घरदेश-विदेशमुंबई, नागपूर, मालेगाव, अहमदनगर,उस्मानाबाद, औरंगाबादेत निदर्शने

मुंबई, नागपूर, मालेगाव, अहमदनगर,उस्मानाबाद, औरंगाबादेत निदर्शने

Subscribe

लखनऊमध्ये ३४ गाड्या, ४ ओबी व्हॅन, २ चौक्या जाळल्या., एअर इंडियाच्या ८ विमाने विलंबाने., अहमदाबादेत पोलिसांना मारहाण., दिल्लीत मोबाईल इंटरनेट सेवा बंद., ईशान्येकडील लोण देशभरात.

भारतीय लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेवर घाला घालण्यासाठीच केंद्र सरकारने नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणल्याचा आरोप करत काँग्रेस, राष्ट्रवादी, डावे पक्ष, विविध पुरोगामी संघटना, एनजीओ, मुस्लीम आणि आंबेडकरवादी संघटनांनी गुरुवारी मुंबईसह नागपूर, मालेगाव, अहमदनगर, उस्मानाबाद आणि औरंगाबादमध्ये आंदोलन केले. या विधेयकाचा निषेध नोंदवला. अखंड भारताचा नारा देत मोर्चात हजारो तरुण-तरुणी सहभागी झाल्या होत्या. मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानात मोठ्या प्रमाणावर आंदोलक जमल्याने ग्रँट रोड परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनामुळे अफवा पसरू नये म्हणून दक्षिण मुंबईतील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.

ग्रँट रोड येथील आझाद क्रांती मैदानात गुरुवारी विविध पुरोगामी संघटनांनी मोर्चाचे आयोजन केले होते. दुपारी ४ वाजता हा मोर्चा सुरू झाला. या मोर्चात शेकडो तरुण-तरुणी घोषणा देतच सहभागी झाले होते. आंदोलनासाठी आलेल्या महिलांची संख्याही लक्षणीय होती. विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही या आंदोलनात भाग घेतला होता. छात्रभारती, स्मयक विद्यार्थी आंदोलन या विद्यार्थी संघटनांबरोबरच सीपीआय, रिपाइंचे विविध गट, भीम आर्मी, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही या मोर्चात प्रचंड संख्येने सहभागी झाले होते. नागरिकत्व दुरुस्ती कायदा समानतेच्या विरोधात असून तो असंविधानिक आहे, असे सांगत हा कायदा तात्काळ मागे घ्या, अशी जोरदार मागणी आंदोलकांनी यावेळी केली. या आंदोलनात सिने अभिनेते आणि काँग्रेस नेते राज बब्बर, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष एकनाथ गायकवाड, दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री हुमा कुरेशी, अभिनेता सुशांत सिंह यांनीही भाग घेतला.

- Advertisement -

मालेगावात मोठा मोर्चा
गुरुवारी सकाळी मालेगावातही नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात प्रचंड रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत हजारो लोक सहभागी झाले होते. आंदोलकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. मात्र हजारो लोक या मोर्च्यात एकत्र आल्यामुळे मालेगावात वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. या मोर्चात मुस्लिमांचा मोठा सहभाग होता. नाशिकमध्येही मुस्लिम कार्यकर्त्यांनी प्रचंड मोठ्या मोर्चाचे आयोजन केले होते.

औरंगाबादेत समर्थक-विरोधक आमने-सामने
औरंगाबादमद्येही गुरुवारी नागरिकत्व कायद्याचे समर्थक आणि विरोधक आमने-सामने आले. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करण्यासाठी आणि जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आंबेडकरवादी संघटनांनी मोर्चाचे आयोजन केले होते. या संघटनांनी डॉ. बाबासाहेब आंबडेकर मराठवाडा विद्यापीठात येऊन जोरदार निदर्शने केली. त्याचवेळी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ मोर्चा काढला. त्यामुळे दोन्ही गट आमने-सामने आल्याने दोन्ही गटात घोषणा युद्ध सुरू झाले. यावेळी पुरोगामी संघटनांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. नगर आणि उस्मानाबादेतही नागरिकत्व कायद्याविरोधात उग्र आंदोलन करण्यात आले होते.

- Advertisement -

नागपुरातही आंदोलन
नागपुरातही प्रचंड मोठा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात सर्वपक्षीय कार्यकर्ते, पुरोगामी संघटना आणि भारतीय मुस्लिम परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मोर्चाचे नेतृत्व भारतीय मुस्लिम परिषदेने केले होते. नागपुरात निघालेल्या या अतिविराट मोर्चामुळे नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. त्याचा सर्व सामान्यांना प्रचंड फटका बसला.

नागरिकत्व कायदा दुरुस्तीच्या विधेयकावरुन संपूर्ण देशभरात उद्रेकाचे वातावरण निर्माण झाले आहे. राजधानी दिल्लीत कलम १४४ लागू करण्यात आले आहे. तर काही ठिकाणी मोबाइल इंटरनेट, एसएमएस आणि व्हॉइस कॉल सेवाही बंद करण्यात आली आहे. तर उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये विविध भागांत हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. आंदोलकांनी कार, मोटारसायकलींसह ३४ गाड्यांना आगी लावल्या. शहरातील दोन पोलीस चौक्याही आंदोलकांनी जाळल्या. डालीगंज आणि हजरतगंज भागात परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. तोडफोड तसेच दगडफेकीमुळे या भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी प्रथम अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या तर नंतर लाठीमारही केला. अहमदबादेतही निदर्शने करण्यासाठी उतरलेल्या आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. एक पोलीसाला जमावाने बेदम मारहाण केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -