब्यासाठी पत्र देत होते. पण यापुढे या पत्रासह ‘खरेदी खत’ म्हणजे सेल डीड देण्याचाही निर्णय आजच्या बैठकीत झाला आहे. त्यामुळे घरासाठी पाच वर्षे झाल्यानंतर खरेदी खताच्या प्रक्रियेसाठी म्हाडाच्या मुख्यालयात फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. खरेदी खत असले तरीही म्हाडाच्या सोसायटीच्या एनओसीनंतरच या घरांची विक्री करता येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -