घरमुंबईशिवसेनेची १० रुपयांची थाळी फक्त मुंबई पालिका कर्मचार्‍यांसाठी सुरु

शिवसेनेची १० रुपयांची थाळी फक्त मुंबई पालिका कर्मचार्‍यांसाठी सुरु

Subscribe

विधानसभा निवडणूक वचननाम्यांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जनतेला दहा रुपयांमध्ये जेवणाची थाळी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर, या आश्वासनाची प्रतिपूर्ती मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृहात करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या कामगार,कर्मचार्‍यांना अवघ्या दहा रुपयांमध्ये थाळी उपलब्ध करून देण्याचा निर्णय महापालिकेतील सत्ताधारी पक्षाने घेतला असून त्याचा शुभारंभ गुरुवारी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याहस्ते करण्यात आला. या दहा रुपयांच्या थाळीमध्ये महापालिका कामगार,कर्मचार्‍यांना दोन चपात्या, दोन भाजी, डाळ आणि भात आदींचा समावेश आहे. या दहा रुपयातील जेवणामुळे महापालिका कर्मचार्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

मुंबई महापालिका मुख्यालयातील नवीन इमारतीमधील पोटमाळयावर कर्मचार्‍यांसाठी उपहारगृह चालवले जात आहे. या उपहारगृहांमध्ये महापालिकेच्या कामगार,कर्मचारी व अधिकार्‍यांसह पोलिस कर्मचारी, तसेच बाहेरील लोक येत असतात. परंतु उपहारगृह चालवण्यासाठी प्रशस्त मोठी जागा, वीज व पाणी सर्व मोफत देत कर्मचार्‍यांना सवलतीच्या दरात जेवणासह खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले जाते. पण याठिकाण मोठ्याप्रमाणात महापालिका कर्मचारी येत असल्याने शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतील दहा रुपयांमध्ये थाळी उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले यांनी प्रयत्न केला.

- Advertisement -

उपहारगृहाला दिलेले कंत्राट आणि त्यातील जेवणाचे दर याचा अभ्यास करून घोले यांनी आपल्या कर्मचार्‍यांना दहा रुपयांमध्ये जेवण दिले जावू शकते, याची कल्पना उपहारगृहाच्या चालकाला करून ही थाळी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला. त्यानुसार महापौर किशोरी पेडणेकर व स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव तसेच सभागृहनेत्या विशाखा राउुत यांच्या उपस्थितीत याचा शुभारंभ करण्याची घोषणा त्यांनी केली.

परंतु महापौरांना एका कार्यक्रमाला विलंब झाल्यामुळे अखेर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याहस्ते याचा शुभारंभ करण्यात आला. महापालिका मुख्यालयात तब्बल साडेतीन हजार कर्मचारी सेवेत असून इतर कार्यालयांमध्ये तीन ते साडेतीन हजार कर्मचारी ये-जा करत असतात. यासर्वांना आता दहा रुपयांमध्ये जेवणाची सेवा उपलब्ध होणार असल्याचे यशवंत जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले. मात्र, सध्या ही दहा रुपयांमध्ये थाळी महापालिका कर्मचार्‍यांसाठीच असेल,असे अमेय घोले यांनी स्पष्ट केले आहे. याप्रसंगी सभागृहनेत्या विशाखा राउुत, आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले तसेच स्थायी समिती सदस्य उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -