घरमुंबईसेना आमदार रवींद्र फाटक यांच्या मुलाच्या लग्नाला नारायण राणेंच्या उपस्थितीने मातोश्री नाराज

सेना आमदार रवींद्र फाटक यांच्या मुलाच्या लग्नाला नारायण राणेंच्या उपस्थितीने मातोश्री नाराज

Subscribe

शिवसेनेचे विधानपरिषदेचे आमदार आणि पालघरचे शिवसेना नेते रविंद्र फाटक यांना मातोश्रीनं दारुण पराभवानंतरही सारं काही देऊनही आजसुद्धा त्यांच्या निष्ठा भाजप नेते, सेनेचे हाडवैरी केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्याच चरणी असल्याचं स्पष्ट झालं आहे. रविंद्र फाटक यांच्या मुलाच्या विवाह समारंभात नारायण राणे सहकुटुंब उपस्थित होते. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या ‘ब्लॅकलिस्ट’ मध्ये सेनानेते रामदास कदम यांच्या नंतर रविंद्र फाटक यांचा क्रमांक लागण्याचे संकेत मिळत आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश, निलेश ही त्यांची दोन्ही मुले ठाकरेंवर व्यक्तिगत हल्ला चढवत आहेत. ‘मी तिथे असतो तर कानाखाली वाजवली असती’ या राणेंच्या वादग्रस्त विधानानंतर परवा आमदार नितेश राणे यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंच्या विधानसभेतील आगमना वेळी केलेल्या ‘म्यॉव -म्यॉव’ आवाज करत उडवलेल्या खिल्ली मुळे सेनेत प्रचंड संतापाचं वातावरण आहे.

याच नारायण राणे यांच्या निष्ठावंतांपैकी एक रविंद्र फाटक समजले जातात. राणेंची २००५ साली शिवसेना पक्षातून हकालपट्टी झाल्यावर फाटक यांनीही कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला होता आणि ठाणे महापालिकेत आपले १२ नगरसेवक निवडून आणले होते. मात्र आमदार होण्याची अनिवार इच्छा असलेल्या फाटक यांना मातोश्रीच्या आशिर्वादाशिवाय आणि सेनानेते एकनाथ शिंदे यांच्या खंबीर पाठिंब्याशिवाय आमदार होणं अशक्यप्राय गोष्ट होती. त्यामुळे २०१४ विधानसभा निवडणूकी पूर्वी फाटक यांनी राणेंची साथ सोडून सेनेचा भगवा पुन्हा खांद्यावर घेतला. तेव्हाही फाटक यांना सेनेत घ्यायला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हेही तितकेसे उत्सुक नव्हते. मात्र उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत सेना नेते उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या अमराठी निकटवर्तीयांनी केलेल्या यशस्वी शिष्टाईमुळेच रवींद्र फाटक यांचा सेनाप्रवेश झाला.

- Advertisement -

राणेंशी असलेले राजकीय, व्यावसायिक आणि वैयक्तिक पाश तोडून शिवसेनेशी एकनिष्ठ राहण्याचं वचन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सेना नेते एकनाथ शिंदे यांना फाटक यांनी त्यावेळी दिलं होतं. मात्र उध्दव ठाकरे यांच्यावरील बोचऱ्या आणि खालच्या पातळीवरील टिकेनंतरही फाटक यांचे राणे कुटुंबीयांशी आर्थिक, व्यावसायिक आणि कौटुंबिक स्नेहसंबंध आजही कायम असल्याचंच लक्षात आल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रचंड संतप्त आहेत.

ठाणे शहरातून विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाल्यानंतरही फाटक यांना तुलनेनं कमी क्षमतावान असलेल्या भाजपच्या संजय केळकर यांनी मानहानीकारक पराभवाची चव चाखवली. या पराभवानंतरही अनेक महत्त्वाच्या नेत्यांना डावलून एकनाथ शिंदे यांच्या शिष्टाईने फाटक यांना विधान परिषदेत आमदार करण्यात आलं. फाटक यांचं संघटनात्मक वजन वाढवण्यासाठी त्यांना एकनाथ शिंदे – मिलींद नार्वेकर या द्वयीच्या शिष्टाईमुळे पालघरची जबाबदारी सोपविण्यात आली. मात्र तिथेही त्यांची कामगिरी सुमारच राहिली. त्यामुळे पालघर- ठाण्यात शिंदें यांच्यावरच कामाचा भार पडत असल्याने फाटक यांच्याबाबत मातोश्री गेले अनेक दिवस नाराज आहे. मातोश्रीच्या नाराजी मुळेच एकनाथ शिंदे यांनीही रविंद्र फाटक यांच्याबाबतीत सुरक्षित अंतर ठेवणं पसंद केलं आहे.

- Advertisement -

आमदार फाटक यांचा ज्येष्ठ सुपुत्र प्रणयचा पंचतारांकित विवाह सोहळा शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांची कन्या देविका हिच्या सोबत संपन्न झाला. फाटक यांच्या घरच्या मंगलकार्यानिमित्त गेले काही दिवस मुंबईतील पंचतारांकित हॉटेलांमध्ये कार्यक्रम सुरु आहेत. रविंद्र फाटक यांनी राणेंसारख्या सेनेंशी हाडवैर असणाऱ्यांना ‘रेड कार्पेट’ टाकून या कार्यक्रमांना निमंत्रित केलं आहे. मातोश्रीच्या निकटवर्तीयांसोबत फाटक यांचे व्यावसायिक संबंध आहेत. तरीही आजारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांनी या विवाहसोहळ्याकडे पाठ फिरवली आहे. मात्र युवासेना प्रमुख, पर्यटन मंत्री आदित्य यांनी रात्री उशिरा या सोहळ्याला धावती भेट दिली होती. आजही रविंद्र फाटक यांच्या निष्ठा राणेंच्याच चरणी असल्याबाबत ठाण्यातील सेना नेत्यांकडे ‘मातोश्री’नं आपली नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता आमदार फाटक स्वागत समारंभाच्या तयारीत व्यस्त असल्याचं सांगण्यात आलं.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -