घरमुंबईवसईच्या मिठागरात ४०० जण अडकले, मदतकार्य सुरू

वसईच्या मिठागरात ४०० जण अडकले, मदतकार्य सुरू

Subscribe

वसई पूर्वेकडील मिठागरात ४०० लोक राहतात. कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे मिठागरात पाणी शिरले आहे. त्यामुळे या ४०० लोकांचा जीव धोक्यात आला आहे. स्थानिक प्रशासनाने मदतकार्य सुरू केले आहे.

कालपासून मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामध्ये प्रामुख्याने वसई-विरारमध्ये पावसाने दमदार बॅटींग केली. वसई – विरारमध्ये अनेक ठिकाणी पाणी तुंबल्यामुळे रस्तेदेखील जाम झालेले आहेत. तसेच नालासोपाऱ्याहून मुंबईकडे येणारी लोकलसेवा कोलमडली. वसई पूर्वेकडील मिठागरालाही पावसाने चांगलेच झोडपले असून मिठागरात ४०० जण अडकल्याची माहिती आता समोर आली. मिठागरात काम करणाऱ्या कामगारांची वस्तीदेखील मिठागरात आणि आसपास असून ४०० हून अधिक लोक या वस्तीत राहतात. पाण्याचा प्रवाह वाढल्याने या वस्तीत पाणी शिरले. त्यामुळे आता या ४०० लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

होड्यांद्वारे मदतकार्य सुरू

पालघरमधील आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी विवेकानंद कदम आणि वसईचे तहसीलदार किरण सुरवसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मिठागर परिसरात वसई पालिकेचे पथक पोहोचले आहे. मदतकार्य सुरु करण्यात आले आहे. तसेच महसूल विभागाचे कर्मचारी नवघर मिठागर येथे पोहचले असून येथील काम करणाऱ्या कामगारांना होड्यांद्वारे बाहेर काढण्यात येत आहे. मिठागर परिसर हा सखल असल्यामुळे येथे नेहमीच पाणी साचते. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वसईच्या ग्रामीण भागासह शहरी भागातही पाणी साचले. त्यामुळे होड्या चालवून प्रशासन मदत कार्य करत असून अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यात येत आहे.

- Advertisement -

वसईत शाळांना सुट्टी

स्कायमेटने दिलेल्या माहीतीनुसार परिसरात आज दिवसभरात १८० मिलीमीटर पाऊस पडला. तसेच आज दिवसभर पाऊस कायम राहणार असल्याने ऑफीस किंवा शाळेत न जाण्याचा सल्ला स्कायमेटने दिला आहे. रेल्वे रुळांवरही पाणी साचल्यामुळे पश्चिम रेल्वेचा बोजवारा उडाला आहे. मुसळधार पावसामुळे वसई-विरार आणि नालासोपारा येथील महाविद्यालये आणि शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

- Advertisement -

वाहतूक कोलमडली

जोरदार पावसामुळे रेल्वे व रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले असल्याने रस्ते वाहतूक ठप्प आहे. तर काही ठिकाणी धिम्या गतीने सुरू आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली असून रेल्वेसेवादेखील विस्कळीत झाली आहे. डहाणूहून विरारकडे येणारी उपनगरीय रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. वाणगाव, बोईसर, पालघर, केळवे रोड या स्थानकांवर रेल्वे उभ्या करण्यात आल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -